जमादार

'काय जमादार तुझा शेवटील पाहरा ?
जागशि निमकास खरा, पाहर्‍यांत मोहरा !
क्षितिइं अर्धमग्न चंद्र वाट पाहि का सखिची ?
मदनापरि हा प्रवालवर्ण उधळी किरणशरां ! १

जागुनिया अंवशीचा दाट पालवीमधून
पक्षि, हांक दे प्रियेस, 'जाइन बाहेर जरा,'
'परवल बतलाव जाव ! रोकटोक फिर किसकी ?'
'परवली बात मजशि करिशि काय चाकरा ?' २

'मालिक तुम मैं नोकर कवराणिसाब, सही;
पर बंदा हुक्म का हुं, पहरेका काम बुरा !'
'सरली रे रात्र परी, परवलचें काम काय ?
हटकशील दिवसा का ? तूं आखडसासरा ! ३

'नहि तंबुर, बगुल नही, वर्दि नही, बजि अबतक;
अमल तिन बजनेका, हिरना नहि अभि उतरा !'
'सारि रात्र झोप नाहिं, ये हुशारि पवनिं गार,'
'नींद लेव बाइसाब !' नेक एक तुंच खरा !' ४


कवी - भा. रा. तांबे
जाति - दासी
राग - कलिंगडा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ६ ऑक्टोबर १९३५

ग्रीष्म

स्वारि बाइ केवि आलि !
घर्मि अंग अंग न्हालि !
आलि गालिं बाइ लालि,
उतरिन जलकुंभ मी ! ध्रु०

तापे शिरिं अंशुमालि,
आग आग भोवतालि,
रखरखीत ह्या अकालिं
अग्निच्या जिभा झळा ! १

तरुतळिं बसुनी विवशी
रवंथ करिति गाइम्हशी,
गुपचुप हे पशुपक्षी
दडति गुहाकोटरीं. २

पक्षि एकटा सुतार
ठकठक करि बेसुमार,
सारखा करी प्रहार,
ध्वनि गभीर खोल हा ! ३

पोपट पिंजर्‍यांत शांत
चित्रसा बसे निवांत,
श्वान हलुनि नखशिखांत
धापा हें टाकितें ! ४

वाटेवर तप्त धूळ,
फिरके ना मुळिं पाउल,
गांव जणूं निद्राकुल,
सामसूम चहुंकडे ५

आगीची उठे लाट,
तप्त भिंति, तप्त वाट,
तप्त वाट, तप्त खाट,
लाहि लाहि काहिली ! ६

ओढ दासिची नितांत,
आलां या वेळिं कांत !
पाय धुतें, बसा शांत,
वारा मी घालितें ! ७


कवी - भा. रा. तांबे
जाति - अरुण
राग - सारंग
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १८ ऑक्टोबर १९३५

विरहांतील जीवन

केवि सरे रजनी ! मज नीज न,

सरे कसा तरि कामकाजिं दिन. ध्रु०

विरहिं विकल तळमळतां, साजणि पळपळ निघतें युगसें जाण. १

मिणमिण करि असुदीप अंतरीं जळे कसातरि सजणाकारण. २

विरहपवनिं जरि ज्योत थरथरे, तगे आसपट, आड येइ घन. ३

तिळभरि परि नच उरलें तैलहि, जळे अतां तर वातहि त्याविण. ४

किति दिन बघशिल अंत साजणी, झरझर सरतें चंचल यौवन. ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग -बागेसरी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - २५ ऑक्टोबर १९३५

आज पारणें कां फिटलें ?

किति फुगशि फुलशि तूं छबिले !

