वियोगामुळें

कोणी सांप्रत लक्ष्य लावुनि जरा पाहील माझेकडे,
ध्यानाची निरखील पाठ तर तो निस्तेज माझ्या मुखीं;
देव्हार्‍यांत मनाचिया बसुनियां आहेस जी तूं सखी,
त्या तूझ्यावरी तें जडून रुसलें या बाह्य शून्या गडे !

नक्षत्रें, सुमने, सुवर्णनिधिही, मोत्ये, हिर्‍यांचे खडे,
सन्ध्या आणि उषा, नसे रविशशी, विद्युल्लताही निकी,
ऐसे दिव्य पदार्थ जोडुनि तुझ्या रूपास मी पारखीं;
सारेही दिसती फिके !--- तुजहुनी मातें सुधा नावडे !

माझ्या गे स्मरणीं तुझें गुण, मुखीं तीं इक्षुखंडें जशी,
होतीं नीरस तीं परी गुण सदा तुझे गोडीस देती सदा;
ज्या मत्क्लृप्ति तुझ्याविशीं, चघळितों त्या स्वांघ्रिं जैशीं मुलें;
तेणें रक्त मदीय आटत असे, निद्रा न येई मशीं !

उत्कष्ठा ह्रदयीं---मनोज्ञ तव ती पाहीन मूर्ति कदा ?
वेडापीरच जाहलों जिवलगे आहे वियोगामुळें !


 कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित 
- १२-११-१८९८

कविच्या ह्रदयीं जसें गुंगती --

कविच्या ह्रदयीं जसे गुंगती कवितेचे मधु बोले,
किंवा गायकमतींत झुकती ताना त्या सुविलोल,
तसे माझिया अन्तर्त्यामीं तुझिया सौन्दर्याचे,
विकास हंसती सखे निरंतर, ह्रदयंगम जे साचे !

अलिच्या गुंजारावी जैशी मधुलोलुपता खेळे,
वसन्तशोभासक्ति ज्यापरी कोकिलगानीं डोले,
मदीय चित्तव्यापारीं तूं तशीच मधुरे बोल,
खेळत असशी; तेणें आहे भ्रमिष्ट मन्मन झालें !


कवी - केशवसुत
- साकी
-१८९८

पद्यपंक्ति

आम्हीं नव्हतों अमुचे बाप,
उगाच कां मग पश्चात्ताप ?
आसवें न आणूं नयनीं
मरून जाऊं एक दिनीं !

अमुचा पेला दुःखाचा
डोळे मिटूनी प्यायाचा,

पितां बुडाशीं गाळ दिसे,
त्या अनुभव हें नांव असे !
फेंकुनि द्या तो जगावरी,
अमृत होउ तो कुणातरी !

जें शिकलों शाळेमाजी,
अध्याह्रत ही टीप तयाः---
“ द्वितीय पुरुषीं हें योजीं,
प्रथम पुरुष तो सोडुनियां ! ”


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- १८९८

प्रीति आणि तूं

रानोमाळ कुठेंतरी तुजविणें मी हिंडतां वेंचिलीं,
कांहीं रम्य फुलें, परी झडकरी निर्माल्य माझ्या करी
झालीं मी विरहाग्नितप्त असल्यायोगें; गडें त्यापरी
ओसाडींत दिशांचिया भटकतां गाणीं मला काभलीं,

डोक्याच्या भ्रमणामुळें बिघडुती विक्षिप्त तीं जाहलीं;
हीं गाणीं कुसुमेंहि तीं परि दिलीं मीं टाकुनी का दुरी ?---
नाहीं !--- ठेवियलीं जपूनि असती अद्यापि गे सुन्दरी !
तीं मीं कां ?--- ह्रदयीं विचारुनि पहा--कां बुद्धि ही सूचली ?

कोणी तीं कचर्‍यावजा समजुनी टाकावया लागला,
त्यालागूनि निषेधिलें, न कथिला हेतू तरी मी तया,
तो हा कीं जर भेटलीस तर गे दावीन तीं मी तुला,
तेणें व्यक्त तुला न राहिल सखे हें एवढें व्हावयाः---

दुदैंवें तुज सोडुणि जरि दुरी लागे फिरावें मला.
प्रीती आणिक तूं---शिवाय न सुचे कांहीं मना माझिया !


