मानवीं तृष्णा

हा आकाश-विकास मूर्त गमतो उत्कर्ष नेत्रोत्सव

तारा-पुञ्ज, दिवाकर, ग्रह, शशी त्याचे असे वैभव

ते आम्ही बसतो पहात हृदयी होऊनिया विस्मित

तारामण्डल व्योमभूषण कसे व्हावे परी अंकित !

काढी मानव कष्ट सोसुन हिरे का खोल खांणीतुन

मोती आणिक सागरातुन, मला त्याचे कळे कारण !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

बहरलेला आकाश-लिंब !

"पर्णश्रुती तरुवरा, तव लक्षसंख्य

हे डोलती धवल डूल तयीं सुरेख !

नक्षत्रपुञ्ज नयनोत्सव अंबराचे

की लोल हे झुलति लोलक झुंबराचे !"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

विचारविहग

हृदयस्थानी येउ लागती थवे विचारांचे

दुरुन त्या माहेर वाटले केवळ शांतीचे !

एक एक मारुन चालला चंचु परी परता

विचारविहगा येइ एवढी कोठुनि चंचलता !

काकुळती येऊन फोडिली हाक पाखरांनो

’यारे या, गाउ द्या तुम्हांवर गीत गोजिर्‍यांनो !’

परंतु नव्हते हृदयच जेथे स्थिरतेचे धाम

स्वैर विचारां कसा मिळावा तेथे आराम

जीवनमार्गावरुन संतत भ्रमण असे यांचें

हृदयाच्या छायेत बसाया मन यांचे नाचे !

भविष्यवादी दूत जणू सैराट हिंडतात

या दूतांच्या संदेशाने काव्यें होतात


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

भटक्या कवी !

मी उदास होउनि सहज मनाशी म्हणे
’ये मुशाफिराचे का हे नशिबी जिणें ?

घरदार सोडुनी प्रिया, लाडकी मुले
हिंडतो खुळा मी, काय मला लाभले ?’

किति विचार आले गेले हृदयांतरी
पाखरे जशी चिंवचिंवती वृक्षावरी

विमनस्क होउनी चढलो मी टेकडी
सोडुनी श्वास चहुकडे दृष्टि फेकली

पश्चिमेस दिसला भटकत गेला रवी
ती म्लान मुखश्री मन माझे मोहवी

पाहिला नभी मी मेघखंड हिंडता
खग दिसला गिरक्या घेत तिथे एकटा !

ये वाहत सरिता डोंगररानातुनी
बागडता दिसली निर्झरबाळे गुणी

हा वायु विचरतो भुवनी वेडापिसा
परि तर्‍हेतर्‍हेचे सूर काढितो कसा !

ग्रहमाला करिते भ्रमण रवीभोवती
संगीत गूढ निर्मिते तयांची गती

सगळेच विश्व हे दिसे प्रवासी मला
खुललेली दिसते तरीच त्याची कळा !

जाहले हिमाचे प्रळय, आर्यपूर्वज
ध्रुव सोडुन भटकत फिरले, स्मरले मज

या देवभूमिचा लाभ त्यास जाहला
गाइले वेद ते ठावे तुजला मला

ख्रिस्तादि महात्मे नसते जर भटकले
पाजळते का जगि धर्मदीप आपले !

ते जगत्प्रवासी गल्बत हाकारुनी
भटकले, जाहले नव्या जगाचे धनी

ते आङ्‌ग्लकवी ज्या म्हणत ’सरोवर-कवि’
गाइली तयांनी निसर्गगीते नवी

तो अमेरिकेचा भटक्या कवि ’डेव्हिस’
का त्याची कविता भुलवी मम मानस ?

मग मीच कशाला विशाद मानू तरी
भटकेन जगावर असाच जिप्सीपरी !

हातात शिदोरी, खिशात कविता-वही
जाहलो प्रवासी पहावया ही मही

त्या क्षितिजाजवळिल निळ्या टेकडयांकडे
ही वाट जात घेऊन वळण वाकडे

तिकडेच निघालो वाजवीत पावरी
या अद्‌भुततेची काय कथू माधुरी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

वेताळ

"स्मशानवासी मी आहे भूतपाळ वेताळ
वर्ण असे माझा काळा, मन माझे बेताल !

कडकडते बिजली तैसे माझे हास्य कराल
खदिरांगारासम डोळे जळजळ करिती लाल !

कैलासेश्वर सांबाचा आहे गण मी ख्यात
समंध भूत पिशाच्चांचा राजा मज म्हणतात

उत्तररात्रीं तरुछाया लंबमान दिसतात
देह दिसे माझा तैसा-धड माझे गगनात !

भीषणता जेथे अपुला गाजविते अधिकार
संचरतो तेथे माझा देह भैरवाकार

थोर थोर वटवृक्षांच्या थंडगार छायांत
धरुन पारंब्यांना मी झोके घेतो शांत !

विहीर शेतातिल किंवा परसामधला आड
घुमून त्यात कधी देतो पारव्यांस पडसाद

दबा धरुनी रात्रीचा बसतो मी वेशीत
चुकार कोणी जो भटके त्यास करी भयभीत !

चिलीम विझवुनि पेंगाया लागे चौकीदार
खडा पहारा जागवितो त्याचा घेउनि भार

ललकारी देउनिया मी गस्त घालितो गस्त !
वेसरकराची ऐकुनि ती छाती होई धस्स !

सातिआसरा, बहिरोबा, म्हसोबाहि महशूर
जेथ तिव्हाठयावर बसती फासुनिया शेंदूर

फेरी करुनी मी येतो रात्रीचा तेथून
विकट हास्य करितो त्यांच्या मौजा मी पाहून !

