दिव्यात्म प्रस्फूर्त हृग्दीत हें गोड गाईल कोणास गुंजारवी ?
आवेगुनी अंतरीचा उमाळा दाटून येतां कुठे ओतणे ?
उत्फुल्ल हृत्पुष्प ! आशादलांचा खुले रंग ! भोळी चढे टवटवी !
तत्केसरांच्या सुवासी परागां कुणां केस-भांगांतुनी पेरणे ?
उत्तुंग लाटा समुल्लोलुनी या सुहृत्सागराच्या नभीं चालल्या;
ही फेनमाला स्वर्गस्थिता कोण घेईल का तारका झेलुनी ?
मज्जीवनाच्या पहाटेस वृत्ती मनींच्या अशा तीव्र आतूरल्या;
शोधार्थ अदृष्ट रूपा ! म्हणूनी किती भागलों वाट ही चालुनी !
कुणी हासली; रम्य गोष्टी कुणांच्या; कुणी स्पर्शुनी अंग बेहोषवी;
कुणी लोभलीं; लोभ झाला कुणांचा; कुणी कीवलीं व्यर्थ रस्त्यावरी;
कित्येक ऐशी ! भ्रमिष्टापरी मी तरी – अंतरी एकला !- आळवी
रूपास ज्या, तें दिसेना कुठेही जरी थांबला सूर्य माथ्यावरी.
तें रूप येथे ! न् समुद्धारिणी भक्ति निशःब्द त्वल्लीन हो हर्षुनी
हा हाय ! निस्सार तों पार्थिवत्वांत निभ्रांत तूं राहसी गुंगुंनी.