प्रेम का करावे?

उदास झालो त्या दिवशी। निराश वाटे फार मनी
कष्टी झालो मनात मी। बुडतो वाटे घोर तमी
सभोवती भरे अंधार। दिसे न कोठे आधार
भोजनावरी नसे मन। दुस-यांस्तव परि जाऊन
दोन घास ते कसे तरी। खावून गेलो बाहेरी
होते रडवेले वदन। होते पाणरले नयन
सायंवेळा ती झाली। प्रभा न धरणीवर उरली
प्रभा न उरली हृदयात। शिरते हृदयी घन रात्र
मदीय मृदु हळु हृदयात। वाटे कुणि मज न जगात
प्रेम जयांचेवरि केले। डोळ्यांपुढती ते आले
डोळ्यांपुढती त्या मूर्ती। क्षणात सुंदर अवतरती
तनमन मी ज्या दिधले। समोर सगळे ते आले
यदर्थ डोळे मम रडले। यदर्थ देवा आळविले
ज्यांच्या हितमंगलास्तव। प्रेमे रडला मम जीव
मदीय सुंदर जे काही। जयांस दिधले सदैवही
स्मृती तयांची मदंतरी। आली एकाएकि खरी
असेल का मत्स्मृति त्यांना। येइल जल का तन्नयना
दिसेल का मन्मूर्ति तया। गहिवर येइल का हृदया
विसरलेच ते असतील। उठे असा मन्मनि बोल
मदर्थ ना कुणी रडतील। मदर्थ ना कुणी झुरतील
मला न कोणी स्मरतील। मला न कोणी लिहितील
कशास लिहितिल मी कोण। कोण्या झाडाचे पान
असे जवळ तरि ते काय। केवळ आहे हे हृदय
विशाल बुद्धि न मज काहि। स्वयंप्रज्ञता ती नाही
विद्या नाही कला नसे। अभिमानी जग मला हसे
कशात नाही पारीण। जगात दिसतो मी दीन
धैर्य धडाडी ती नाही। सदैव मागे मी राही
शरीरसौष्ठव ते नाही। घरदार मला ते नाही
पैसा अडका ना एक। जगात केवळ कफल्लक
भव्य भडक जे लखलखित। झगमगीत ते दिपवीत
असे न मजपाशी काही। मत्स्मृति कोणा कशि राही
कुणी स्मरावे का मजला। कुठल्या झाडाचा पाला
परी मी तरी करु काय। आहे केवळ हे हृदय
प्रेम त्यात जे मला मिळे। सदा जगाला ते दिधले
असेच जे ना मजजवळी। द्याया ये ना कधिकाळी
प्रेम मदंतरीचे दिधले। तुच्छ जगा परि ते दिसले
असेल दोषी मत्प्रेम। असेन किंवा मी अधम
प्रेमपूर जे मी दिधले। असेल विष ते त्या गमले
जगात मी तर कमनशिबी। धिक्कारी मज सृष्टी उभी
प्रेम तरी मी का केले। स्वार्थे होते का भरले?
प्रेमाचा तो मोबदला। हवा कशाला तरी मला
प्रेम जगाला दिल्याविना। जगी रहाया मज ये ना
हृदय प्रेमे भरलेले। कळा लागती जरी न दिले
देउ एकदा मी लागे। काहि न ठेवी मग मागे
सर्वस्वा मी अर्पितसे। कोण परी हे जाणतसे
मना! जगाचे पासून। व्यर्थ काय इच्छा करुन
प्रेमाचा तो मोबदला। हवा कशाला बरे तुला
देत सदा रे तू राही। हृदय रिकामे जो होई
विचार ऐसे हळुवार। मनात उडवित कल्लोळ
विचार कोमल मनि भरले। माझे मानस गजबजले
तुडुंब भरला हृदंबुधि। अगतिक वाटे मनामधी
पाझरले हो मदंतर। डोळ्यां लागे जलधार
माझे भरलेले हृदय। भरलेले डोळे उभय
भावनोत्कटा मदवृत्ती। गात्रे सगळी थरथरली
तो मार्गाने जात। ‘कुणी न मजला’ हे गात
तोचि पाहिली समोर मी। फुले मनोहर अति नामी
काहि रुपेरी सोनेरी। विमल पाकळ्या एकेरी
परागपुंजासभोवती। सकळ पाकळ्या जपताती
पुंज मधोमध काळासा। नयनाममध्ये बुबुळ जसा
जपति पापण्या बुबुळाला। तेवि पाकळ्या पुंजाला
फुले न प्रेमे भरलेले। मजला गमले ते डोळे
प्रेमाने ओथंबलेली। दृष्टी तयांची ती दिसली
सत्प्रेमाचे भरुन घडे। डोळे लावून जगाकडे
होति उभी ती गोड फुले। लक्ष जगाचे ना गेले
वाट पाहानी दिवसभरी। निराश झाली निजांतरी
दृष्टी जराशी लवलेली। मला फुलांची ती दिसली
उघडे अद्यापी नयन। होते त्यांचे रसपूर्ण
उभा राहिलो तिथे क्षण। हृदय येउनी गहिवरुन
प्रेम द्यावया जगाप्रती। होती उत्सुक फुले किती
प्रेम भरलेली दृष्टी। करिती मजवर ती वृष्टी
