व्यथा गात गात

कशाला दिले तू मला लक्ष डोळे
उभा तू उभा तू असा पाठ मोरा
किती जन्म गेले त्वचेचे तमाला
तरी बाहुली रे जपे अश्रु खारा

कहाणी मनाची तुझा शब्द पाळी
मुक्याने वहातो तमी देहमेणा
जरा बाजुला घे कुणी अश्रुबुंथी
नवा जन्म येतो पुन्हा त्याच वेणा

कुठे दूर झाल्या तुझ्या पायवाटा
जळे उंबर्‍याशी दिवा रात रात
धुक्याच्या दिशेला खिळे शून्य दृष्टि
किती ऊर ठेवू व्यथा गात गात


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण
- १०-५-५९

अश्रु दे तूं

लाविशी तूं कां खुळ्याने येथ वाती?
जा तुझीं तूं लाव दारें; कां उभी तूं?
जागती या अजगराच्या येथ राती;
पालवाया ऊर माझा कां उभी तूं?
तेवत्या डोळ्यांतल्या या बाहुल्यांना
एक साधा अन खरासा अश्रु दें तूं!


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण 

पूर

तुझे गात्र गात्र:
पावसाळी रात्र;
सारे. क्षेत्र ऐसें
झालें पूरपात्र

माझे दोन्ही डोळे:
गाव झोंपलेले;
मला नकळत
पुरांत बुडाले

हृदयाचें बेट:
कुठे त्याची वाट?
हातास लागावा
एक तरी काठ!


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण

अर्थ

हा भार हा शिणगार
हा उत्सव ही वाटचाल
या सगळ्यावर पसरलेल
अफवेसारख आभाळ

याचा अर्थ सांगण्यासाठी
कुठल्या तरी झाडावर
बसलेला असेल का
एखादा पक्षी उत्सुक-पर? 


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण

तिचे गाणे

किति गोड गोड वदलां,

हृदयी गुलाब फुलला.

खुडुनी तया पळाला,

कांटा रुतून बसला !

स्मृतिचा सुवास येई,

जिव हा उलून जाई.

कांटा हळूच हाले,

कळ येई- जीव विवळे.

फुलला गुलाब तसला,

कांटा कुठून असला !

छे, छे नको ग बाई,

राहूं कशी अशी ही ?


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १४ फेब्रुवारी १९२६.

त्याचे गाणे

एकहि वेळा न तुजला भरूनि डोळे पाहिलें,

परि जिव्हारी घाव बसुनी हृदयी जखमी जाहले !

मी फिरस्ता चुकुनि कोठे दारि तुझ्या पातलो;

सहज तुजला निसटतांना पाहिलें ना पाहिलें

नेसली होतीस तेव्हां शुभ्र पातळ रेश्मी,

त्यांतुनी आरक्त कांती और कांहींशी खुले!

रर्विकरीं सोनेरि उड्ती केस पिंगट मोकळे;

तपकिरी तेजांत डोळे खोल अर्थ भारिले !

पायिं त्या नाजूस गोर्‍या रूळ्त होते पैंजण,

रक्त तापे , अंग कांपे , हृदय पेटूं लागलें !

न कळता तुं प्रीतिचा खंजीर हृदयी मारिला,

ध्यानिंही नाहीं तुझ्या कीं काय माझें जाहलें !

स्मृति जशीच्या तशि असे ही-काळ कितिही लोटला;

हसत तुं असशील, परि या अश्रु भालीं रेखिले !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २८ डिसेंबर १९२४