आता अंत कशास पाहसि ? अता आभाळलें अंतरी;

विश्वाची घटना मला न उमगे; मानव्यता दुर्बळ.

केलें पाप असेल जें कधिं तरी मी जन्मजन्मांतरीं,

प्रायश्चित्त तदर्थ ना म्हणुनि गा, पाठीवरी हे वळ ?


न्यायाच्या निज मंदिरांत बसुनी साक्षीपुराव्याविना,

किंवा काय गुन्हा असेल घडला सांगीतल्यावाचुन,

न्यायाधीश असेल मानव तरी शिक्षा सुनावीत ना;

देवाच्या परि न्यायरीति असलें पाळील का बंधन !


होवो तृप्त – तथास्तु ! – निर्घृण प्रभो, ही न्यायतृष्णा तुझी;

फासाला चढल्यावरी नच दया याची, जरी पामर;

भूतां अप्रतिकारिता भ्रमविते यंत्रापरी शक्ति जी,

तीतें एक सहिष्णुता अचल अन् निःशब्द हे उत्तर.


किंवा हार्दिक बेइमान ठरतो नित्यांतला सत्क्रम,

तेथे प्रेमच एकनिष्ठ घडते अक्षम्य दुर्वर्तन !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा