अरे कुलांगारा, करंटया कारटया,

अरे कुलांगारा, करंटया कारटया,

घातक कुलटा बुद्धि तुझी

जन्म दिला, केले लालन पालन

संस्कृति-शिक्षण दिले तुला

राहिली न तुला आईची ओळख

तुझे पापमुख पाहू नये

भोगिली अपार तिने कष्टदशा

आता तिच्या नाशा टपलास !

खांडोळी कराया उगारिशी हात

अरे तुझा घात ठरलेला !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आपुलेच आहे आता कुरुक्षेत्र

एकदा तू मागे फुंकिलास शंख

फुंक तू निःशंक अनेकदा

प्रक्षोभक ध्वनि ऐकोत श्रवण

येऊ दे स्फुरण रोमरोमी

मोहनिद्रेतून झालास तू मुक्त

आता देवद्त्त फुंक पुन्हा

आचराया हवा तोच कर्मयोग

पारतंत्र्य-रोग हरावया

आपुलेच आहे आता कुरुक्षेत्र

आहे ’भगवंत’ पाठीराखा !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

तोच का आज ये सोन्याचा दिवस ?

आज नवी काही येत अनुभूति

नवी येत स्फूर्ति गीत गाया

नवीन युगाची नवीन पहाट

आज नवी वाट दिसू लागे

आज झाल्या बेडया पायीच्या या खुल्या

चित्तवृत्ति खुल्या झाल्या माझ्या

अवनम्र शिर झालें हे उन्नत

नवीन हिंमत आज वाटे

तोच का आज ये सोन्याचा दिवस ?

नकळे हा भास किंवा सत्य !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

जगातले समर्थ !

न कळे काय हे शांततेचा अर्थ

लाविती 'समर्थ' जगातले?

विश्वबंधुत्वाची करिती घोषणा

न कळे कल्पना काय त्यांची !

दुबळ्यांच्या माथा ठेवूनीया हस्त

म्हणती हे, 'स्वस्थ बसा आता!'

पिंजर्‍याचे दार करूनीया बंद

म्हणती हे, 'नांदा सौख्यभरे!'

बोलती, 'जगाचे कराया रक्षण

लढतो भीषण महायुद्ध!'


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

नांदू द्या तुमची साम्राज्ये सुखात

समर्थांनो, असो तुमची शाबास !

तुमच्या शौर्यास जोड नाही

विजय-दिनाचा सोहळा साजरा

सावकाश करा आता तुही !

नांदू द्या तुमची साम्राज्ये सुखात

भकास, उधवस्त जगात या

जिंकिली भूमि ती केवळ स्मशान !

फुलवा खुशाल बागा तिथे

आणि द्या एकदा काळाला आव्हान,


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

दोस्त हो, तुमची गोड भारी वाचा

"आता थांबवीले आम्ही हत्याकाण्ड

उन्मत्तांचे बंड शमविले

दुबळ्या राष्ट्रांच्या वाराया आपदा

आम्ही परिषदा भरवीतो

शस्त्रास्त्रावरती घालुनी निर्बंध

करू प्रतिबंध अत्याचारा

समताशांतीची निर्मू लोकराज्ये

करू अविभाज्ये पृथ्वी स्वर्ग !"

दोस्त हो, तुमची गोड भारी वाचा

रिकाम्या भांड्याचा नाद जैसा !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

हे फिरस्त्या काळा

सोडून काळा, ही सराई फिरस्त्या

धरशील रस्ता कोणता तू?

काल बाबिलोनी ठेविला मुक्काम

नंतर तू रोम गाठिलेस

आज मंदिरात साधु पॉलाचिया

विसावा घ्यावया थांबलास

एक तुझा पाय दिसे रिकिबीत

झाली इतक्यात हालचाल

जन्म झाला नाही अशा त्या स्थळास

जावया झालास उतावीळ


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या