मम जीवन हरिमय होऊ दे!

मम जीवन हरिमय होऊ दे
हरिमय होवो
प्रभुमय होवो
हरिशी मिळून मज जाऊ दे।। मम....।।

रुसेन हरिशी
हसेन हरिशी
हरिभजनी मज रंगू दे।। मम....।।

गाईन हरिला
ध्याइन हरिला
भवसागर मज लंघू दे।। मम....।।

हरिनामाचा
पावक साचा
अघवन घन मम जळू दे।। मम....।।

हेत हरीचे
बेत हरीचे
सकल कृतींतून दावू दे।। मम....।।

वेड सुखाचे
लागो हरिचे
हरिशी मिळून मज जाऊ दे।। मम....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, जून १९३४

मजला तुझ्यावीण जगी नाही कोणी

मजला तुझ्यावीण जगी नाही कोणी।।
अगतिक निशिदीन
मजलागि वाटे
सदा दीन या लोचनी येई पाणी।। मजला....।।

मम कार्य जगी काय
न कळे मला हाय
स्थिती तात ही होत केविलवाणी।। मजला....।।

असेल जिणे भार
वाटे मला फार
जणू देई पाठीवरी कोणी गोणी।। मजला....।।

देवा दयाळा
हतदीन बाळा
घेऊन जा ठेवि निज पूज्य चरणी।। मजला....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

तव अल्प हातून होई न सेवा

तव अल्प हातून होई न सेवा
मम कंठ दाटे
किती खंत वाटे
हुरहूर वाटे अहोरात्र जीवा।। तव....।।

सेवा करावी
सेवा वरावी
मानी नित्य बोले असे फक्त देवा।। तव....।।

किती दु:ख लोकी
किती लोक शोकी
परि काही ये ना करायास देवा।। तव....।।

दिसता समोर
किती सानथोर
झटती, मला वाटतो नित्य हेवा।। तव....।।

हृदयात सेवा
वदनात सेवा
उतरे न हातात करु काय देवा।। तव....।।

खाणेपिणे झोप
मज वाटते पाप
वाटे सदा तात! की जीव द्यावा।। तव....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३

सदयहृदय तू प्रभु मम माता

सदयहृदय तू प्रभु मम माता
घेई कडेवर हासव आता।।सदय....।।

अगतिक बालक
कुणी ना पालक
त्रिभुवनचालक तू दे हाता।।सदय....।।

काही कराया
येई न राया
लाजविती मज मारिती लाथा।।सदय....।।

धावत येऊन
जा घरी घेऊन
वाचव मज तू नाथ अनाथा।।सदय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

दिसतात सुखी तात! सारेच लोक

दिसतात सुखी तात! सारेच लोक
हसतात जगी तात! सारेच लोक।।
मम अंतरंगात
परि ही निराशा
भरतात डोळे जळे, जाळि शोक।।दिसतात....।।

खाणे पिणे गान
जग सर्व बेभान
असे फक्त माझ्याच हृदयात दु:ख।।दिसतात....।।

फुलतात पुष्पे
गातात पक्षी
रडे एक मच्चित्त हे नित्य देख।।दिसतात....।।

जनमोददुग्धी
मिठाचा खडा मी
कशाला? तुझे जाई घेऊन तोक।।दिसतात....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

देवा! धाव धाव धाव

देवा! धाव धाव धाव
या कठिणसमयी पाव।।देवा....।।

अगणित रस्ते दिसती येथे
पंथ मजसि दाव।।देवा....।।

अपार गोंधळ बघुनी विकळ
देई चरणी ठाव।।देवा....।।

हा मज ओढी तो मज ओढी
करिती कावकाव।।देवा....।।

कुणी मज रडवी कुणी मज चढवी
म्हणू कुणास साव।।देवा....।।

घेऊनी जा मज प्रभु चरणी निज
नुरली कसली हाव।।देवा....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

दु:ख मला जे मला ठावे

दु:ख मला जे मला ठावे
मदश्रुचा ना
अर्थ कळे त्या
आत जळून मी सदा जावे।। दु:ख....।।

‘असे भुकेला
हा कीर्तीला’
ऐकून, भरुनी मला यावे।। दु:ख....।।

‘एकांती बसे
अभिमान असे’
वदति असे ते मला चावे।। दु:ख....।।

‘या घरच्यांची
चिंता साची’
ऐकून, खेद न मनी मावे।। दु:ख....।।

नाना तर्क
काढित लोक
नयनी सदा या झरा धावे।। दु:ख....।।

तू एक मला
आधार मुला
बसून तुझ्याशी विलापावे।। दु:ख....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, ऑक्टोबर १९३२