स्फुट

(वृत्त – शार्दूलविक्रीडित)

हें हो चम्पकपुष्प रम्यहि जसें वर्णें सुगन्धें भलें,
ऐसें ऐसुनि कां बरें अलिवरें धिक्कारुनी त्यागिले? –
ही तों सत्य रसज्ञवृत्तिच असे, बाह्यांग त्या नावडे,
कौरुप्यींहि जरी वसे मधुरता तच्चित तेथें जडे!                     १

(वृत्त-पंचचामर)
करी द्विरेफ पद्मिनीवरी विहार हो जरी,
वरीहि पुष्पवाटिका तशा रसालमंजरी,
करीरपुष्प शुष्कही रसार्थ चाखितो तरी,
वरी रसज्ञलोकवृत्ति सूचवी जनान्तरीं.                               २

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)
या पुष्पावरुनी तयावरि असा अस्वस्थ गुंजस्वर
आलापीत फिरे, परी न रुचुनी ये तोंचि पद्मांवर,
त्यांते स्वाधिन जाणुनी करिशिरीं दानोदका पातला,
तो भुंगा विषयिस्थितीस करितो कीं व्यक्त वाटे मला!              ३

(वृत्त-मंदाक्रांता)
जैसा तैसा नवयुवतिहृन्मन्दिरीं कामदेव
वागूं लागे, हळुहळु तसा हट्ट काठिन्यभाव –
दुरी सारी तिथुनि, मग ते राहण्याला स्तनांत
येती, अर्थात कुच तरिच हे पीन काठिन्ययुक्त !                     ४

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)
“ आहे येत शरांस फेंकित इथें धन्वी कुणी सत्वरी !
मित्रांनो ! जपुनी असा ! स्वहृदयें भेदूनि घ्या नातरी ! –“
झाले स्तब्ध असें जधीं परिसुनी ते सर्व भांबावुनी,
येतांना दिसली विलोलनयना त्यांना तधीं सरस्तनी !              ५

(वृत्त-स्रग्धरा)
ऐन्यामध्ये महालीं निरखित असतां रुपशृंगार बाला,
आला मागूनि भर्ता, पुढति बघुनिया बिम्बयोगें तयाला,
बिम्बाच्या बिम्बभावा विसरुनि सरली लाजुनी त्या मागें,
कान्तें तों आयती ती कवळुनि हृदयी चुम्बिली गाढ वेगें!            ६

(वृत्त – शिखरिणी)
घराला मी आलों अटन करुनी फार दिवशीं,
करांही कान्तेला हृदयिं धरिली मीं दृढ अशी;
तरी आश्लेषेच्छा पुरि न मम होवोनि म्हटलें –
‘विधीनें कां नाहीं मज कर बरें शंभर दिले?’                         ७

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)
अन्योन्यांप्रत चुम्बुनी कितिकदां जायापती रंगलीं,
मर्यादा मग चुम्बनास करणें ही गोष्ट त्यां मानली,
तैं दन्तक्षतसक्त तीनच पणीं लावोनियां चुम्बनें,
सारीपाट तयीं भला पसरिला क्रीडावयाकारणे !                     ८

कमलिनीची ब्रम्हदेवास प्रार्थना :-
(वृत्त –शिखरिणी)

रसज्ञांचा राजा मधुप दिसतो श्यामल जरी,
मला आहे भारी प्रिय, धवल तो हंस न तरी;
बिसें भक्षी, पद्में अरसिक सवें तो कुसमुडी,
विधें ! तद्धस्तीं मत्कमल कधिंही बा न दवडीं.                      ९

लाह्यांवर कूट :-
तप्त पात्रिं कलिकाचया गडे
टाकितां, सुमनियुक्त तें घडे;
ती फुलें फणिकरास अर्पिलीं,
शेष तीं त्वरित मींच भक्षिलीं !                                      १०

(वृत्त-शिखरिणी)
अगा हंसा, चंचूमधिं विकसले पद्म धरुनी,
प्रमोदें डौलाने उडसिहि तसा नाचसि वनीं;
परी हास्यें कैसे विकल जन केले, बघ सख्या,
अली चैनींने त्वद्धत कमल सेवी म्हणुनियां !                      ११