प्रेमे भरली मनोहर। प्रेमे न्हाणिति मदंतर
दिवसभर कुणी ना भेटे। आले गेले किति वाटे
मला थांबता पाहून। त्यांचे आले मन भरुन
डोलु लागली मोदाने। बोलु लागली प्रेमाने
होती तोवर फुले मुकी। वदती परि होऊन सुखी
सहानुभूतीचा स्पर्श। उघडी त्यांच्या हृदयास
बोलु लागली मजप्रती। गोड तरी ती गिरा किती
‘दिले आमुचे प्रेम तुला। प्रेमतृषार्ता भल्या मुला!
प्रेम द्यावया आम्हि जगतो। देउन आनंदे मरतो
फार अम्हा जरि न सुगंध। आहे त्यातच आनंद
सदा मानितो, जे असते। जवळ, देतसे जगता ते
देण्यासाठी समुत्सुक। देण्यामध्ये खरे सुख
कुणी न भेटले आम्हाला। खंत वाटली चित्ताला
दिवस संपुनी अंधार। पडू लागला बाहेर
भरलेले प्रीतीचे घडे। रिते न झाले कुणापुढे
भरलेले प्रीतीचे घडे। तसेच पडलेत बापुडे
तशात तू आलास। प्रकाश जैसा अंधास
तसे वाटले आम्हाला। मोद मनाला बहु झाला
येऊन येथे रमलास। प्रेमे बघुनी आम्हांस
घे तर सारे प्रेम तुला। प्रेमतृषार्ता भल्या मुला
घे सारे हे प्रेम तुला। प्रेम हवे ना तुला मुला’
असे बोलुनी मज बघती। गोड मनोहर ती हसती
अमृतवृष्टिच जणु करिती। सुकलेल्या हृदयावरती
सुकून गेल्या शेतास। जसा मिळावा पाऊस
तसे झाले मदंतरा। विसरुन गेलो जगा जरा
डोलु लागली फुले मुदे। वा-यावरती आनंदे
येई मदंतरही भरुन। पुढे ओढवुन मम वदन
तयांस धरिले मी भाली। करी तयांना कुरवाळी
धरिले प्रेमे हृदयाशी। प्रेमसिंधु त्या सुमनांसी
पुन्हा बघतसे पुन्हा करी। हृदयी त्यांना घट्ट धरी
अपार भरला आनंद। सकळ पळाला मत्खेद
दाउ कुणा हे रमणीय। दृश्य मनोहर कमनीय
प्रसंग मोठा स्मरणीय। हृदयाल्हादक कवनीय
तया फुलांना मी म्हटले। ‘तुम्ही मज किति तरि सुखवीले
विसावा तुम्ही मज दिधला। शोक तुम्ही मम घालविला
मदीय डोळे हासविले। ओले होते जे झाले
मदीय हृदया फुलवीले। होते कोमेजुन गेले
धरितो तुम्हां हृदयाशी। कृतज्ञता मी दावु कशी
तुम्हास काव्यी गुंफीन। कृतज्ञता मी दावीन
वदुनी धरिले हृदयाशी। जाणारे बघती मजसी
मज वेड्याला ते हसले। लज्जेने क्षण मन भरले
फिरुन फुलांना पाहून। फिरुन एकदा हुंगून
फिरुन तया कुरवाळून। फिरुन हृदयाशी धरुन
निघून गेलो तेथून। प्रेमाने ओथंबून
विचार आला मदंतरी। सृष्टिश प्रेम सदा वितरी
मनुज देतसे प्रेमकण। परमेश्वर हे कोटिगुण
सुमन तारका तरु वारि। प्रकाश-रुपे प्रकट हरी
प्रेम देतसे सर्वांते। कळे न वेड्या जीवाते
प्रकाशकिरण प्रेमाचे । भरलेले कर देवाचे
कवटाळाया येतात। मोदप्रेमा देतात
या वा-याच्या रुपाने। प्रभुच येतसे प्रेमाने
अंगा प्रेमे स्पर्श करी। गुणगुण गाणे उच्चारी
नद्या वाहती ज्या भव्य। प्रभुची करुणा ती दिव्य
जिकडे तिकडे प्रेमाचा। पाउस पाडी प्रभु साचा
अनंत देतो प्रेमास। कळे न वेड्या जीवास
प्रभुचे प्रेम न बोलतसे। मुके राहुनी वर्षतसे
प्रेम करो वा न करोत। अनंत हस्ते भगवंत
प्रेम देतसे सकळांला। विचार हृदयी मम आला
मला वाटली मग लाज। चित्तामाजी ता सहज
प्रेम अगोदर देवाने। दिले तयास्तव मनुजाने
कृतज्ञ राहुन आजन्म। द्यावे निरपेक्ष प्रेम
भगवंताची ही पूजा। सदा जिवा रे करि माझ्या
यातच सार्थक खरोखर। पुन्हा न मळवी निजांतर
पुन्हा न केव्हा रड आता। प्रेम सर्वदा दे जगता
प्रेम सदा तू देत रहा। प्रेमसिंधु तू होइ पहा
प्रेमसागर प्रभुराज। प्रेम द्यावया ना लाज
जगास द्यावे स्वप्रेम। हाच करी तू निजनेम
जगास निरपेक्ष प्रेम। देणे हा करि निजधर्म
सरोत दुसरे ते धर्म। प्रेमदान हे त्वत्कर्म


