नयनी मुळी नीरच नाही

नयनी मुळी नीरच नाही
करपून किती मम अंतर जाई।। नयनी....।।

रडूनी रडूनी सरले पाणी
वदुनी वदुनी शिणली वाणी
आत जळत परि निशिदिन पाही।। नयनी....।।

रडता मी ना आता दिसतो
लोक सकळही परि हा फसतो
अश्रुविणे रडणे अति दाही।। नयनी....।।

खाई किडा तो आता कळीस
भ्रमर आत पोखरी काष्ठास
शोक तसा हृदयास सदाही।। नयनी....।।

अमृतधारा ये घेऊन तव
शोकानळ हा प्रभु झणि विझव
आस उरे तव केवळ आई।। नयनी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

वेल

मी प्रभुराया! त्वदंगणांतील वेल
काळजी का न घेशील।।

मी एका या बाजुस पडलो आहे
वाट त्वत्कृपेची पाहे
त्वत्करुणेचे जल थोडे तरि मिळु दे
मज येथे जीव धरू दे
तू लक्ष जरा मधुनमधुन तरि देई
येईल धीर मम हृदयी
मज अंकुर मग फुटतील
मज पल्लव शुभ येतील
मम जीवन हे हासेल
ती येऊ दे मम भाग्याची वेळ
काळजी का न घेशील।। मी....।।

हे बघ किति रे! माझ्याभवती गवत
ते मजसि वाढु ना देत
मज झाकोळी गुदमरवी ते सतत
शिर वरि मुळि करू ना देत
हे खाऊनिया मारून टाकिल माते
उपटशिल जरी ना हाते
हे उपट विषारी गवत
जे मदंकुरा अडवीत
दे मला विकासा पंथ
ये सखया तू, मरण जरि न येशील
काळजी का न घेशील।। मी....।।

मज घालावे निज हातांनी पुरण
मग भरभर मी वाढेन
कधि खत घाली थोडे तरि तू राया
येईल भरारुन काया
कुणी काळजि ना आजवरी मम केली
म्हणून ही विकलता आली
परि पोशिल जरि कुणी मजला
प्रकटेल कला मम विमला
प्रकटेल दिव्यता सकला
मी त्वदंगणी म्हणूनिच झालो वेल
काळजी का न घेशील।। मी....।।

मग फुटतिल रे दिव्य धुमारे माते
मांडवी चढव निज हाते
दे छोटासा मंडप मज घालून
त्यावर प्रभुजि! पसरेन
कधि येतील ती फुले फळे मधु
मजला
लागेल ध्यान मन्मतिला
होईन अतिच उत्कंठ
कळि हळुच होइल प्रकट
तू होशिल बघुनी हृष्ट
मग सुंदरशी कितिक फुले फुलतील
काळजी का न घेशील।। मी....।।

जरि सकळ फुले सखया! ना फळतील
झडतील काहि गळतील
ती काहि तशी वांझ प्रभु! निघतील
कितिकांस किडी खातील
कितिकांस फळे धरतिल परि सडतील
वाढ ना नीट होईल
परि एक दोन तरि दिव्य
रसभरित मधुर तुज सेव्य
येतील फळे प्रभु भव्य
तव पद=-पूजा-कामी ती येतील
काळजी का न घेशील।। मी....।।

यापरि देवा! त्वदंगणी विकसू दे
बहरू दे, मुदे पसरू दे
मजमाजी जे आहे ते वाढवुन
त्वच्चरणकमळि वाहीन
परि वाढाया आहे करुणा-शरण
वाढेन सदय जरि चरण
मद्विकास त्वत्पूजार्थ
ना इतर हेतु हृदयात
हा एकच सखया हेत
फलपुष्पी हा वेल तवार्चन करिल
काळजी का न घेशील।। मी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, सप्टेंबर १९३२

जीवनतरू

प्रभु! जन्म सफल हा व्हावा
मम जीवनतरु फुलवावा।। प्रभु....।।
सत्संगतिसलिला देई
सद्विचार रविकर देई
वैराग्य बंधना लावी
हे रोप वाढिला लावा।। मम....।।

तू विकार वादळि पाळी
मोहाचे कृमि तू जाळी
श्रद्धेचे खत तू घाली   
टवटवित हरित शोभावा।। मम....।।

धैर्याचा गाभा भरु दे
प्रेमाचे पल्लव फुटु दे
सत्कर्मसुमांनी नटु दे
सच्छील-सुरभि पसरावा।। मम....।।

गुंगोत भक्तिचे भृंग
नांदोत ज्ञान-विहंग
कूजना करुत नवरंग
शांतिच्या फळी बहरावा।। मम....।।

बंधूंस सावली देवो
बंधूंस सौख्यरस देवो
सेवेत सुकोनी जावो
हा हेतु विमल पुरवावा।। मम....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

मज माहेराला नेई

येइ ग आई
मज माहेराला नेई।।

तगमग करितो माझा जीव
तडफड करितो माझा जीव
जेवि जळाविण ते राजीव
सुकुनी जाई।। मज....।।

वृक्ष जसा तो मूळावीण
फूल जसे ते वृंतावीण
मीन जसा तो नीरावीण
तसे मज होई।। मज....।।

सदैव येते तव आठवण
भरुन येती दोन्ही नयन
तगमग करिते अंत:करण
सुचेना काही।। मज....।।

शतजन्मांचा मी उपवासी
एक कणहि ना माझ्यापाशी
तू तर औदार्याची राशी
कृपेने पाही।। मज....।।

तुझ्याजवळ मी सदा बसावे
त्वन्मुखकमला सदा बघावे
भक्तिप्रेमे उचंबळावे
हेतु हा राही।। मज....।।

वात्सल्याने मज कवटाळ
तप्त असे मम चुंबी भाळ
प्रेमसुधा सुकल्या मुखि घाल
जवळी घेई।। मज....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

येतो का तो दुरून

येतो का तो दुरून
बघा तरि, येतो का तो दुरून।।

येतो का मम जीवनराजा
येतो का मम अंतरराजा
कंठ येइ गहिवरून।। बघा तरि....।।

केवळ त्याच्यासाठी जगलो
केवळ त्याच्यासाठी उरलो
हृदय येतसे भरून।। बघा तरि....।।

वाट बघोनी त्याची सतत
रडुनी रडुनी निशिदिन अविरत
डोळे गेले सुजून।। बघा तरि....।।

येईल केव्हा माझा जिवलग
मम हृदयाची होई तगमग
जीव जातसे झुरून।। बघा तरि....।।

येतांची मम जीवन राणा
ओवाळून मी पंचप्राणा
टाकिन त्याचेवरून।। बघा तरि....।।

जीवनवल्लभ पडता दृष्टी
धावत जाउन घालिन दृढ मिठी
जाइन तत्पदि मरून।। बघा तरि....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, एप्रिल १९३२

पूजा मी करु रे कैशी?

पूजा मी करु रे कैशी?
येशी परि, पूजा मी करु रे कैशी?।।

पडके हे घर माझे
कैसा बोलवू? हृषिकेशी!।। पूजा....।।

अश्रूंचा माझ्या हार
घालू का तो तव कंठासी?।। पूजा....।।

सुटतात जे सुसकारे
तेची संगीत, देवा! तुजसी।। पूजा....।।

जमले अपयश माझे
त्याच्या दाविन नैवेद्यासी।। पूजा....।।

द्याया तुजलागि योग्य
नाही काहिच माझ्यापाशी।। पूजा....।।

गोळा मी केल्या चिंध्या
कैशा दावू त्या मी तुजसी!।। पूजा....।।

मोती फेकुन देवा!
जमवित बसलो मी मातीसी।। पूजा....।।

त्वत्स्पर्श परि दिव्य होता
मृत्कण होतिल माणिकराशी।। पूजा....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३

कर्ममय पूजा

पूजा करिते तव हे, प्रभुवर!
अखिल चराचर, कर्म करोनी।। पूजा....।।

रवि, शशि, तारे
सतत अंबरि तळपून
तिमिर समस्त हरोनि।। पूजा....।।

सागर उसळति
धावती द्रुतगति तटिनी
ध्येय उदात्त धरोनी।। पूजा....।।

वारे वाहति
डोलति तरुतति कितितरी
फलपुष्पानि भरोनी।। पूजा....।।

जीवन हे मम
तेवि स्वकर्मि रमोनी
जाउ झिजून झिजूनी।। पूजा....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२