दोन मी

तो कुणी माझ्यातला तो घनतमी ठेचाळतो
तरीही मी का चालतो ? तो बोलतो ना थांबतो

वाकणारया अन मला तो पाहुनिया मोडतो
झाकितो तो गच्च डोळे, श्वास वक्षी रोखतो

अग्निज्वालेच्यापरी तो नग्न आहे केशरी
कल्पना होती अशी अन अजून आहे ती खरी

कोणते पोशाख त्याचे चोरले मी भर्जरी
विकित बसलो येत हाटीं, आणि खातो भाकरी

तो उपाशी तरीही पोटी लाज माझी राखतो
राख होतानाही ओठी गीतगाणी ठेवितो

मैफलीला तो नि मी दोघेही जातो धावूनी
एकतो मी सूर , तो अन दूरचे घंटाध्वनी

तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो
दीन मी बांधून डोळे एकटा अन चालतो


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

गाडा

कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
रेटायचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर?
गाणें सुरू झालें तेव्हा चंद्र होता डोईवर,
गाणे मध्यावर आलें - चंद्र झाला रानभर,

गाणें संपले आणिक पक्षी फडाडला तमीं
आणि तसाच मिटला घरट्यांत ... अंतर्यामी.

वाट रानांतली किर्र, हुरहूर सर्वदूर,
चक्रें फिरती फिरती, करकरे चराचर,

कळ्या फुलतात येथे, पाने गर्द वाजतात,
फुलें घळतात येथे तरी पानें वाजतात,
पानें झडतात येथे तरी वारे वाजतात,
वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात.

कुणासाठी भरूं पाहे डोळां ऐसें उष्ण पाणी?
कुणासाठी झरताहे झरा गप्प ऐशा रानीं?
कुणासाठी झरताहे आयुष्य हें क्षणोक्षणीं?
कुणासाठी रस भरे सालोसाल फळांतुनी?

प्रश्न नव्हे पतंग अन्‌ खेचूं नये त्याची दोरी
आणि खेचली तरीही मिटेल का चिंता सारी?

कुणासाठी, कशासाठी, कुठे आणि कुठवर
ऐंसे घोकीत घोकीत व्हावयाचे दिगंबर.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

व्यथा गात गात

कशाला दिले तू मला लक्ष डोळे
उभा तू उभा तू असा पाठ मोरा
किती जन्म गेले त्वचेचे तमाला
तरी बाहुली रे जपे अश्रु खारा

कहाणी मनाची तुझा शब्द पाळी
मुक्याने वहातो तमी देहमेणा
जरा बाजुला घे कुणी अश्रुबुंथी
नवा जन्म येतो पुन्हा त्याच वेणा

कुठे दूर झाल्या तुझ्या पायवाटा
जळे उंबर्‍याशी दिवा रात रात
धुक्याच्या दिशेला खिळे शून्य दृष्टि
किती ऊर ठेवू व्यथा गात गात


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण
- १०-५-५९

अश्रु दे तूं

लाविशी तूं कां खुळ्याने येथ वाती?
जा तुझीं तूं लाव दारें; कां उभी तूं?
जागती या अजगराच्या येथ राती;
पालवाया ऊर माझा कां उभी तूं?
तेवत्या डोळ्यांतल्या या बाहुल्यांना
एक साधा अन खरासा अश्रु दें तूं!


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण 

पूर

तुझे गात्र गात्र:
पावसाळी रात्र;
सारे. क्षेत्र ऐसें
झालें पूरपात्र

माझे दोन्ही डोळे:
गाव झोंपलेले;
मला नकळत
पुरांत बुडाले

हृदयाचें बेट:
कुठे त्याची वाट?
हातास लागावा
एक तरी काठ!


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण

अर्थ

हा भार हा शिणगार
हा उत्सव ही वाटचाल
या सगळ्यावर पसरलेल
अफवेसारख आभाळ

याचा अर्थ सांगण्यासाठी
कुठल्या तरी झाडावर
बसलेला असेल का
एखादा पक्षी उत्सुक-पर? 


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण