मना, नीट पंथे कधीही न जावे,
नशापाणि केल्याप्रमाणे चलावे,
जरी वाहने मागुनी कैक येती
कधि ना तरी सोडिजे शांतवृत्ती!
दुकानांवरी लाविल्या लांब पाट्या
मना, थांबुनी वाच रे वाच बा त्या!
अकस्मात् दिसे जाहली जेथ गर्दी
तिथे चौकशी जा करायास आधी!
तिर्हाईत कोणी जरी जाय पंथे
तरी रोखुनी पाहणे त्याकडे ते!
अहा, अंगना त्यांतुनी ती असेल
वळोनी तरी पाहि मागे खुशाल!
कधी आगगाडीतुनी हिंडताना,
सिनेमा-तमाशे तसे पाहताना,
विचारी मना, त्वां न खर्चीत जावे,
सदा श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे!
कधी 'मंदिरी' जासि वाचावयाला
तरी इंग्रजी मासिकी ठेव डोळा!
कुठे छान चित्रे कुठे 'कूपने' ही
दिसे सर्व ते नीट कापून घेई!
कुणाचेविशी अंतरी होय तेढ,
निनावी तया धाडि रे 'नाँटपेड'!
तयाचेनि नावावरी लठ्ठ व्ही.पी.
मना, मागवी-त्याहुनी रीत सोपी!
सदा खाद्यपेयावरी हात मारी
बिले देइ सारुन मित्रासमोरी;
'अरेरे, घरी राहिले आज पैसे-'
खिसे चाचपोनी मना बोल ऐसे!
कुणाच्या घरी जा करायास दाढी,
कुणाची फणी घेउनी भांग काढी?
कुणाचा 'स्वयंटाक' टाकी खिशात,
घड्याळेहि बांधी तशी मनगटात!
कुणाच्या विड्य नित्य ओढीत जाव्या,
तशा आगपेट्याहि लंबे कराव्या!
चहा होतसे केधवा पै कुणाचा
अरे मन्न, घेई सुगावा तयाचा!
इथे पायगाडी तिथे वाद्यपेटी
इथे पुस्तके वा तिथे हातकाठी;
अशी सारखी भीक मागीत जावे,
स्वताचे न काही जगी बाळगावे!
कुणाचे असे मगले काहि देणे
कपर्दीकही त्यातली त्या न देणे
कधी भेटला तो तरी त्या हंसोनी
म्हणावे 'असे सर्व ते नीट ध्यानी!'
कुणाचे कधी लागले पत्र हाती
कुणाची तशी चिठ्ठी किंवा चपाटी;
तरी त्यातल्या वाचणे चार ओळी,
न ठावे कळे कोणते काय वेळी!
जिथे चालल्या खाजगी कानगोष्टी
उभी आणि धेंदे जिथे चार मोठी,
मना, कान दे तोंड वासून तेथे,
पहा लागतो काय संबंध कोठे!
कडी लागलेली दिसे आत जेथे,
मना सदगृहस्था, त्वरे जाय तेथे!
जरी पाहसी आत ना काक-अक्षे,
कशाला तरी त्या फटी अन् गवाक्षे?
नसे ज्याविशी ठाउके आपणाते,
मना, बोलणे 'दाबुनी' त्यावरी ते!
दुजांची जरी जाणशी गुप्त बिंगे
तरी धाव घे वृत्तपत्रात वेगे!
मना सज्जना, चार आण्यात फक्त
तुला व्हावयाचे असे 'देशभक्त'!
तरी सांगतो शेवटी युक्ति सोपी,
खिशामाजि ठेवी सदा गांधिटोपी!
कवी -
केशवकुमार
कवितासंग्रह -
झेंडूचीं फुलें