प्रिय गुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी, मात्र त्याला हे देखील शिकवा - जगात प्रत्येक बदमाषगकणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही, स्वार्थी राजकारणी असतात. जगात तसे असतात, अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतात, टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही!
मला माहीत आहे. सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत... तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा, आणि शिकवा विजयाचा आनंद संयमांन घ्यायला !
तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेषमत्सरापासून दूर रहायला शिकवा, शिकवा त्याला, आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला. गुंडाना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वांत सोपं असतं!
जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अद्भुत वैभव मात्र त्याबरोबरच, मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा सृष्टीचे शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांची अस्मान भरारी... सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर... आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं!
शाळेत त्याला हा धडा मिळू दे, फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेले अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी!
त्याला सांगा, त्यांन भल्यांशी भलाईनं वागावं, आणि टग्यांना अद्दल घडवावी. त्याला हे पुरेपूर समजवा, की करावी कमाल कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून... पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा! धिक्कार करणार्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर सत्य व न्यायासाठी पाय रोवून लढत रहा.
त्याला ममतेने वागवा पण लाडावून ठेवू नका. आणि हेही त्याला सांगा, ऐकावं जनांचं, अगदी सर्वांत.... पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून निकं सत्व तेवढं स्वीकारावं.
आगती तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बाणवा, अधीर व्हायचं धैर्य, अन् धरला पाहिजे धीर त्यांन जर गाजवायचं असेल शौर्य!
आणखीही एक सांगत रहा त्याला, आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा-हसत रहावं उरातलं दु:ख दाबून, आणि म्हणावं त्याला, आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको त्याला शिकवा, तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला, अन चाटुगिरीपासून सावध रहायला. माफ करा गुरुजी! मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे... पण पहा... जमेल तेवढं अवश्य कराच!
माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे हो तो!!!
अब्राहम लिंकन