अशी आली तुझी आठवण अचानक
जशी झाडांच्या गर्दीतून निघावी पाऊलवाट
उभा आहे मी घनदाट भूतकाळाच्या जंगलात
शिशिरागम हा बा. सी. मर्ढेकरांचा पहिला काव्यसंग्रह १९३९ साली प्रकाशित झाला.
कवितांना शीर्षक नाहीत, क्रमांक आहेत. 'शिशिरागम' ही पहिली कविता. बहुतेक कविता या शृंगाररसातील आहेत. चित्रदर्शी आणि गेय आहेत.
बहुतेक कविता 'सुनीत' वृत्तात रचल्या आहेत.
एकूण वीस कवितांचा हा संग्रह
मर्ढेकरांच्या शिशिरागम ह्या पहिल्या काव्यसंग्रहातील कवितांवर रविकिरण मंडळाची−विशेषतः त्यातील माधव ज्यूलियन् ह्यांची−छाया दिसून येते.
सूर कशाचे वातावरणी ?
सळसळ पानांची ? वा झरणी ?
खळखळ, ओहोटीचे पाणी ?
किलबिल शिशिरी केविलवाणी ?
कुणास ठाऊक ! डोळयां पाणी
व्यर्थ आणता; नच गार्हाणी
अर्थ; हासुनी वाचा सजणी
भास !- जरी हो खुपल्यावाणी.
माळावरल्या बांधावरती विलोलनयना जरा
थांबली कटीं ठेवूनी करा.
पश्चिमभागीं बाल कुणि तरी देवदूत चिमुकला
चितारीत मेघावली रंगला.
नीलाकाशीं शुभ्र कापसी खांद्यावर जांभळी
झाक ही हलक्या हातें दिली.
डोळ्याखाली अफाट माळहि थेट पुढे लागला
तयावर आम्रवृक्ष एकला.
मोहर भरला, चूतमंजिरी उन्मादक परिमला
पसरवी लोभविण्या गे तुला.
चरतां चरतां दूर पांगल्या गाई कुरणावरी
चालल्या ओढ्याकाठुन घरी.
नजर नाचरी नागसुंदरी विलासिनी रोखुनी,
झरझरा जाताना हासुनी,
गालावरल्या गोड खळीने शराब जी सांडली
मुशाफिर-तृष्णा तिने भागली.
तीरावरल्या भव्य शिलेवर एकाकी बैसुनी,
हाससी काय जलीं निरखूनी ?
मंद विखुरती मेघ गुलाबी गगनी, अवनीतली
गुलाबी पडली तत्सावली.
पादाग्राला चुंबुनि जातां झुळझुळणारे जल,
वाढवी कोमलता निर्मल.
तृणांकुरांवर बागडणारी बारिक पिवळी फुलें
पहुडलीं पदराखालीं पिले.
हिरवी राई पार पसरली हासत हलते तुला,
चालल्या कानगोष्टि कोठल्या ?
पल्लवभारे तव शीरावर लवलेल्या वेलिने
कांहि ना वनराणीला उणे !
मंजुल पवनी तरल लकेरी स्तब्ध करी पावलां,
सुचावा मार्ग कसा, जरि खुला ?
सौंदर्याचें जगतावरती पसरे बघ चांदणें
राहिले काय अता मागणें !