तूं या दीन जना स्वबन्धुपदवी आर्यें ! कृपेने दिली,
तेणें बुद्धि कृतज्ञ ही तुजकडे आहे सदा ओढली;
भाऊबीज तशांत आज असतां, व्हावी न कां ती मला
वारंवार तुझी स्मृती, वितरिते आनन्द जी आगळा ? १
जीं तूं पाठविलीं मला स्वलिखितें, मीं ठेविलीं सादर,
त्यांतें काढुनि होतसें फिरुनि मी तद्वाचनी तत्पर;
त्यांचा आशय तो प्रसन्न सहसा अभ्यन्तरीं पावतां,
होतो व्यापृत मी पुन: गहिंवरे-नेत्रांस ये आर्द्रता ! २
विद्वत्ता, सुकवित्व, गद्य रचनाचातुर्य, वाक्-कौशल;
चित्ताची समुदात्तता, रसिकता, सौजन्य तें दुर्मिळ,
ऐसे आढळती नरांतहि क्कचित् एकत्र जे सद्रुण,
त्यांही मण्डित पण्डिते सति ! तुला माझें असो वन्दन ! ३
माझ्या या हृदयांत तूजविषयीं सद्भाव जो वागतो,
तो अत्यादरयुक्त नम्र जन मी पायीं तुझ्या अर्पितो;
अंगीकारुनि गे स्वये ! समजुनी त्यालाच ओवाळणी;
ठेवीं लोभ सदा स्वबन्धुवरि या, नेच्छीं दुजें याहुनी. ४
- नम्र बन्धु केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
फैजपूर,यमद्वितीया शके १८२५