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३



प्रार्थना

माझ्या ओठावरि थरथरे प्रार्थना एक हीच
व्हावे माझ्या कधि न भगवन् हातुनी कर्म नीच
श्रद्धा राहो हृदयि असु दे त्वत्स्मृती देवराज!
चिंतेचे ना किमपि मग ते नाथ! केव्हाहि काज


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

प्रसन्नता

पुशी अहंता निज पापमूळ। खराखुरा होउन राहि मूल
जिथे अहंकार जिथे घमेंड। प्रसन्नता तेथ न दावि तोंड।।

समस्तपापस्मृति जै जळेल। गळा पिशाच्चापरी ना बसेल
जणू पुनर्जन्मच मानसाचा। तदा घडे लाभ प्रसन्नतेचा।।

प्रसन्नता स्वस्त न वस्तु बापा। प्रसन्नता मुक्तिच मूर्तरूपा
प्रसन्नता वस्तु न मर्त्यभूची। प्रसन्नता सुंदरता प्रभूची।।

प्रसन्नता बाळ मनोजयाचे। प्रसन्नता बाळ तपोबळाचे
प्रसन्नता संयमन-प्रसूती। प्रसन्नता मंगलपुण्य-मूर्ति।।

सदैव सेवारत शांत दात। त्वदिंद्रिये पाहुन विश्वकांत
तदंगि लोभे फिरवी कराते। प्रसन्नता तै वरिते तयांते।।

सुधारसाचा प्रभुच्या कराचा। जया शुभ स्पर्श घडेल साचा
तदीय ते जीवन होइ नव्य। प्रसन्नता-लाभ तयास दिव्य।।

वसुंधरेच्या हृदयामधून। जसा झरा येत उचंबळून
तसा मनोमोद अनंत आत। प्रसन्नतारूप धरून येत।।

असेल ज्याच्या हृदयी अथांगा। मनोहरा मंगलभावगंगा
तदार्द्रता जी झिरपे कृतीत। प्रसन्नतानाम तिलाच देत।।

अनंत जन्म प्रथम श्रमावे। अनंत जन्मावधि संतपावे
अनंत वेळा पडुनी चढावे। प्रसन्नतेने मग रे नटावे।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, मे १९३३

प्रकाश केव्हा भवनी भरेल?

