योग याग जप तप अनुष्ठान । नामापुढें शीण अवघा देखे ॥१॥
नामचि पावन नामचि पावन । अधिक साधन दुजें नाहीं ॥२॥
कासया फिरणें नाना तीर्थाटणी । कासया जाचणी काया क्लेश ॥३॥
चोखा म्हणे सुखे जपता विठ्ठल । सुफळ होईल जन्म त्याचा ॥४॥
- संत चोखामेळा
पाहतां पाहतां वेधियेला जीव । सुखाचा सुखसिंधु पंढरीराव ॥१॥
माझा हा मीपणा हरपला जाणा । कळल्या आगम निगमाच्या खुणा ॥२॥
भवसागराचा दाता । विठ्ठल विठ्ठल वाचे म्हणतां ॥३॥
उभा राहुनि महाद्वारीं । चोखामेळा दंडवत करी ॥४॥
- संत चोखामेळा
मोहळा मक्षिका गुंतली गोडीसी । तैशापरी मानसीं नाम जपे ॥१॥
मग तुज बंधन न घडे सर्वथा । राम नाम म्हणतां होसी मुक्त ॥२॥
न करी कायाक्लेश उपवास पारणें । नाम संकीर्तनें कार्यसिद्धी ॥३॥
चोखा म्हणे एकांतीं लोकांती नाम जपे श्रीराम । तेणें होसी निष्काम इये जनीं ॥४॥
- संत चोखामेळा
केला अंगिकार । उतरिला माझा भार ॥१॥
अजामेळ पापराशी । तो ही नेला वैकुंठासी ॥२॥
गणिका नामेंचि तारिली । चोखा म्हणे मात केली ॥३॥
- संत चोखामेळा
वोखटें गोमटें असोत नरनारी । दोचि अक्षरीं पावन होती ॥१॥
न लगे अधिकार वर्णावर्ण धर्म । नाम परब्रम्हा येचि अर्थीं ॥२॥
योगायोगादि जपतप कोटी । एक नाम होठीं घडे तेंचि ॥३॥
चोखा म्हणे ऐसा आहे शिष्टाचार । नाम परिकर श्रीरामाचें ॥४॥
- संत चोखामेळा
भेदाभेद कर्म न कळे त्याचें वर्म । वाऊगाचि श्रम वाहाती जगीं ॥१॥
नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । पाप ताप नयनीं न पडेचि ॥२॥
वेदाचा अनुभव शास्त्रांचा अनुवाद । नामचि गोविंद एक पुरे ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच न कळे । विठ्ठलाचे बळें नाम घेतों ॥४॥