कवी - केशवसुत
- शार्दूलविक्रीडित 
- मुंबई, २७ नोव्हेंबर १८९३

क्षणांत नाहीसे होणारे दिव्य भास

( कवि, चित्रकार आणि तानसेन यांस जीं अलौकिक स्वप्नें, ज्या दिव्याकृति आणि जे गंधर्वालाप भासमान होतात, अहह---त्यांपैकीं किती थोडे मात्र त्यांस आपल्या करामतींत गोंवून ठेवितां येतात बरें ! आत्माराम आणि आका कोण हें सांगावयास नकोच. )

आत्माराम सुखें वनामधुनि तो होता जरा हिंडत,
तों झाला बघता दुरूनि सहसा कोण्या सुमुर्तिप्रत;
तीच्यामागुनि मोहुनी हळुहळु जायास तो लागला,
“ आहे ही पण कोण ? ” या क्षणभरी प्रश्नावरी थांबला.

“ रम्भे १ ” “ उर्वशि गे ” तशींच दुसरीं जीं त्यास होतीं प्रियें
नामें, त्यांतिल घेउनि फिरूनि तॊ बाही त्वरेनें तिये;
ती कांहीं तरिही वळे न, बघुनी तो विस्मया पावला;
जातां सन्निध, “ हो नवीनचि अहा ! कोणी दिसे ” बोलला !

कांहीं नांव नवीन देउनि तिला जेव्हां तयें बाहिलें.
तों तीनें वळनी प्रसन्न वदनें त्याच्याकडे पाहिलें;
त्या रूपद्युतिनें दिपूनि नयनें निर्वाण तो पावला,
तों अन्तर्हित, दृष्टीचा विषय तो, एका क्षणीं जाहला !

आकाची इतुक्यांत हांक परिसे आत्मा, घराला वळे;
आकाच्या हुकुमांत, साक्ष अवघी ती विस्मरूनी, रूळे;
कोणेका दिवशीं तिथें फिरतां तो गोष्ट त्याला स्मरे,
तच्चितीं, पण रूप नाम अथवा तीचें मुळींही नुरे !

आत्माराम सखेद होउनि वदे तो आपणाशीं असें ---
“ कांही सुन्दर देखिलें खचित मीं, यामाजि शंका नसे !
हा ! हा ! -हे जर सर्व भास धरतां येतील मातें, तर
पृथ्वीचा सुरलोक कीं बनवुनी टाकीन मी सत्वर !”


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- मुंबई २७ मार्च १८९३

दिवा आणि तारा

तार्‍याला जमिनीवरूनि वदला गर्वें दिवा हें असेंप :---
“ अस्पष्ट द्युति ही कीती तव ! तुझा रात्रौ कितीसा असे ----
लोकाला उपयोग ? मी बघ कसा तेजा निजा पाडितों
अंधारीं ब्यवहार सर्वहि जगीं माझ्यामुळें चालतो ! ”

तारा तो वरुनी दिव्यास वदला गम्भीर शान्त स्वरें ----
“ दीपा ! तूं म्हणतोस तें कवण तो लेखील खोटें बरें ?
जी वस्तुस्थिति ती परंतु बघता आहे जरा वेगळी,
अंधारावर तूझिया मम नसे बा ! योजना जाहली.

“ भांडीं, तों मडकीं, डबे ढकलिसी अंधार यांपासुनी,
बह्मांडास परन्तु मी उजळीतों, गेलीं युगें होउनी;
तेजानें वरुनी दिव्या ! खुलविसी तूं मानवी चेहरे,
आत्मे उज्ज्वल आंतले पण गडया ! होतात माझे करें !

“ ज्ञाते, आणि भविष्यवादीहि, कवी, ते चित्रकतें तसे,
मत्तेजें फिरतात, अन्य जन हे तूझ्या प्रकाशें जसे;
तूझ्यासन्निध जो कवी लिहितसे त्यालाच तूं पूस रे ---
“ दीपाच्या लिहितास तूं द्युतिबलें कीं तारकांच्या बरें ?”


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित 
- सष्टेंबर १८९२

प्रीतीची भाषा

होतों मी बसलों समीप रमणी एके दिनीं घेउनी;
‘ कोणाचा सखि ! तूं ? ’ म्हणोनि पुसलें लाडें तियेलागुनी.
तों माझ्या ह्रदयावरी निज शिरा प्रेमें तिनें ठेविलें;
‘ कोणाचा सखि ! मी ? ’ म्हणोनि म्हणतां मातें तिनें चुंबिलें.
‘ माझें कोण ? ’ पुसे, तिनें चढविला स्कन्धीं निजीं मत्कर;
‘ तुझें कोण ? ’ म्हणें तधीं मज तिनें आलिंगिलें सत्वर;
‘ माझ्याशीं नच बोलशी, तर तुझा मी नाहीं जा ! ‘ बोललों,
तों अश्रू गळती तिचे टपटपां !--- मी फार पस्तावलों !


कवी - केशवसुत
- शार्दूलविक्रीडित
२२-११-१८९०