मदीय या मानस-मंदिरात। तमोमयी सतत घोर रात्र
कुठे असे दीप? कसा मिळेल?। प्रकाश केव्हा भवनी भरेल?।।

जशी विजेची कळ दाबताच। प्रकाश सर्वत्र करीत नाच
कुठे असे ती कळ मंदिराची। सदैव हे धुंडित हात साची।।

मदीय हे हात दमून गेले। मदीय डोळे बनतात ओले
कधीच का ना कळ सापडेल। असाच का दास सदा रडेल?

तुझा सदा मी करितो पुकारा। पुन्हा पुन्हा दावितसा नकारा
असे प्रभो कोठवरी टिकेल। प्रकाश केव्हा भवनी भरेल?

रवी शशी अंबरी लाविलेस। निज प्रकाशे भरलेस विश्व
मदंतरी ज्योति न लावितोस। दिसे स्मशानासम गेह ओस।।

क्षणी परी येइ मनी विचार। उचंबळे तत्क्षणी मोदपूर
मना मुक्याने प्रभुपाय चेप। प्रकाश येईल पहा अपाप।।

असे विजेची कळ सत्पदांत। पदा धरी तेज भरे घरात
सदैव जो दाबिल पाय त्याचे। घरात नाचे बिजली तयाचे।।

अहा मला त्वत्कळ रे मिळाली। मदीय चिंता सगळी पळाली
अता न सोडीन कधीच पाय। चिर-प्रकाशे तम दूर जाय।।

प्रकाश येता मम मंदिरात। बसेन मी नाचत गीत गात
तव प्रभु! प्रेमसुधा पिऊन। खराखुरा पागल मी बनेन।

नुरेल माझे मज देहभान। न भूक लागेल न वा तहान
सुखाश्रु नेत्रांतुन चालतील। तनूवरी रोम उभारतील।।

प्रकाश नाचेल अनंतरंग। सुदास नाचेल डुलेल दंग
बनेल वेडाच बनेल मत्त। तुझ्यात जाईल मिळून भक्त।।

जलात जाती मिळुनी तरंग। सदैव एकत्रच अंग रंग
धरुन राही सुम नित्य वृंत। तुझ्यात जाईल मिळून भक्त।।

प्रकाश येवो सदनात थोर। हो समस्त प्रभु चित्तघोर
सदा प्रकाशास्तव मी भुकेला। प्रकाश द्यावा प्रणती पदाला।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, एप्रिल १९३३

हृदयाचे बोल

मला तुझ्यावीण कुणी कुणी न। खरोखरी मी तुजवाण दीन
नसेच आधार मला कुणाचा। मला विसावा पद- सारसाचा।।

सख्या जिवाचा मम आसरा तू। उदार माता मज वासरा तू
गड्या दिलाचा मम दिलरुबा तू। म्हणेन मी संतत एक तू तू।।

मदीय तू बोध मदीय मोद। मदीय चित्ता प्रभु! तू विनोद
मदीय संगीत मदीय गान। त्वमेक रे जीवन मामकीन।।

मदीय तू खान मदीय पान। मदीय तू स्थान मदीय मान
मदीय तू सौख्य मदीय ठेवा। तुझ्याविणे काहि न देवदेवा।।

तुझाच आधार तुझा विसावा। तुझाच हे तात! करीन धावा
तुलाच मारीन सदैव हाका। कृपांबराने निज बाळ झाका।।

तुझ्यावरी सर्व मदीय भार। तुझ्यावरी सर्व सख्या मदार
तुझेच माते जरि बंद दार। मदीय दु:खास न अंत पार।।

तुझ्यावरी सर्व उड्या मदीय। सख्या जरि प्रेम नुरे त्वदीय
तरी न सत्कर्म घडेल हाती। समस्त हे जीवन होइ माती।।

न जीव पंखाविण पाखरास। न आस गायीविण वासरास
पतंग सूत्राविण ना तरंगे। तुझ्याविणे दास तुझा न रंगे।।

न मूल हासे जरि अंबिका न। चकोर दु:खी जरि चंद्रिका न
वने वसंताविण हासती न। तुझ्याविण दास तुझा सुदीन।।

सुचे वसेताविण ना पिकाला। सुके जरी पाऊस ना पिकाला
जळाविणे जाइ जळून मीन। सुके तसा दास भवद्विहीन।।

अनाथनाथा! उघडा जगात। दरिद्र दु:खी पडलो पथात
मदीय तू लाज न राखशील। तरी निज ब्रीद गमावशील।।

सख्या अनंता करुणावसंता। तुझ्याविणे कोण कलंकहंता
मदीय मालिन्य धुवावयाते। तुझ्याविणे कोण समर्थ माते।।

करी तुझे मूल धुवून नीट। करी मुलाला शिकवून धीट
तदीय घे हात तुझ्या करोत। पडेल ना तो न घडेल घात।।

असो तुझा हात मदीय माथा। न दूर लोटी मज दीननाथा
मदंतरंगी करुनी निवास। सुवास द्यावा मम जीवनास।।

दिला कशाला नरजन्म माते। जरी न तत्सार्थक होइ हाते
दिली कशाला तनु मानवाची। जरी असे वृत्ति सदा पशूची।।

अमोल मोती मजला दिलेस। धुळीत मी मेळविले तयास
अयोग्य हाती बहुमोल ठेवा। दिला किमर्थ प्रभु देवदेवा।।

अमोल लाभे नरजन्म देवा। परी घडेना तव अल्प सेवा
कशी तुला ही नरजन्ममाती। पहावते? सांग, जयास गाती।।

मलाच ठावी मम वेदना रे। न कल्पना येइल ती परा रे
किमर्थ मी ढाळित आसवांते। तुलाहि माहित नसेल का ते?।।

अनाथ दोषी दुबळा गरीब। सदैवत्याचे रडणे नशीब
न देव ना मानव त्या न कोणी। सदा रडावे तिमिरी बसोनि।।

सकाळ होवो अथवा दुपार। प्रभात किंवा रजनी गंभीर
मला असे एकच काम साचे। अखंडनेत्राश्रुविमोचनाचे।।

रडून रात्रंदिन दोन्हि डोळे। फुटून जावोत बनोत गोळे
तुला नसे भाग्य बघावयाचे। नुरे तरी कामच लोचनांचे।।

परोपरी मी तुज आळवीन। सदैव गीते रचुनी नवीन
तुझी घडो भेट न वा घडो रे। मुळी तुझे गीत तरी असो रे।।

मुखी असो नाम तरी निदान। तयास मी मानिन मन्निधान
न आठवी माय जरी मलास। न बाळ केव्हा विसरेल तीस।।

कितीहि झाले जरि खोडसाळ। तरी उराशी धरि माय बाळ
मदीय माता परि फार मानी। न पुत्रहाका परिसे हि कानी।।

सदैव माता जपती मुलांना। सदैव माद्या जपती पिलांना
जगात माता विसरेल बाळ। तरी जगाचा जवळीच काळ।।

मला न पोटी धरिशील आई। मला न नेत्री बघशील आई
कशास हा जन्म तरी दिलास। मला अहोरात्र रडावयास।।

न आत्महत्या करण्यास वीर। जरी बघाया तुजला अधीर
न रोगही मित्र बनेल पाही। न देव त्याला जगि कोणि नाही।।

रडे रडे सतत तू रडे रे। न जोवरी त्वत्तनु ही पडे रे
रडावयाचाचि तुझा स्वधर्म। रडावयाचे करि नित्य कर्म।।

