अहो पतित पावना पंढरीच्या राया । भक्त विसाविया मायबापा ॥१॥
धांवे दुडदुडा आपुलिया काजा । येई गरुडध्वजा मायबापा ॥२॥
दाही दिशा उदास तुम्हांविण झाल्या । न करीं पांगिला दुजीयासी ॥३॥
चोखा म्हणे मज दावीं आतां वाट । मग मी बोभाट न करी कांही ॥४॥
- संत चोखामेळा
अहो करुणाकरा रुक्मिणीच्या वरा । उदारा धीरा पांडुरंगा ॥१॥
काय म्यां पामरें वानावें जाणावें । न कळे कैसें गावें नाम तुमचें ॥२॥
विध अविध कोणता प्रकार । न नेणों कळे साचार मजलागीं ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच न कळे । उगाचि मी लोळे महाद्वारीं ॥४॥
धरोनी विश्वास राहिलेसें द्वारीं । नाम श्रीहरी आठवीत ॥१॥
कळेल तैसें करा जी दातारा । तारा अथवा मारा पांडुरंगा ॥२॥
मी तंव धरणें घेवोनी बैसलों । आतां बोलों येयापरी ॥३॥
चोखा म्हणे माझा हाचि नेम आतां । तुम्ही कृपावंत सिद्धि न्यावा ॥४॥
आतां कणकण न करी वाउगी । होणार तें जगीं होउनी गेलें ॥१॥
दारीं परवरी झालोसे पोसणा । तुम्हांसी करुणा न ये कांहीं ॥२॥
होयाचें ते झालें असो कां उदास । धरोनिया आस राहों सुखी ॥३॥
चोखा म्हणे मज हेंचि बरें दिसे । न लावीं पिसें जीवा कांही ॥४॥
जिकडे पाहे तिकडे बांधलोंसे हरी । सुटायाचा करी बहु यत्न ॥१॥
परी तें वर्म मज न कळे कांहीं । अधिंकचि डोहीं बुडतसे ॥२॥
एका पुढें एक पडती आघात । सारितां न सरत काय करूं ॥३॥
चोखा म्हणे येथें न चलेंचि कांही । धांवे माझे आई विठाबाई ॥४॥
काय हें दु:ख किती ह्या यातना । सोडवी नारायणा यांतोनियां ॥१॥
जन्मावें मरावें हेंचि भरोवरी । चौर्यांशीची फेरी भोगाभोग ॥२॥
तुम्हांसी करुणा न ये माझी देवा । चुकवा हा गोवा संसाराचा ॥३॥
चोखा म्हणे माझा निवारावा शीण । म्हणोनी लोटांगण घाली जीवें ॥४॥
तुम्हांसी शरण बहुत मागं आले । तयांचे साहिले अपराध ॥१॥
तैसा मी पामर यातिहीन देवा । माझा तो कुढावा करा तुम्ही ॥२॥
नाहीं अधिकार उच्छिष्टा वेगळा । म्हणवोनी कळवळा पाळा माझा ॥३॥
चोखा म्हणे मज कांहीं तें न कळे । नामाचिया बळें काळ कंठी ॥४॥