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)
‘हे ग सुन्दरि पत्‍नी ! काय पदरीं तूं आणिलें झांकुनी?’
‘कोठे काय?’ म्हणूनि ती वदतसे वक्षाकडे लक्षुनी
‘ही हीं दोन फळे!’ म्हणूनि पदरा पाडूनि आलिंगुनी,
वक्षोजां कवळोनि तो पुसतसे ‘आले गडे का मनीं?’                १२

(वृत्त –शिखरिणी)
हिमाद्रीचेमागें उदधिसम तें मानस दुरी,
तयामध्ये भृंगा ! विधिरथगण क्रीडन करी;
कुठे त्या ठायीचां तुज कमलिनीभोग मिळणे ? –
सरीं मार्गीच्या, त्या त्युजनि अभिलाषा, विहरणें !                १३

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)
दृष्टीला दुरुनी गुलाब अमुच्या आकर्षितो लौकरी
जातां सन्निध त्याचिया रुतति तो कांटेहि अस्मत्करीं;
लोकीं रम्य तशीं सुखें झडकरी आम्हांस आकर्षिती,
भोगायास तयांस हो बिलगतां दु:खें अम्हां झोंबती.                १४

(वृत्त-शार्दुलविक्रीडित)
रात्री ते सुरतप्रबन्ध सुचुनी अभ्यासकाली बरे,
लागा पुस्तक हो तुम्ही वरिवरी चाळावयाला करें,
तों होवोनि जिन्यांत छुमछुम असा आवाज त्याच्या भयें
हस्तांतूनि सवेंचि पुस्तक गळो मेजावरी तें स्वयें !                 १५

पांथोक्ति – प्रत्युक्ति
(वृत्त-स्रग्धरा)
“कोणाची गे वनश्री नयनसुखद ही?” “मत्पतीची असे हे.”
“कां ऐशी शुष्क शोभाविरहित?” “अपरासक्त तो फार आहे.”
“त्यक्ता तापें जरी ही कुश परि रिझवी चित्त माझें स्वभावें.”
“ऐसें हो का जरि, त्वां तरि रसिकवरा ! स्वस्थ चित्तें रमावें !”    १६


कवी - केशवसुत

बायांनी धरुनी बळें

बायांनी धरुनी बळें प्रथम जी खोलीमधें घातली,
लज्जा व्याकुळ होउनी रडत जी कोनीं उभी राहिली,
तीचे अश्रु अळेंबळें पुसुनियां कोणी प्रयत्‍ने तिला.
घेऊनी कडिये असेल शयनीं नेण्यास तो लागला !                १

‘ये आता जवळी!’ म्हणोनि चुटकी देतो बरें हा कधीं,
ऐशी उत्सुक होउनी, पदर तो घेऊनि ओठामधीं.
शय्येसन्निध नाथ पाहत उगी लाजेमुळें बैसली,
कोणाची असतील लोलनयनें तीचेवरी लोभली !                  २

पानांच्या तबकांतुनी जवळच्या, ताम्बूल जो दीधला
कान्तेनें स्वकरें मुखांत दुरुनी, चावूनिं तो चांगला,
त्याचा भाग तिच्या मुखांत अपुल्या जिव्हेमुळें द्यावया,
कोणी घेत असेल पुष्टजघनी अंकावरी ती प्रिया !                 ३

लज्जा सोडुनि जी परन्तु विनयें अंकावरी बैसली,
हातांची रचिली तिनें पतिचिया कण्ठास हारावली,
तीचे उच्च कुचद्वया अपुलिया वक्षावरी दाबुनी,
कोणी पीत असेल ऐहिक सुधा वेगें तिला चुम्बुनी !              ४

केव्हा दन्त मुखावरी, स्तनतटीं केव्हा नखें रोवुनी,
गाढलिंगन देउनी, निजकरें श्रोणी जरा, तिम्बुनी,
केव्हां अंगुलि त्या हळू फिरवूनी अंकी स्वकान्तेचिया,
कोणी यत्‍न असेल तो करित ती कामोद्धता व्हावया!            ५

