कोणीकडून ? कोणीकडे ?

कोणीकडून ? कोणीकडे ?
इकडूनि तिकडे, म्हणती गडे;
येथूनि तेथें, मागुनि पुढें,
हें तर नित्यच कानीं पडे;

पण समाधान का कधीं तयानें घडे ?

जिवलगे ?

कोणीकडे ग ?--- कोणीकडून ?
तिमिरामधेच तिमिरामधून;
घडीभर पडे मध्यें उडून,

ह्रदय हें उलें त्यामुळें निराशा जडून !

जिवलगे !

भोगांचीं अवशिष्टें तुसें
घशांत खुपती, लाणे पिसें;
मागें पुढें न कांहीं दिसे;
संशयडोहीं नौका फसे;

मग वदे---हरे राम ! रे, करावें कसें ?

जिवलगे !

गोत्यांत अशा आलों कुठून ?
कोठें जमइन कैसा सुटुन ?---
असें विचारी जेव्हां झटून,
भ्रमबुद‍बुद्‍ तो जातो फुटून;

मग अह ! विभिन्नच दिसे दृष्टि पालटून !

जिवलगे !

शून्य म्हणूं जें मागें पुढें,
त्यांतुनि दीप्ती दृष्टी पडे,
मधला उजेड तिमिरीं दडे;
निजधामाहुनि आलों, गडे,

तर, ऋणें फेड, चल सुखे स्वधामाकडे !

जिवलगे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- भडगांव, १७ ऑक्टोबर १९००

म्हातारी

घेउनि ह्रदयाशीं  सुतेला, स्थित मी दाराशीं
म्हातारी आली   तरंगत, मुलगीला दिसली;
हात पुढें केले   धराया तिला तिनें अपुले;
तिच्या शिरावरुनी  तधीं ती गिरक्या घे उडुनी;
हंसत वरी करुनी  हात, ती धरुं झटे फिरुनी;
त्या चलनें वरती   उडाली म्हातारी परती;
खिवळत तें बघतां  उडाया पाही मम दुहिता !
दडपण संसूतिचें   निधालें मम चित्तावरचें;
मन्मनही लागे   तरंगूं म्हातारीसंगें !
वारा तों तिजला   लागला दूरच न्यायाल.

चुम्बुनि वत्सेला वदें मी मग म्हातारीला ---

“ थांब, थांब ! जाशी अशी कां ? फिर ये गे मजशीं;

वयस्कता माझी   म्हणुनि जर करिसी इतराजी,
तर माझी सोनी   पाहुनी ये गे परतोनी !
तुजला पाहूं दे   तियेला, खिदळत राहूं दे !
मज वय विसरूं दे,   मुग्ध--मधु--बाल्यीं उतरूं दे !
ते दिन पुष्पांचे,   कोवळया किरणीं खेळाचे !
हे दित--हया !---
हे दिन चिन्तांचे   परंतु लटिकें हंसण्याचे !

हे दिन ......... जाऊं चे ! मला तुज गाणें गाऊं दे.

“ म्हणती म्हातारीं   तुज, कधीं होतिस तरुण परी ?
तव जनि मूति न दिसे,   अजामर रूप तुझें भासे !
कोठुनि तूं येशी,   न वदवे, कोठें तूं जाशी;

स्वैरपणें भ्रमसी, यदृच्छा मूर्तच तूं गमनी !

“ येशी तूं का गे   यक्षिणीकुंजांतुनि ?-- सांगे
कैशा वागुनियां   मिळवितो अक्षय यौवन त्या ?
झिजवित नित्य जिणें   तयांला पडतें का मरणें ?

वद त्यांची रीती ध्यावया आम्ही लागूं ती.

या गन्धर्वाचें   विमानच सूक्ष्मरूप साचें
वद असशी का तूं   तरंगत वातावरणांतून ?
सूक्ष्म देह धरुनी   असति का तुजवरि ते बसुनी ?
दिव्य असें गाणें   गात तें असतिल सौख्यानें,
तें मज पाप्याला   कशाचे ये ऐकायाला !
परि मम वत्सेतें   गमे तें परिसाया मिळतें;

म्हणूनिच उल्हासें अशी ही वेडावूनि हांसे !

“ अज्ञातामधला   मूर्त तूं गमसी ध्वनि मजला
अर्थ तुझा कोण   मला तो देइल सांगोन ?
कळेल जर मज तो,  तर जगीं भरला जो दिसतो ---

मी तो अंधार लोपवूं झटेन साचार !

“ खपुष्प तूं असशी   काय गे--सांगुनि दे मजसी.
तुझे रंग वास   न कळति मर्त्य मनवास;
जर ते कळतील   तर इथें स्वर्गच होईल !

मग तुज धरण्यातें मुलांपरि मोठे झटतिल ते !

“ स्वरूप सत्य तुझें   मुळींही तें मजला नुमजे;
तरी तुझ्या ठायीं  वसतसे अद्‍भुत तें कांहीं;
प्रत्यक्षांतुनि तें   परोक्षीं शीघ्र मला नेतें;
तेथें स्वच्छंदें   विचरतां मोद मनीं कोंदे;

मग गणमात्रांतें जोडणें केशवपुत्रातें,”


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
२५ जानेवारी १९०१

पायपीट

दुःखाच्या वाटेवर
गाव तुझे लागले;
थबकले न पाय तरी
हृदय मात्र थांबले!

वेशीपाशी उदास
हाक तुझी भॆटली
अन् माझी पायपीट
डॊळ्यातुन सांडली


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

उषःकाल होता होता

उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

अम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दु:खाचीही चालली दलाली !


उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे!
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली !


गीत : सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले

चांदण्यात फिरताना

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात ॥धृ.॥

निजलेल्या गावातून आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात ॥१॥

सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात ॥२॥

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात ॥३॥


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा!

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती ‘तात्पर्य’ माझे सारख्या खोट्या दिशा :
‘चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !’

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

एवढे दे पांडुरंगा !

माझिया गीतात वेडे
दु:ख संतांचे भिनावे;
वाळल्या वेलीस माझ्या
अमॄताचे फूल यावे !

आशयांच्या अंबरांनी
टंच माझा शब्द व्हावा;
कोरडा माझा उमाळा
रोज माधुर्यात न्हावा !

स्पंदने ज्ञानेश्वराची
माझिया वक्षांत व्हावी;
इंद्रियांवाचून मीही
इंद्रिये भोगून घ्यावी !

एकनाथाने मलाही
बैसवावे पंगतीला;
नामयाहाती बनावे
हे जिणे गोपाळकाला !

माझियासाठी जगाचे
रोज जाते घर्घरावे;
मात्र मी सोशीन जे जे
ते जनाईचे असावे !

मी तुक्याच्या लोचनांनी
गांजल्यासाठी रडावे;
चोख वेव्हारात मझ्या
मी मला वाटून द्यावे !

ह्याविना काही नको रे
एवढे दे पांडुरंगा !
ह्याचसाठी मांडीला हा
मी तुझ्या दारात दंगा !


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा