सुंदर मुखकमल कस्तुरी मळवटीं । उभा देखिला तटीं भीवरेच्या ॥१॥
मकराकार कुंडलें श्रवणीं ढाळ देती । गळां वैजयंती मुक्तमाळा ॥२॥
शंख चक्र गदा पद्म चहूं करीं । गरुडवाहन हरी देखियेला ॥३॥
चोखा म्हणे सर्वं सुखाचें आगर । निरा भिवरा तिर विठ्‌ठल उभा ॥४॥


  -  संत चोखामेळा
उतरलें सुख चंद्रभागेतटीं । पाहा वाळुवंटीं बाळरुप ॥१॥
बहुता काळाचें ठेवणें योगियाचें । ध्येय शंकराचें सुख ब्रह्म ॥२॥
जयालागीं अहोरात्र विवादती । तो भक्ताचिये प्रीतीं उभा असे ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर । न कळे ज्याचा पार श्रुति-शास्‍त्रां ॥४॥


  -  संत चोखामेळा
मज तों नवल वाटतसें जीवीं । आपुली पदवी विसरले ॥१॥
कवणिया सुखा परब्रह्म भुललें । गुंतोनी राहिलें भक्त भाके ॥२॥
निर्गुण होतें तें सगुण पैं झालें । विसरोनी गेलें आपआपणा ॥३॥
चोखा म्हणे कैसा हा नवलाव । देवाधिदेव वेडावला ॥४॥


  -  संत चोखामेळा
दुर्लभ होतें तें सुलभ पैं झालें । आपण नटलें सगुण रुप ॥१॥
धरोनी आवडी पंढरीये आलें । उभेंचि राहिलें कर कटीं ॥२॥
युगें अपरंपार न कळे ज्याचा पार । वैष्णवांचा भार शोभतसे ॥३॥
दिंडया गरुड टके पताका शोभती । बागडे नाचती हरिदास ॥४॥
चोखा म्हणे ऐसें धरोनियां भीड । उभाउभी कोड पुरवितो ॥५॥


  -  संत चोखामेळा
आपुलिया सुखा आपणचि आला । उगलाचि ठेला विटेवरी ॥१॥
तें हें सगुण रुप चतुर्भुज मूर्ति । शंख चक्र हातीं गदा पहा ॥२॥
किरीट कुंडलें वैजयंती माळा । कासे सोनसळा तेज फांके ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर । रुप मनोहर गोजिरें तें ॥४॥


  -  संत चोखामेळा
अंगिकार करी तयाचा विसर । न पडे साचार तया लागीं ॥१॥
तो हा महाराज चंद्रभागे तटीं । उभा वाळुवंटीं भक्तकाजा ॥२॥
अनाथा कैवारी दीना लोभापर । वागवितो भार अनाथांचा ॥३॥
चोखा म्हणे माझी दयाळु माउली । उभी ती राहिली विटेवरी ॥४॥


  -  संत चोखामेळा
सर्वही सुखाचें ओतिलें श्रीमुख ।
त्रिभुवन नायक पंढरीये ॥१॥

कर दोन्ही कटीं सम पाय विटे ।
शोभले गोमटें बाळरुप ॥२॥

जीवाचें जीवन योगियांचें धन ।
चोखा म्हणे मंडन तिन्ही लोकीं ॥३॥


  -  संत चोखामेळा