सान्निध्यांत पडो जराहि नच तें कान्तेचिया अन्तर,
यासाठी कचपाश सुंदर तिचा सोडूनियां सत्वर,
झाले केश सुरेख दीर्घ मग ते काळे तिचे मोकळे,
त्यांही घेत असेल कामुक कुणी बांधूनि दोन्ही गळे !            ६

कामानें जळतो परन्तु विरहें होउनि मी विव्हळ;
आहेना तुजला असाच सखये! जाळीत हा गे खळ ?
कैशी होशिल शक्त या रजनिला कंठावया सम्प्रति !
माझीही छळणूक तो करितसे कंटाळवाणी अति !               ७


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
- पुणे, १८८७

जयाजीराव शिंदे व तुकोजीराव होळकर

ज्यांनी बाहुबले रणांत सगळे जिंकूनियां हो अरि
कीतींचे ध्वज आपुले उभविले या आर्यभूमीवरी,
त्यांचे पुत्र अम्हांस आज सहसा सोडूनिया चालतां.
खेदानें न रडे खरा कवण तो सांगा मराठा अतां?                १

राणोजी – परिसूनि नांवच अहो ज्याचें मराठा स्फुरे,
मल्हारी - परिसूनि नांवच अहो ज्याचें मराठा स्फुरे,
हा ! हा ! तत्कुलदीप हे विझुनियां गेले भले आज ना !
हा! हा! तत्कुलवृक्षगुच्छ बरवे कोमेजले आज ना!              २




कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
जुलै १८८६

जरी तूं ह्या येथें असतिस सखे सौख्यद मला

जरी तूं ह्या येथें असतिस सखे सौख्यद मला,
तुझ्या तेथें वा मी जरिहि असतों लोलुप तुला,
तरी खासें झालें कितिक मजला सांग असतें? –
दुरावूं, अन्योंन्यां कवळुनि, दिलें आम्हिं नसतें.              १

त्वरेनें त्या क्रिडा मग उजळित्या या रजनितें,
-सरेना जी खेपा करित असतां मी इथतिथें,
- तुला वा मच्चित्रें क्षण दिसवुनी लाजवुनियां,
पुन्हां तीं झांकोनी, छल तव करी जी समयिं या.            २

‘प्रिये’ ‘कान्ते’ हीं मी मधुर अभिधानें मग किती
श्रुतिद्वारें चित्तीं तव दवडिलीं जाण असतीं !
न वा ऐसें. – तीं मी लिहुनि निजदन्तीं त्वदधरीं,
तुवां तीं वाचाया मुकुर धरितों मी तव करीं !                ३

‘प्रिये’ ‘कान्ते’ ऐशा मधुर अभिधानांस अधुना
लिहावें मीं पत्रावर लकडिनें या अहह! ना?
परी तींही आतां अतितर सुटोनी थरथर
पुरीं हाताच्यानें नच करवती गे हरहर !                      ४

पुरीं हाताच्यानें नच करवतीं तीं प्रिय जरी,
न वा डोळ्यांच्यानीं क्षण बघवतीं तेंवि अपुरी;
पुसाया तीं इच्छीं परि कर धजेना म्हणुनियां
कराया सांगें तें स्वनयनजलांला रडुनियां !                  ५


कवी - केशवसुत
वृत्त – शिखरिणी
१८८६

मरणकाल

(याचे मूळ The Death Bed हे काव्य Thomas Hood याने आपल्या एका बहिणीच्या मरणसमयी लिहिले.)