लाजुनि मुरडुनि मुरकुंडि वळे छुम् छुम् चळती चरण खुळे ! ध्रु०

कोटि चंद्र नयनीं लखलखती, गालिं गुलाबहि किति फुलले ! १

अशि कशि बघशी दारुड्यापरी, भूत काय कुणि संचरलें ! २

तळमळ करिशी दिवस कितीतरी, आज पारणें कां फिटलें ? ३

स्मित गालीं, मधु ओठिं कांपरें, हसतिल तुजला गे सगळे ! ४

काजळ, कुंकूं, वेणिफणी कर, चढव साज सगळे अपुले ! ५

अशी उताविळ काय होशि गे ? सांज न होइल का चपले ? ६


कवी - भा. रा. तांबे
जाति - हरिभगिनी
राग - वसंत
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर

चौकीदार

अस्ताचलीं सूर्य, हें किर्र घन रान,
घाटींतली वाट, पायीं नसे त्राण. ध्रु०

ती गर्जना ऐक, हें हादरे रान !
ती मृत्युची हांक भयसूचना जाण. १

ये सांजचा पांथ, त्या थांबावायास
लावी इथे चौकि राजा दयावान ! २

हें झोपडें क्षुद्र, ती पाहिं परि खाट,
फळमूळकंदांस नाहीं इथें वाण. ३

त्या बोरजाळींत खुळखूळ वाहून
बोलावि ओढाहि करण्यास जलपान. ४

मी पेटवीं आग काटेरि झगर्‍यांत,
पाणी करीं ऊन, येईं करीं स्नान. ५

रे कोसचे कोस नाहीं कुठे गांव,
टेकावया अंग नाहीं कुठे ठाण. ६

घरची तुला ओढ, बघती तिथे वाट,
धोक्यामधें ऐक झोकूं नको प्राण. ७

निघतां उद्यां सूर्य, तूं लाग मार्गास,
दावीन मी वाट हातीं धनुर्बाण. ८


कवी - भा. रा. तांबे
जाति - किंकिणी
राग - दुर्गा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - २६ ऑक्टोबर १९३५

तें कोण या ठायिं ?

मी चालतां वाट, या येइं दारास,
घोटाळुनी पाय लागें स्वमार्गास. ध्रु०

पुरला निधी काय माझा कुठे येथ ?
हरपे इथे रत्‍न आधार जीवास ? १

ज्या जन्मजन्मांत शोधीं कुठे येथ
चिंतामणी काय लोपे जवळपास ? २

संदिग्ध मनिं लीन पूर्वस्मृती काय
जागूनि या ठायिं पिळतात ह्रदयास ? ३

जळल्या इथे काय आशा कधीं काळिं
ज्यांच्या मुळांतून नव पालवे आस ? ४

कां संचितीं गूढ सळसळ इथे होइ ?
किंवा फुटे वाट माझ्या भविष्यास ? ५

कां पापण्या येथ भिजती न कळतांहि ?
पोटांतुनी खोल कां येइ निश्वास ? ६

कां हें असें होइ ? कां कालवे जीव ?
तें कोण या ठायिं ज्याची धरूं कास ? ७


कवी - भा. रा. तांबे
जाति - किंकिणी
राग - खंबावती
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ६ जानेवारी १९३६

संगीत कलेप्रत

अतां राहु देइं नाम
भजनिं कळाहीन राम ! ध्रु०

रागरागिणीमधून
ऐश्वर्ये नटुन सजुन
येइ ह्रदयपट उघडुन
राम परमसौख्यधाम ! १

नृत्य करिति तुझे सूर,
भरुनि भरुनि येइ ऊर,
तान-लय-निकुंजिं चूर
राम इंद्रनील शाम ! २

नलगे मज पुजापाठ,
दंभाचा थाटमाट,
गायनि तव ह्या विराट
राम मुनिमनोभिराम ! ३

ऐकतांच तुझी टीप
उजळति जणुं रत्‍नदीप
स्वर्ग येइ का समीप ?
राम दिसे पूर्णकाम ! ४

ऐकतांच तुझी तान
घेई मन हें विमान.
तमःपटावरि उडाण !
विमल तेजिं घे विराम ५

मनचक्षुच्या भवती
थय थय थय नृत्य करिति
स्वर्ललना ज्योतिष्मति
ही पुजा खरी अकाम ! ६


कवी - भा. रा. तांबे
जाति - जीवनलहरी
राग - तोडी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १४ फेब्रुवारी १९३६