मेनकावतरण

आलि आलि दीप्तिशाली
कोटि चंद्र नेत्रिं भालिं
स्वर्गाहुनि खालिं खालिं
मेनका वसंतीं १

अवतरली जैं छुमछुम
जिरुनि तपाची खुमखुम
थरथरूनि रोम रोम
टकमक मुनि पाही ! २

लटपटला गाधिजमुनि
जोडी जी सिद्धि तपुनि
चरणिं तिच्या ती ओतुनि
श्वानासम लोळे ! ३

जय जय जय जय मदना !
ब्रह्मा-शिव-विष्णु-गणां,
न चुके तव शर कवणा,
ध्वज तुझा त्रिलोकीं ! ४


कवी - भा. रा. तांबे
जाति - मंदहसित
राग - खमाज
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - २४ सप्टेंबर १९३५

जय रतिपतिवर !

सुरासुरांचा चुरा करी स्मर,
मंत्रि शीतकर, सेनाधिपवर
मधुऋतु मृदुतर, युवतिनयन शर ! ध्रु०

वैरि भयंकर योगीश्वर हर,
सोडि तयावर मृदुल नयनशर;
जळफळला क्षोभला मुनीश्वर
झोडुनि परि त्या स्मर करि जर्जर ! १

डळमळलें अढळहि योगासन,
तृतीय नयनीं क्षोभ हुताशन,
धगधगला जणुं जाळी त्रिभुवन !
भस्म जाहला जळुनि कुसुमशर ! २

आटोपेना अशरीरहि परि
शरावरी शर सोडी हरावरि,
जेरिस ये हर, अस्त्रें आवरि,
आला शरणागत चरणांवर. ३

स्मरमीनध्वज फडके त्रिभुवनिं,
सुर-नर-खग-मृग लोळति चरणीं,
वृथा वल्गना प्रीतीच्या जनिं !
जय कविकुलगुरु ! जय रतिपतिवर ! ४


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग - मारवा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १ ऑक्टोबर १९३५

शरणागत

दारिं उभा शरणागत तव मी,
क्षुद्र जंतु अति भवसंभव मी. ध्रु०

दिशि दिशि वणवण करुनि खपुनि अति
धरुनि देहली करितों स्तव मी. १

गहन तिमिरिं चांचपत येइं वर
त्रिविध ताप सोसुनि नव नव मी. २

ताड ढकल ! हें सोडिं दार नच;
उभा अढळ तें उघडशि तंव मी ! ३


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग - केदार
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १ ऑक्टोबर १९३५

घर राहिलें दूर !

उरला दिवस अल्प, घोडें थकुनि चूर,

पथ रानिं चधणींत, घर राहिलें दूर. ध्रु०

असशील घरिं आज तूं गे बघत वाट,

प्राण स्वनयनांत, पोटांत काहूर. १

मुद्रा तुझी म्लान डोळ्यापुढे येइ,

नाहीं मला पंख, ह्रदयांत हुरहूर. २

या निर्जनीं रानिं दे कोण मज साथ ?

माम् त्राहि जगदीश ! होई न निष्ठूर ! ३


कवी - भा. रा. तांबे
जाति - किंकिणी
राग - भीमपलासी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ३ ऑक्टोअर १९३५

चुकला बाण

आलिस काय खिडकींतून गेलिस काय पळ ढुंकून

एक कटाक्षशर टाकून कासावीस जीव करून ? ध्रु०

आंबराईत झुळुक शिरून मोहर जाय जशी उधळून

शांत तळ्यांत पवन घुसून जाई शीघ्र जळ ढवळून !

आलिस काय, गेलिस काय ? १

मी पांथस्थ मार्गी जाइं, तुझिये दारिं ठरलों नाहिं,

धरिला नेम अन्यासाठिं चुकला बाण कां मज गांठि ?

आलिस काय, गेलिस काय ? २


कवी - भा. रा. तांबे
जाति - गंधलहरी
राग - हमीर
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - २ ऑक्टोबर १९३५

पाणपोईवाली

झाली ती ओणवी, तों पदर उरिं सरे सैल झाला, झुले तो

पाणी दे पाणपोईजवळ उभि, पितां ऊर्ध्वदृष्टी फुले तो !

बोटें तीं ओंजळीचीं विरळ, मग तिची धार बारीक झाली;

मद्येच्छू काय पीतो अविचल ? मदिराक्षी तरी काय घाली !


कवी - भा. रा. तांबे
वृत्त - स्रग्धरा
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

वारुणीस्तोत्र

जयतु जय भगवती ! जयतु जय वारुणी !
मूलमायाभगिनि जय जगन्मोहिनी ! ध्रु०

मूलशक्त्यंतरी
उठति लहरि न जरी
सृजन कवणेपरी
करिल मायाविनी ? १

केवि जगदंड हें,
सोममार्तंड हे,
रचिल नव पिंड हे
मोह नसतां मनीं ? २

कल्पनागार तूं !
मोहभांडार तूं !
पुरविशी सार तूं
शक्तिसहचारिणी. ३

देवदानव मिळुनि
धर्म निज सांडुनी
सागरा मंथुनी
काढिलें तुज गणीं ! ४

श्रीसहोदरिणि तूं !
अप्सरा-भगिनि तूं !
रतिसुखस्त्रविणि तूं !
जयतु जय भास्विनी ! ५

दुःखदलमर्दिनी,
विभवसुखवर्धिनी !
मोहिले ऋषिमुनी
जयतु उन्मादिनी ! ६

जय कराल-प्रिये !
मोहनिद्रामये !
मूर्त हास्य स्वयें
हटविकटहासिनी ! ७

देवि उदयोऽस्तु तव!
देवि विजयोऽस्तु तव !
जय उदे ! जय उदे !
जय उदे ! स्वामिनी ८


कवी - भा. रा. तांबे
जाति - सुरमंदिर