आला नरदेहीं पाहीं । शुद्धी नेणें ठायींचे ठायीं ॥१॥

करी प्रपंच काबाड । भार वाही खर द्वाड ॥२॥

न ये राम नाम मुखीं । नाहीं कधीं संत ओळखी ॥३॥

करी वाद अपवाद । नाही अंत:करण शुद्ध ॥४॥

मळ नासोनि निर्मळ । चोखा म्हणे गंगाजळ ॥५॥


 - संत चोखामेळा

 आपुला विचार न कळे जयांसी । ते या संसाराशी पशू आले ॥१॥

पशूचा उपयोग बहुतांपरी आहे । हा तो वायां जाय नरदेह ॥२॥

परि भ्रांति भुली पडलीसे जीवा । आवडी केशवा नाठविती ॥३॥

चोखा म्हणे नाम जपतां फुकाचें । काय याचें वेचे धन वित्त ॥४॥

 
  - संत चोखामेळा

 घरदार वोखटें अवघें फलकटें । दु:खाचें गोमटें सकळही ॥१॥

नाशिवंतासाठी रडती रांडा पोरें । काय त्याचें खरें स्त्री पुत्र ॥२॥

लावूनियां मोह भुलविलें आशा । त्याचा भरंवसा धरिती जन ॥३॥

सकळही चोर अंती हे पळती । चोखा म्हणे कां न गाती रामनाम ॥४॥


 - संत चोखामेळा

 अखंड समाधी होउनी ठेलं मन । गेलें देहभान विसरोनी ॥१॥

विधिनिषेध भेणें न मोडे समाधी । तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥

चालतां बोलतां न मोडे समाधी । मूळ अंतरशुद्धी कारण हें ॥३॥

चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा । जाणे तो विरळा लक्षामाजीं ॥४॥


 - संत चोखामेळा

 उदंड नागवले वाहावले पुरीं । ऐसी याची थोरी काय सांगों ॥१॥

ब्रम्हादिक जेणें बहु नागविले । सिद्ध ऋषि भुलविले येणें देख ॥२॥

इंद्रादि चंद्रा लावियेले काळें । कामाचिया बळें अहिल्येसी ॥३॥

प्रत्यक्ष शूळपाणि तपियां मुगुटमणी । तो हिंडविला वनीं भिल्लणीमागें ॥४॥

वृंदेचे घरीं विष्णु धरणें करी । अभिलाष करी मनें धरिला ॥५॥

चोखा म्हणे येणें बहु नाडियेले । काय आतां बोल जाय पुढें ॥६॥


- संत चोखामेळा

 असोनि नसणें संसाराचे ठाईं । हाचि बोध पाहीं मना घ्यावा ॥१॥

संतांची संगती नामाची आवडी । रिकामी अर्ध घडी जावों नेदी ॥२॥

काम क्रोध सुनेपरी करी दूरी । सहपरिवारी दवडी बापा ॥३॥

चोखा म्हणे सुख आपेआप घरा । नाहीं तर फजीतखोरा जासी वायां ॥४॥


 - संत चोखामेळा

 असोनि नसणें या नांव स्वार्थ । येथेंचि परमार्थ सुखी होय ॥१॥

स्वार्थ परमार्थ आपुलेची देहीं । अनुभवोनि पाहीं तुझा तूंची ॥२॥

सुख दु:ख दोन्ही वाहूं नको ओझें । मी आणि माझें परतें सारीं ॥३॥

चोखा म्हणे तोचि योगियांचा राणा । जिहीं या खुणा अनुभविल्या ॥४॥


 - संत चोखामेळा