विरहांतील जीवन

केवि सरे रजनी ! मज नीज न,

सरे कसा तरि कामकाजिं दिन. ध्रु०

विरहिं विकल तळमळतां, साजणि पळपळ निघतें युगसें जाण. १

मिणमिण करि असुदीप अंतरीं जळे कसातरि सजणाकारण. २

विरहपवनिं जरि ज्योत थरथरे, तगे आसपट, आड येइ घन. ३

तिळभरि परि नच उरलें तैलहि, जळे अतां तर वातहि त्याविण. ४

किति दिन बघशिल अंत साजणी, झरझर सरतें चंचल यौवन. ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग -बागेसरी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - २५ ऑक्टोबर १९३५

आज पारणें कां फिटलें ?

किति फुगशि फुलशि तूं छबिले !

लाजुनि मुरडुनि मुरकुंडि वळे छुम् छुम् चळती चरण खुळे ! ध्रु०

कोटि चंद्र नयनीं लखलखती, गालिं गुलाबहि किति फुलले ! १

अशि कशि बघशी दारुड्यापरी, भूत काय कुणि संचरलें ! २

तळमळ करिशी दिवस कितीतरी, आज पारणें कां फिटलें ? ३

स्मित गालीं, मधु ओठिं कांपरें, हसतिल तुजला गे सगळे ! ४

काजळ, कुंकूं, वेणिफणी कर, चढव साज सगळे अपुले ! ५

अशी उताविळ काय होशि गे ? सांज न होइल का चपले ? ६


कवी - भा. रा. तांबे
जाति - हरिभगिनी
राग - वसंत
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर

चौकीदार

अस्ताचलीं सूर्य, हें किर्र घन रान,
घाटींतली वाट, पायीं नसे त्राण. ध्रु०

ती गर्जना ऐक, हें हादरे रान !
ती मृत्युची हांक भयसूचना जाण. १

ये सांजचा पांथ, त्या थांबावायास
लावी इथे चौकि राजा दयावान ! २

हें झोपडें क्षुद्र, ती पाहिं परि खाट,
फळमूळकंदांस नाहीं इथें वाण. ३

त्या बोरजाळींत खुळखूळ वाहून
बोलावि ओढाहि करण्यास जलपान. ४

मी पेटवीं आग काटेरि झगर्‍यांत,
पाणी करीं ऊन, येईं करीं स्नान. ५

रे कोसचे कोस नाहीं कुठे गांव,
टेकावया अंग नाहीं कुठे ठाण. ६

घरची तुला ओढ, बघती तिथे वाट,
धोक्यामधें ऐक झोकूं नको प्राण. ७

निघतां उद्यां सूर्य, तूं लाग मार्गास,
दावीन मी वाट हातीं धनुर्बाण. ८


कवी - भा. रा. तांबे
जाति - किंकिणी
राग - दुर्गा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - २६ ऑक्टोबर १९३५

तें कोण या ठायिं ?

मी चालतां वाट, या येइं दारास,
घोटाळुनी पाय लागें स्वमार्गास. ध्रु०

पुरला निधी काय माझा कुठे येथ ?
हरपे इथे रत्‍न आधार जीवास ? १

ज्या जन्मजन्मांत शोधीं कुठे येथ
चिंतामणी काय लोपे जवळपास ? २

संदिग्ध मनिं लीन पूर्वस्मृती काय
जागूनि या ठायिं पिळतात ह्रदयास ? ३

जळल्या इथे काय आशा कधीं काळिं
ज्यांच्या मुळांतून नव पालवे आस ? ४

कां संचितीं गूढ सळसळ इथे होइ ?
किंवा फुटे वाट माझ्या भविष्यास ? ५

कां पापण्या येथ भिजती न कळतांहि ?
पोटांतुनी खोल कां येइ निश्वास ? ६

कां हें असें होइ ? कां कालवे जीव ?
तें कोण या ठायिं ज्याची धरूं कास ? ७


कवी - भा. रा. तांबे
जाति - किंकिणी
राग - खंबावती
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ६ जानेवारी १९३६

संगीत कलेप्रत

अतां राहु देइं नाम
भजनिं कळाहीन राम ! ध्रु०

रागरागिणीमधून
ऐश्वर्ये नटुन सजुन
येइ ह्रदयपट उघडुन
राम परमसौख्यधाम ! १

नृत्य करिति तुझे सूर,
भरुनि भरुनि येइ ऊर,
तान-लय-निकुंजिं चूर
राम इंद्रनील शाम ! २

नलगे मज पुजापाठ,
दंभाचा थाटमाट,
गायनि तव ह्या विराट
राम मुनिमनोभिराम ! ३

ऐकतांच तुझी टीप
उजळति जणुं रत्‍नदीप
स्वर्ग येइ का समीप ?
राम दिसे पूर्णकाम ! ४

ऐकतांच तुझी तान
घेई मन हें विमान.
तमःपटावरि उडाण !
विमल तेजिं घे विराम ५

मनचक्षुच्या भवती
थय थय थय नृत्य करिति
स्वर्ललना ज्योतिष्मति
ही पुजा खरी अकाम ! ६


कवी - भा. रा. तांबे
जाति - जीवनलहरी
राग - तोडी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १४ फेब्रुवारी १९३६

तरुणांस संदेश !

हातास ये जें, स्वनेत्रांपुढे जें, तया वर्तमाना करा साजिरें,

हेटाळुनी त्या अदृश्या भविष्यामधें बांधितां कां वृथा मंदिरें ?

जी 'आज' आली घरा माउली ती 'उद्यां'ची, स्वकर्मी झटा रंगुनी,

प्रासाद निर्मा स्वताच्या उद्यांचा इथे कर्मभूमीवरी जन्मुनी.

जो पाडि धोंडा अशक्ता, बली त्यावरी पाय रोवी, चढे तो वरी.

निःसत्त्व गाई करंटाच गाणीं स्वताच्या स्थितीचीं, बहाणे करी.

हातीं विटा त्या, चुना तोच, भव्य स्वयें ताज त्यांचा कुणी तो करी;

कोणा न साधे कुटीही; भविष्या रचाया हवें सत्त्व, कारागिरी.


कवी - भा. रा. तांबे
वृत्त - मंदारमाला
राग - भूप

कोठें मुली जासि ?

उगवे निशाकांत झाल्या दिशा शांत
न्हालें जगत्‌ काय क्षीराब्धि फेनांत ? ||ध्रु०||

या काळवेळेस निघतात वेताळ
नाचोन खिदळोन बेताल गातात ! ||१||

बाई, शरीरास उन्मादकर वास
तो आवडे यांस येतील अंगांत ! ||२||

गुंडाळुनी काम- धंदे मुली लोक
मातींत राबोन स्वगृहा परततात. ||३||

तरुवेलिच्या खालिं हे अंगणीं अंग
टाकूनिया स्वैर रमतात निभ्रांत ! ||४||

घालोनि चटयांस हे अल्पसंतुष्ट
स्वच्छंद तंबाखु पीतात खातात. ||५||

हीं पांखरें पाहिं येतात घरट्यांस
चंचूपुटीं भक्ष्य पिल्लांस नेतात. ||६||

तूं एकली मात्र कोठें मुली जासि ?
या राक्षसी वेळिं छाया विचरतात. ||७||


कवी - भा. रा. तांबे
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ११ नोव्हेंबर १९४१