तेज पांढरे सांडत होते कृष्ण निळ्या लाटांत.
नांव आमुची वहात चाले वार्यावर भडकून
प्राणभीतीने जवळ येउनी मज बसला बिलगून
"पोहण्यास मज , भाऊ,येतें भिंवू नको बघ आंता."
धीराचे किति शब्द बोललों कांपतची तरि होता.
काळ-लाट तो एक येउनी नाव उलथुनी गेली !
फोडुनिया हंबरडा त्यानें काया मम वेढियली.
क्षण हृदयाचे स्पंदनही जणु बंद जाहलें आणि-
-विकार सगळे गोठुनि झालो दगडाचा पुतळा मी !
"याला धरूनी मरणे, कां जगणार लोटुनी याला ? "
विचार मनिंचा विजेसारखा मनांत चमकुन गेला.
दगडाच्या पुतळ्याने झर्कन नेले दगडी हात;
कमरेची ती मिठी हिसडुनी लोटियला लाटांत !
'दा-आ-आ-दा' शब्द करूणसा लाटांमधुनी आला ;
भुतासारखा हात पांढरा लाटावर क्षण दिसला.
दगडाचे पारि डोळे होते - कांही न त्याचे त्यांना !
करही भरभर कापित होते उठणार्या लाटांना !
वळुनि पाहिलें-काळ्जांत जी धड्की बसली तेव्हा,
भूत होउनी उरावरी ती बसते केव्हा केंव्हा !
कवी -
अनंत काणेकर
कवितासंग्रह -
चांदरात
- ६ फेब्रुवारी १९२६