निराश होतो बनतो भ्रमिष्ट। विनिंदतो व्यक्ति जगद्-गरिष्ठ
समस्त माते हसतात लोक। कुणा कळे आंतर आइ! शोक।।

असाच हा चंचल दुर्विचार। वदून ते हासती सान-थोर
तुझ्या मुलाची करिती टवाळी। मुका बिचारा परि अश्रु ढाळी।।

अनंत आनंद तुझ्या जगात। न मी रडावे कधिही मनात
सदैव देवा मजला हसू दे। कधी उदासीन न रे बसू दे।।

हसे सदा मद्वदनी असावे। मदास्य हे खिन्न कधी नसावे
असे जरी वाटतसे मनात। सदा उभे अश्रुच लोचनात।।

भरुन येती मम नेत्र देवा। मला कळेना मम पापठेवा
मला न तत्कारण ते कळेना। मदश्रुधारा कधिही सरेना।।

वसंत येई पिक गोड गाई। वनस्थली रम्य सजून राही
फुलाफळांना प्रभु ये बहार। मदीय नेत्री परि
अश्रुधार।।

शरद ऋतू ये सुखद प्रसन्न। धरा सधान्या सरिता प्रसन्न
प्रसन्न आकाश प्रसन्न तारे। मदीय नेत्री परि अश्रु बा रे।।

विषाद जाऊन विकास येवो। अकर्मता जाउन कर्म येवो
निशा सरोनी हसु दे उषेला। वरो सदा मन्मन जागृतीला।।

सरोनी अंधार उजेड येवो। निबद्ध माझी मति मुक्त होवो
स्वतंत्रतेच्या गगनी उडू दे। विचारनक्षत्रफुले खुडू दे।।

कधी न आता प्रभु मी रडावे। विशंक उत्साहभरे उडावे
स्वपंख आनंदुन फडफडावे। वरीवरी सतत मी चढावे।।

सदैव उत्साह असो मनात। सदैव सेवा असु दे करांत
असो सदा शांति मदंतरात। भरुन राही मम जीवनात।।

अखंड आकर्षुनिया ग्रहांस। सभोवती नाचवि त्या दिनेश
पदांबुजाभोवती इंद्रियांस। धरुनिया लावि फिरावयास।।

प्रदक्षिणा ती तुजला करोत। तव प्रकाशे विमल नटोत
हरेल अंधार सरेल रात्र। तुझ्या प्रसादा बनतील पात्र।।

सुचो रुचो ना तुजवीण काही। जडो सदा जीव तुझ्याच पायी
तुझाच लागो मज एक छंद। मुखात गोविंद हरे मुकुंद।।

 तुझाच लागो मज एक नाद। सरोत सारेच वितंडवाद
तुझा असो प्रेमळ एक बंध। मुखात गोविंद हरे मुकुंद।।

अनंत हे अंबर नीलनील। उभे न मागे जरि का असेल
तरी न ताराद्युति ती खुलेल। सुपार्श्वभूमी चढवीत मोल।।

समस्त मागे कृतिच्या मदीय। असो भवन्मूर्ति विलोभनीय
समस्त कर्मे पदकासमान। तुझ्या शुभांगी झळकोत छान।।

शुभकृतीची मम वजयंती। गळा तुझ्या घालिन भूषयन्ती
उरी तुझ्या सुंदर ती रुळेल। बघून त्वन्नेत्रनदी निघेल।।

मनोज्ञपुष्पासम गंधवंत। पवित्र तारांपरि दीप्तिमंत
सुरम्य मोत्यांपरि पाणिदार। असा कधी अर्पिन कर्महार।।

नसे मला ज्ञान खरी न भक्ति। नसे मला योग न ती विरक्ति
नसे तपस्या पदरात जाड। तरी तुझी मी करितोच चाड।।

कधी मदश्रु प्रभुजी पुसाल। कधी निजांकी निजबाळ घ्याल
तुम्हास मी मानित मायबाप। कधी बरे दूर कराल ताप।।

जरी मुलाला ढकलाल आज। जरी न राखाल तदीय लाज
जरी न पाजाल अनंत पान्हा। जगेल ना तो तरि दीन तान्हा।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, मे १९३३