दारीं उभे भोये जीव
घरीं पयाले पाखंडी
टायमुर्दुंगाचि धून
आली पंढरीची दिंडी
पुढें लाह्याची डालकी
बुक्कागुलालाची गिंडी
मधी चालली पालखी
आली पंढरीची दिंडी
दोन्ही बाजू वारकरी
मधीं 'आप्पा महाराज'
पंढरीची वारी करी-
आले 'जयगायीं, आज
आरे वारकर्या, तुले
नही ऊन, वारा थंडी
झुगारत अवघ्याले
आली पंढरीची दिंडी
टायमुर्दुंगाच्यावरी
हरीनाम एक तोंडी
'जे जे रामकिस्न हारी'
आली पंढरीची दिंडी
शिक्यावर बालकुस्ना
तठी फुटली रे हांडी
दहीकाला खाईसनी
आली पंढरीची दिंडी
मोठ्या तट्ट्याच्या दमन्या
त्यांत सर्वा सामायन
रेसमाच्या कापडांत
भागवत रामायन
आले 'आप्पा महाराज'
चाला दर्सन घेयाले
घ्या रे हातीं परसाद
लावा बुक्का कपायाले
करा एवढं तरी रे
दुजं काय रे संसारी
देखा घडीन तुम्हाले
आज पंढरीची वारी
कसे बसले घरांत
असे मोडीसन मांडी
चला उचला रे पाय
आली पंढरीची दिंडी
कवयित्री – बहिणाबाई चौधरी