धन्य नरजन्म देऊनीया मला

धन्य नरजन्म देऊनीया मला

देवराया, केला उपकार

सृष्टीचे भाण्डार केले मला खुले

लोचन हे दिले आलोकना

दिली ग्राह्य बुद्धी, दिधली जिज्ञासा

सौदर्य-पिपासा वाधवीली

कारागिरीतील जाणाया रहस्य

दिले रसिकत्व ह्रदयाला

वाणीस या माझ्या दिली काव्यशक्ती

वर्णाया महती देवा तुझी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

दूर कोठेतरी

दूर कोठेतरी अज्ञात जागेत

हासत डोलत आहे फूल

दूर कोठेतरी रानी अवखळ

इवला ओहळ वाहताहे

दूर कोठेतरी वृक्षी गोड गाणे

पाखरू चिमने गात आहे

दूर कोठेतरी देत छाया गोड

एकटेच झाड उभे आहे

दूर कोठेतरी आपुल्या तंद्रीत

कवी कोणी गीत गात आहे


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

माझिया जीवनसृष्टीच्या ऋतूंनो !

पुष्पपल्लवांची आरास करीत

हासत वसंत येतो जगी

इंद्रधनुष्याचे तोरण बांधीत

वर्षा ये नाचत रिमझिम

हिमऋतु येतो धुके पसरीत

शीतळ शिंपीत दहिवर

माझिया जीवनसृष्टीच्या ऋतूंनो-

स्वर्गीय दूतांनो, कोठे गेला?

फुले फूलवीत, मेघ बरसत,

दव उधळीत यारे सारे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

क्षितिजावरती झळक झळक

क्षितिजावरती झळक झळक

उजळ ठळक शुक्रतार्‍या,

तेजस्वी, प्रसन्न, शांत तुझी मुद्रा

अगा महाभद्रा, संजीवनी

जातसे मनीचे किल्मिष झडून

होताच दर्शन प्रातःकाळी

थकल्या भागल्या जीवा दे हुरूप

तुझे दिव्यरूप सायंकाळी

दुःखी या पृथ्वीचा पाठीराखा बंधू

आहेस तू, वंदू तुला आम्ही


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

बरेच काही उगवून आलेले