लोक उतारे तिन्हिसांजा ठेवितात उतरुन
पाळत ठेवुनि त्यांवर मी नेतो ते चोरुन

डोकावुनि काळया डोही पाडी मी प्रतिबिंब
घामाने होउनि जाई भ्याडाची तनु चिंब

रानपठारावर केव्हा जाउनि मांडी ठाण
शीळ फुंकुनी घुमवितो आसपासचे रान

भूते मग होती गोळा तेथे चोहिकडून
हसती बागडती माझ्या भवती फेर धरुन !

गावशिवेवरती आहे वटवृक्षांचा पार
अवसेच्या रात्रीं अमुचा होत तिथे संचार

डमरुच्या तालावरती तांडव करितो सांब
आणि घालितो आम्हीही धुमाकूळ बेफाम

नाचत तालावर आम्ही येतो उडवित राळ
लोळ विजेचा उठे तसा भडकुन त्याचा जाळ

उजेडात दिसती अमुचे चेहरे भेसूर
बघेल जो त्याचे व्हावे हृदय भयाने चूर

पाजळुनी केव्हा माझे भाईबंद हिलाल
जलसा करिती गाऊनी कर्कश अन्‌ बेताल

कभिन्न काळोखात अशा भीषण देखाव्यास
बघेल जो कोणी त्याला मूर्च्छा येइल खास !"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

नांगर

जग सगळे बनले रणकुण्डच भीषण
पातला काय प्रळयाचा निकट क्षण !

लक्षावधि पडती जीवांच्या आहुती
नररुधिराच्या खळखळा नद्या वाहती !

मानवते, का तू बडवुनि घेशी उर ?
उलटले तुझ्यावर तुझेच भस्मासुर

जी दिलीस भौतिक शास्त्रांची खेळणी
त्यांचिया करी, ती शस्त्रे झाली रणी !

संहार होत जो आज पुरा होउद्या
शांतीची किरणे दिसणारच ती उद्या

परतंत्र भारता, शस्त्रहीन तू पण
तव कवण महात्मा करील संरक्षण ?

भडकली आग कुणिकडे ! तयाची धग----
लागून इथे करि जीव कसा तगमग !

भाजला भयानक कोलाहल अंतरी
मी दूर दूर भटकलो पिसाटापरी !

शेवटी गाठिली घारकडयाची दरी
विमनस्क बैसलो एका दरडीवरी

संध्येची होती सौम्य उन्हे पांगली
अन् घारकडयाची दीर्घ पडे साउली

त्या सावलीत लाकडी जुना नांगर
कुणि हाकित होता बळिराजा हलधर

खांद्यावर आसुड, हालवीत खुळखुळा
घालीत तास तो सावकाश चालला

फोडीत ढेकळे फाळ जसा तो फिरे
बैलांच्या नावे गीत तयाचे स्फुरे

त्या श्रमिगीतातिल आशय का समजला ?
’पिकवीनच येथे मी मोत्यांचा मळा !’

तुम्हि याला भोळा खुळा अडाणी म्हणा
तुम्हि हसा बघुनि या दरिद्रनारायणा !

बळराम आणि बळिराजा यांच्या पुन्हा
मज याचे ठायी दिसल्या काही खुणा

हा स्वयंतुष्ट करि जगताचे पोषण
होऊन ’हलायुध’ करितो पण रक्षण

जरि भोळा, याच्या औदार्याची सरी
येणार न कोणा कुबेरासही परी

जाहला कशाचा गर्व तरी आपण ?
की ओळखल्या सृष्टीच्या खाणाखुणा ?

सृष्टीची कोडी सोडविता शेवटी
छांदिष्ट बंधुंनो, भ्रमिष्ट झाली मती

त्या भयासुराची दावुनि कारागिरी
तुम्हि मानवतेची फसगत केली खरी !

किति तुम्हांस कुरवाळुनी लाविला लळा
पण आपण भाऊ कापू सजलो गळा

एकान्त शांत शेतात पहा हलधर
हा ध्येयनिष्ठ हाकितो कसा नांगर !

हा दिसे दरिद्री, चिंध्या अंगावरी
गरिबांस घालितो खाऊ पण भाकरी

गंभीर, धीर हा स्थितप्रज्ञ का ऋषी !
मानिलें ध्येय, कर्तव्य एक की ’कृषि’

घारीपरि घाली विमान घिरटया वर
ये ऐकू याला त्याची नच घरघर !

ते बाँम्ब घटोत्कचनाशक शक्तीसम
पण स्फोट व्हावया ठरले ते अक्षम

रणगाडयांचा ये ऐकू नच गोंधळ
घनगर्ज गर्जती तोफा-हा निश्चळ !

त्या रणनौका, ते छत्रीधर सैनिक
ते पाणतीर, काही न तया ठाउक

या संहाराचा प्रेरक अग्रेसर
त्या माहित नाही कोण असे हिटलर !

क्रांतीची त्याने कदर न केली कधी
काळासहि त्याने जुमानले नच कधी

ही युद्धे म्हणजे घटकेची वादळे
का नांगर याचा थांबणार त्यामुळे !

लोटली युगे किति, तो ग थांबला कधी
येतील युगे किति, थांबेल न तो कधी

होतील नष्ट शस्त्रास्त्रे केव्हातरी
हा अखंड, अक्षय, अभंग नांगर परी !

जो जगन्नियंता विश्वंभर ईश्वर
धनधान्ये करितो समृद्ध जग सुंदर

हे पवित्र त्याचे प्रतीक हा ’नांगर’
वंदितो त्यास जो बळिराजा हलधर !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या