आम्ही तीचें श्वसन रात्रभर सचिंत हो निरखियलें,
श्वसन तिचें मृदु मन्द जें अमुच्या कानीं पडलें –                १

अम्हां त्यामुळे, तीचे वक्षीं आयुष्याची लाट
हेलकावते खालवर, असें समजायाला वाट.                      २

तेव्हां आम्ही कितीतरी पण हलक्यानें बोलावें,
सावकाशही तसें भोंवती फिरतांना चालावें !                     ३

जाणों तीचें लांबवावया आयुष्य अम्हीं आपुल्या
अर्ध्या किम्बहुना सगळ्याही शक्ति तिला अर्पियल्या.          ४

अमुच्या आशांनी भीतीला खोटसाळ हो म्हटलें,
तसें आमच्या भीतींनींही आशांला ठरवियलें !                  ५

आम्हांला ती भासे मेली जेव्हां ती निजलेली,
आणि अहह ! निजलेली जेव्हां हाय! हाय! ती मेली.           ६

कारण, नंतर पहाट आली अंधुक उदास तैशी
आणि हिमाच्या वर्षावाने काकडलेली ऐशी,                     ७

शिव ! शिव ! तेव्हां स्तब्धें पक्ष्में तिचीं सर्वथा मिटलीं,
- तिची आमुचीहुनी निराळिच पहाट तेव्हां झाली!             ८


कवी - केशवसुत
जाति – साकी
मार्च किंवा एप्रिल १८८६

उगवत असलेल्या सूर्यास

उदयगिरिशिरीं या त्वत्तुरंगी खुरांहीं
तुडवुनि उडवीली धूलि ही जैशि कांही ! –
द्युति बघुनि अशी ती चित्त माझें रमून,
दिनकर! मज बोधी तूज गाया नमून !                  १

नव सुरुचिर वल्ली या हिमस्नात यांनी,
नव रुचिर लतांनी या हिमालंकृतांनीं,
स्मितसम सुमनांनी पूजितां तूज आतां,
फिरुनि फिरुनि भास्वन् ! वन्दितों तूज गातां.        २

कवळुनि करजालें भूमिलागूनि, लाल
विलसितरुचिभासें फेंकितां तूं गुलाल
विकसितततरुमालाकेशपंक्तींत तीचे,
स्तवुनि फिरुनि तूतें वन्दितों मी मरीचे !              ३

अनुकरण करीं मी गाउनी या खगांचें,
तदिव सुमनतांचें वन्दुनी या लतांचें,
अनुसरत असें ही हांसुनी पद्मिनींस,
शरण तुजसि आलों मी असा नम्र दास !             


कवी - केशवसुत
वृत्त - मालिनी
- ४-डिसेंबर १८८५

खिडकीकडे मौज पहावयास

(वृत्त –उपजावी)
मजा पहायास विलोल बाला
सौधांवरी काञ्चनयुक्त जाला
तयीं त्वरेनें लगटून येती,
राहोनि अन्य व्यवहार जाती.                   १

जाळीकडे एक जवें निघाली
कचांतली बन्धनमुक्त झालीं –
पुष्पें, न बांधूं सुचलें तियेस,
रोधी करें ती परि केशपाश.                     २

कोणी, सखी रंगवितां पदाला-
ओढून, ये तूर्ण पहावयाला
लीलागती विस्मरली सदाची,
अलक्तचिन्हें उठली पदाचीं!                    ३

एकांत जों अंजन लोचनांत –
घालूनि, घालूं म्हणते दुज्यांत,
तशीच तों धांवुनि ये गवाक्षीं
काडी करीं राहुनि कुड्मलाक्षी !                ४

कोणी गवाक्षीं निज दृष्टि फेंकी,
नावी त्वरेनें फिटली तिचे की,
हस्तें निर्‍या आकळुनीच ठाके,
नाभींत तत्कङ्कणकान्ति फाके !            ५

(वृत्त –इंद्रवंशा)
अन्या त्वरेंने उठली पहावया,
लागे पदांच्या स्खलनीं गळावया
ती ओविली जी पुरती न मेखला,
अंगुष्ठमूलीं गुणमात्र राहिला!                  ६

(वृत्त-वसंततिलका)
लोलाक्ष हे भ्रमर ज्यावरि शोभतात,
आहेहि आसवसुवास भरून ज्यांत,
त्या त्यांचिया सुवनीं खिडक्या भरूनी
गेल्या-जणूं सचविल्याच सरोरुहांनी !       ७


कवी - केशवसुत
- नोव्हेंबर १८८५