माळावरल्या बांधावरती विलोलनयना जरा

थांबली कटीं ठेवूनी करा.


पश्चिमभागीं बाल कुणि तरी देवदूत चिमुकला

चितारीत मेघावली रंगला.

नीलाकाशीं शुभ्र कापसी खांद्यावर जांभळी

झाक ही हलक्या हातें दिली.

डोळ्याखाली अफाट माळहि थेट पुढे लागला

तयावर आम्रवृक्ष एकला.

मोहर भरला, चूतमंजिरी उन्मादक परिमला

पसरवी लोभविण्या गे तुला.

चरतां चरतां दूर पांगल्या गाई कुरणावरी

चालल्या ओढ्याकाठुन घरी.


नजर नाचरी नागसुंदरी विलासिनी रोखुनी,

झरझरा जाताना हासुनी,

गालावरल्या गोड खळीने शराब जी सांडली

मुशाफिर-तृष्णा तिने भागली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा