प्रेमाचे गाणे

(भूतकाळ भविष्यकाळाला उद्देशून गाणे म्हणतो)

बा नीज, सख्या! नीज गड्या लडिवाळा!
राजसा परम वेल्हाळा।।

या सकळ जगी उठले विषमय वारे
द्वेषाचे उडत फवारे
ही अखिल मही सूडबुद्धिने भरली
हृदयेच जणु कुणा नुरली
जगि झाला रे सुळसुळाट कामाचा
क्रोधाचा मात्सर्याचा
परि भिऊ नको तू, बाळ!
धरि प्रेमवृत्ति तू अढळ
प्रेम हेच तव दिव्य बळ
या प्रेमाच्या सामर्थ्ये जगताला
देशील वळण नव, बाळा।। बा नीज....।।

सत्प्रेमाची आहे अदभुत शक्ती
प्रेम हीच खरि चिच्छक्ती
या प्रेमाचे वर्णन कोण करील
तोकडे शब्द पडतील
तू प्रेमाचा सागर हृदयी जमवी
सुकलेले जग हे फुलवी
शमवाया विश्वद्वेष
ये घेउन तू प्रेमास
भरपूर वाटि जगतास
तू देशील प्रेम जरी जगताला
बदलशिल आजच्या काळा।। बा नीज....।।

ना जगति कधी प्रेम दिल्याने सरते
हे प्रेम कधी ना मरते
ते दिधल्याने वाढतसे, जागविते
परहृदयि सुप्त जे असते
परहृदयाचा विकास करिते प्रेम
प्रेम एक जगदभिराम
बाळ तू नजोनी आज
प्रेमाने हृदयी साज
हो सज्ज पुढे किति काज
तू नीज अता येइल तव कृतिवेला
करि तेव्हा प्रेम-सुकाळा।। बा नीज....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, डिसेंबर १९३०

आत्मा ओत रे ओत

आत्मा ओत रे ओत
निर्मावा दिव्य तेजाचा झोत।। आत्मा....।।

फुलवी रे फुलवी
सुकला फुलवी
हलवी रे हसवी
विद्या हसवी
राष्ट्रात पेटव निर्मळ ज्योत।। आत्मा....।।

होऊ दे होऊ हो
राष्ट्रविकास
होऊ दे होऊ हो
शास्त्रविकास
वाहु दे शतमुख संस्कृतिस्त्रोत।। आत्मा....।।

प्रकट करी रे
अंतरिचा देव
प्रकट करी रे
अंतरिचा भाव
असशी तू दिव्य रे वतनाचा खोत।। आत्मा....।।

परमात्म्याचा
पुत्र तू अभिनव
बळवंताचा
पुत्र तू अभिनव
निर्भय असशी तू केसरिपोत।। आत्मा....।।

स्वातंत्र्याचे
मंदिर सुंदर
शास्त्रकलांचे
कळस मनोहर
दैदीप्यमान त्याला झळकोत।। आत्मा....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, फेब्रुवारी

निरोप

(घरी फार बिकट परिस्थिती असलेल्या उत्तम पाटील या मित्रास धाडलेला हा निरोप.)

निरोप धाडू काय तुला मी बांधो गुणसुंदरा
त्वत्स्थिती रडवी मम अंतरा
असहाय तुझी दशा बघोनी मन्मन हे गहिवरे
सुटती नयनांतुन शत झरे
बघतो सत्त्व तुधे ईश्वर
त्याचा असशी तू प्रियकर
म्हणुनी येई आपदभर
कृपा प्रभुची होइ जयावर जगि सुख ना त्या नरा
घण हाणुन तो बघती हिरा

जसे जसे हे दूर करितसे धिक्कारुनी जग कुणा
घडि घडि करुनि मानखंडना
जसे जसे जगदाघात शिरी बसती निशिदिन मुला
भाजिति अंगार जसे फुला
होउनि निरहंकृति तसातसा
बनतो निर्मळ जणु आरसा
पाहिल तो प्रभुपद- सारसा
भाग्य मिळे त्या भेटायाचे जगदीशा सुंदरा
होइल मुक्त निरंजन खरा

नको घाबरु नको बावरु अभंग धीरा धरी
करुणा वितरिल तो श्रीहरी
जगात त्याच्याविण कोणाचा खरा आसरा नसे
बाकी फोल सोलपट जसे
दे तू सुकाशणु त्याच्या करी
तोची विपत्समुद्री तरी
नेइल सांभाळून बंदरी
सूत्र प्रभुकरि देइल धरुनी श्रद्धा अचलाऽमरा
नाही नाश कधी त्या नरा।।

श्रद्धा जिंकी श्रद्धा विकळवि संकटमय पर्वता
श्रद्धा अमृतधारा मृता
विपत्तिमिर संहरी चंद्रमा श्रद्धेचा सोज्वळ
श्रद्धा दुर्बल जीवा बळ
श्रद्धा असेल यन्मानसी
तो जगि होइल ना अपयशी
संजीवनीच श्रद्धा जशी
श्रद्धा धरुनी गडबडलेल्या मतिला करि तू स्थिर
होइल विपद्दशेचा चूर।।

कर्तव्याचा पंथ बिकट हा उत्साहा वाढवो
निश्चय तिळभर ना हालवो
जशी संकटे येतील तशी त्वदीय चमको प्रभा
येइल मंगल वेळा शुभा
तुज मी सहाय्य करु काय रे
पामर निर्धन मी दीन रे
झरती माझे लोचनझरे
त्वदर्थ निशिदिन आळवीन परि सखया जगदीश्वरा
जो जोडितसे उभयांतरा।।

कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, मे १९३३

भारतमाता

हे भारतमाते मधुरे!
गाइन सतत तव गान।।

त्याग, तपस्या, यज्ञ, भूमि तव जिकडे तिकडे जाण
कर्मनीर किति धर्मवीर किति झाले तदगणगा न।। गाइन....।।

दिव्य असे तव माते करिता इतिहासामृतपान
तन्मय होतो मी गहिवरतो हरपून जाते भान।। गाइन....।।

देउन देउन दीन जाहलिस तरिही देशी दान
परजीवन सांभाळिशि संतत अर्पुन अपुली मान।। गाइन....।।

सत्त्वाचा सत्याचा जगती तूचि राखिशी मान
तुझ्या कथा ऐकाया उत्सुक भगवंताचे कान।। गाइन....।।

एकमुखाने किति वर्णु मी आई तव महिमान
थकले शेषहि, थकले ईशहि, अतुल तुला तुलना न।। गाइन....।।

धूळीकण, फळ, फूल, खडा वा असो तरुचे पान
तुझेच अनुपम दाखविती मज पवित्र ते लावण्य।। गाइन....।।

मांगल्याची माधुर्याची पावित्र्याची खाण
परमेशाच्या कृपाप्रसादे नुरेल तुजला वाण।। गाइन....।।

समरसता पावणे तुझ्याशी मदानंद हा जाण
यश:पान तव सदैव करितो करितो मी त्वद्धयान।। गाइन....।।

बहुभाग्याने बहुपुण्याने झालो तव संतान
तव सेवा मम हातुन होता हरपो माझा प्राण।। गाइन....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

मनमोहन मूर्ति तुझी माते

मनमोहन मूर्ति तुझी माते
सकल जगाची माय माउली
गोड असे किति नाते।। मनमोहन....।।

कुरवाळिशि तू सकल जगाला
निवविशि अमृत-हाते।। मनमोहन....।।

स्नेहदयेचे मळे पिकविशी
देशी प्रेमरसाते।। मनमोहन....।।

सकळ धर्म हे बाळ तुझे गे
सांभाळिशि त्याते।। मनमोहन....।।

भेदभाव तो तुजजवळ नसे
सुखविशि तू सकळांते।। मनमोहन....।।

श्रद्धा देशी ज्ञाना देशी
सारिशि दूर तमाते।। मनमोहन....।।

थोर ऋषी तव थोर संत तव
शिकविति शुभ धर्माते।। मनमोहन....।।

सरिता सागर सृष्टि चराचर
गाती तुझ्याच यशाते।। मनमोहन....।।

तव शुभ पावन नाम सनातन
उचंबळवि हृदयाते।। मनमोहन....।।

त्वत्स्मरणाने त्वदगुण-गाने
भरुनि मदंतर जाते।। मनमोहन....।।

तव सेवा मम हातुन होता
मरण सुधारस वाटे।। मनमोहन....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

माझी एकच इच्छा

एक मात्र चिंतन आता एकची विचार
भाग्यपूर्ण होईल कधी हिंदभूमि थोर
दु:ख दैन्य जाउन विलया होउ हे स्वतंत्र
जन्मभूमी माझी, ध्यानी मनी हाच मंत्र।।

देशदेवसेवेसाठी सर्वही करीन
चित्त वित्त जीवन माझे सर्व हारवीन
प्राणपुष्प माझे माझ्या मातृभूमिकामी
जरी येइ उपयोगाला कितिक होइ नामी।।

मेघ जेवि जीवन सारे देइ या धरेला
जीवना समर्पुन जाई तो परी लयाला
परार्थार्थ जीवन त्यांचे, तेवि हो मदीय
मायभूमिसाठी माझे सर्व काहि होय।।

कदा तुला पाहिन आई! वैभवी अपार
पारतंत्र्यपंकांतुन तू होशिल कधि पार
चैन ना मुळी मज पडते, घोर हाच माते
त्वदुद्धारकार्यी केव्हा कृति करीन हाते।।

थोडि फार सेवा होवो या मदीय हाती
घडे जरी, होइल मजला सौख्य जीवनांती
याच जन्मि याची डोळा मी तुला स्वतंत्र
बघेन का? न कळे कैसे असे दैव-तंत्र।।

तुझे भाग्य पाहिन डोळा मायभूमि काय?
मम प्राणज्योति आधी मालवेल काय?
असो काहि होवो घेइन फिरुन अन्य जन्म
तुझी करुन सेवा जाइन होउनी सुधन्य।।

जरी देह पडला माझा तरिहि मी फिरून
इथे जन्म घेइन आई निश्चये करून
पुन:पुन्हा त्वत्सेवेचा सदानंद-मेवा
मला मिळो, माते! पुरवा हेतु देव-देवा!।।

पुष्प, पर्ण, तरु, वेली वा शिलाखंड हीन
पशु, प्राणि, पक्षी कोणी सर्प, मुंगि, मीन
कोणताहि येवो मजला जन्म कर्मयोगे
दु:ख नाही त्याचे, परि ते दु:ख त्वद्वियोगे।।

तुझ्या धुलिमाजी वाटे लोळणे सुखाचे
इथे पाय पावन फिरले रामजानकीचे
इथे नामघोषे फिरले संत ते अनंत
तुझ्या धुळीमधला झालो कीट तरि पसंत।।

तुझी धूळ आई प्रेमे लावितो स्व-भाळी
इथे जन्मलो मी म्हणुनी प्रेम-नीर ढाळी
कितीकदा जातो आई हृदयि गहिवरून
राहतो धुळीत पडूनी साश्रु सदगदून।।

तुझ्या धुळीपुढती मजला मोक्ष तुच्छ वाटे
तुझ्या धुळीमध्ये मजला मोक्ष नित्य भेटे
तुझी धूळ म्हणजे आई सर्व भाग्य माझे
तुझ्या धुळीसाठी आई झुगारीन राज्यें।।

तुझा आई! न वियोग मला जन्मजन्मी व्हावा
कोणताहि जन्म मला येवो तो इथेच यावा
सदा तुझ्या चरणांपाशी आइ! मी असेन
स्वर्ग मोक्ष त्यापुढती मी तुच्छ ते गणीन।।

तुझे पवन पावन, आई! तुझे पुण्य पाणी
तुझे निळे आकाश किति स्वच्छ रत्नखाणी
तुझे चंद्र तारे दिसती किति सुरम्य गोड
तुला नसे सा-या भुवनी खचित आई! जोड।।

तुझे पाय सागर माते अहर्निश क्षाळी
तुझ्या शिरी शुभ कर ठेवी शंभु चंद्रमौळी
तुझ्या रुपलावण्याला ना तुला जगात
तुझे चराचर हे अवघे स्तोत्र नित्य गात।।

तुझा थोर महिमा माते! मंगले! उदारे!
तुझी कीर्ती वर्णून धाले थोर थोर सारे
ऋषी वदे ‘दुर्लभ आहे जन्म भारतात’
देव तेहि जन्मुन येथे आई! धन्य होत।।

तुझे भाग्य न दिसे म्हणुनी विश्व खिन्न होई
तुझे भाग्य गेले म्हणुनी सृष्टी खिन्न होई
तुझी मुले परि का अजुनी उदासीन, आई!
त्वदुद्धारकार्यासाठी उठति का न भाई?।।

उठा सकळ बंधूंनो! या करुच मुक्त माय
रुपिभुजंगपाशांत तिचे ते पवित्र पाय
पक्षिराज गरुड बनू या मुक्त ही स्वमाता
झणी करु, न विलंबाची वेळ आज आता।।

विलंबास जरि का क्षणही बंधुंनो कराल
माय ही मरेल अहा हा! तुम्हिहि रे मराल
उठा, झोप सोडा, तळपा सूर्यसे प्रभावे
करा कार्य नेटे दास्या झुगारुन द्यावे।।

चला, उठा, मी तरि आता चाललो पुढारा
मातृलोचनींच्या मजला बघवती न धारा
तुझे अश्रु आई! माझ्या मी करी पुशीन
प्रतिज्ञेस करितो तुजला मुक्त मी करीन।।

आइ! धायिधायी रडतो त्वद्विपत् बघून
पुन:पुन्हा कार्याला मी लागतो उठून
बुद्धि हृदय गात्रे माझी चंदनासमान
झिजोत गे द्याया तुजला जगी श्रेष्ठ स्थान।।

दिगंतात वृद्धिंगत मी कीर्ति तव करीन
तुझी मूर्ति मधुरा दिव्या अंतरी धरीन
तुझे नाम सतत ओठी गान गोड कंठी
तुझी प्रीति अतुला अचला साठवीन पोटी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

प्रभु! भारतिचे वैभव कोठे गेले?

प्रभु! भारतिचे वैभव कोठे गेले?
राष्ट्र हे दिसे मेलेले
तो भाग्याचा भास्कर अस्ता गेला
अंधार भरुनी उरला
ती सिद्विद्या सकल कला मालवली
दैन्याची पाळी आली
गोकुळे येथली गेली
विपुलता येथली गेली
अन्नान्नदशा ही आली
हे कठिण कसे दिवस असे रे आले
कोणते पाप ते झाले।। प्रभु...।।

श्रीरामांनी भूषविली ही भूमी
सत्त्वाढ्य हरिश्चंद्रांनी
शिबि, मांधाता, राजे येथे झाले
परि दुर्दिन आजी आले
श्रीशिव, बाजी गाजी रणशार्दूल
येथेच खेळले खेळ
ती राजर्षींची भूमी
ती ऋषीश्वरांची भूमी
ती वीरांची ही भूमी
नि:सत्त्व अजी काहि नसे उरलेले
दु:खाचे भांडे भरले।। प्रभु...।।

जरि जगि झालो अस्पृश्य अम्ही सगळे
तरि काहीच चित्ता न कळे
निजबंधूंना दूर लोटितो अजुनी
ठेवितो पशुच त्या करुनी
जरि जग थुंके तरिही श्रेष्ठाश्रेष्ठ
मांडिती बंड हे दुष्ट
उपनिषदे जेथे झाली
तेथेच विषमता भरली
सद्धर्मा ग्लानी आली
हे सनातनी अनृतदेव जणु झाले
माणुसकी विसरुन गेले।। प्रभु...।।

या भूमिमध्ये मरणाचा डर भरला
बाजार किड्यांचा झाला
ती मृति म्हणजे वस्त्र फेकणे दूर
करि गीता जगजाहिर
परि मरणाला भिणार आम्हांवाणी
जगतात कुणी ना प्राणी
जन्मले जिथे अद्वैत
मरणाला तेथे ऊत
ते मोठाले शब्दच ओठी उरले
भयभेद अंतरी भरले ।। प्रभु...।।

बहुभाग्याने नायक गांधी मिळती
परि डरती घरि हे बसती
तो राष्ट्राचा ओढि एकला गाडा
झिजवीत अहर्निश हाडा
तो मूर्त महान यज्ञ, मूर्त तो धर्म
मोक्षाचे दावी वर्म
परि वावदूक हे भितरे
हे भुंकत बसती कुतरे
कुणि कर्मक्षेत्रि न उतरे
हे शब्दांचे पूजक हरहर झाले
दुर्दैव घोर ओढवले।। प्रभु...।।

प्रभु! गर्जू दे भीषण तुमची भेरी
हलु देत मढी ही सारी
निजकर्तव्या करावयाला उठु दे
मरणास मिठी मारू दे
निज बंधूंना अस्पृश्य न लेखोत
रूढीस दुष्ट जाळोत
तत्त्वांस कृतित आणोत
ओठिंचे करुन दावोत
सद्धर्म खरा आचरुत
ते रुढींचे राज्य पुरेसे झाले
प्रेमाने होवो ओले।। प्रभु...।।

प्रभु! गर्जू दे भीषण तुमची भेरी
मति जागृत होवो अमुची
प्रभु! येऊ दे गुलामगिरिचा वीट
होउ दे समस्तां धीट
ते हिंदु तसे शीख मुसल्मानादी
होउ दे बंधुसे आधी
विसरु दे क्षुद्रता सारे
विसरोत मागचे सारे
ऐक्याचे खेळो वारे
किति लागे तो त्याग करा रे सगळे
परि ऐक्य पाहिजे पहिले।। प्रभु...।।

प्रभु! गर्जू दे भीषण तुमची भेरी
करु देत मुक्त निज माता
मन विमल असो, स्वार्थ दुरी राहू दे
निजमाय- कार्य साधू दे
ते होउनिया वेडे मातेसाठी
उठु देत बंधू हे कोटी
घेऊ दे उडी आगीत
घेऊ दे उडी अब्धीत
ओतु दे विष तोंडात
परि मातेचे वदन दिसो फुललेले
मोक्षश्रीने नटलेले।। प्रभु...।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२८