हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ॥१॥

मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटूं कवण्या रीती ॥२॥

माझा लागतांचि कर । सिंतोडा घेताती करार ॥३॥

माझ्या गोविंदा गोपाळा । करूणा भाकी चोखामेळा ॥४॥


  - संत चोखामेळा

 बरें झालें येथें आलोंसे सायासें । सुख दु:ख लेशे भोगोनियां ॥१॥

मागिला लागाचें केलेंसे खंडण । तेणें समाधान वृत्ति होय ॥२॥

एकसरें मन ठेविले बांधोनी । निवांत चरणीं तुमचीया ॥३॥

चोखा म्हणे काम क्रोध तोडियेले । येर ते ही केले देशधडी ॥४॥


  - संत चोखामेळा

 नेत्रीं अश्रूधारा उभा भीमातीरीं । लक्ष चरणावरी ठेवोनियां ॥१॥

कां गा मोकलीलें न येसी गा देवा । काय मी केशवा चुकलोंसे ॥२॥

नेणें करूं भक्ति नेणें करूं सेवा । न येसी तूं देवा कळलें मज ॥३॥

चोखा म्हणे माझ्या जीविचा विसावा । पुकारितों धावां म्हणोनियां ॥४॥


  - संत चोखामेळा

 तुमच्या चरणी जें कांही आहे । तें सुख पाहे मज द्यावें ॥१॥

सर्वांसी विश्रांति तेथें मन ठेवीं । तें सुख शांति देई मज देवा ॥२॥

सर्वांभूती दया संतांची ते सेवा । हेंचि देई देवा दुजें नको ॥३॥

चोखा म्हणे आणिक दुजें नको कांहीं । जीव तुझे पायीं देईन बळी ॥४॥


  - संत चोखामेळा

 समर्थांसी रंकें शिकवण जैशी । माझी वाणी तैशी बडबड ॥१॥

शुभ हें अशुभ न कळे बोलतां । परि करीं सत्ता लंडपणें ॥२॥

उच्छिष्टाची आशा भुंकतसे श्वान । तैसा मी एक दिन आहें तुमचा ॥३॥

चोखा म्हणे एका घासाची चाकरी । करितों मी द्वारीं तुमचीया ॥४॥


  - संत चोखामेळा

 भवाचिया भेणें येतों काकुळती । धांवे करुणामूर्ति देवराया ॥१॥

पडीलोंसे माया मोहाचीये जाळीं । येवोनी सांभाळी देवराया ॥२॥

कवणाची असा पाहूं कोणीकडे । जीविचें सांकडें वारीं देवा ॥३॥

गहिंवर नावरे चोखियाचे मनीं । धांवें चक्रपाणी देवराया ॥४॥


  - संत चोखामेळा

 धांव घाली विठु आतां चालुं नको मंद । मज मारिती बडवे कांहीतरी अपराध ॥१॥

विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला । शिव्या देऊनी मारा म्हणती देव कां बाटला ॥२॥

तुमचे दारीचा कुतरा नका मोकलूं दातारा । अहो चक्रपाणी तुम्ही आहां जीमेदारा ॥३॥

कर जोडोनी चोखा विनवितो देवा । बोलिलो उत्तर याचा राग नसावा ॥४॥


  - संत चोखामेळा