दारुगोळा, स्फोट, भडका, बॉम्ब, घोषणा
शहरात ठिकठिकाणी आगी पेटल्या आहेत
तोडून टाका सारे निर्बन्ध – आज ‘बंद’ पुकारला आहे!
चतुर्दशीच्या चंद्राला पुन्हा आग लागली आहे बघा
आज खूप उशीरापर्यंत उजेड पडत राहील
अमावास्या येईपर्यंत त्याची राख होऊन जाईल!
आजचा पेपर इतका भिजलेला कसा?
उद्यापासून हा पेपरवाला बदलून टाका
‘या वर्षी पाचशे गावे पुरात वाहून गेली!’
कोण खाणार? कुणाचा हा वाटा?
दाण्यादाण्यावर लिहिले आहे नाव
शेठ सूदचंद मूलचंद जेठा!
साऱ्यांनाच येणार आहे मरण प्रत्येकाच्या वेळेनुसार
मृत्यू हाच न्यायाधीश, चालत नाही तिथे कमीअधिक
असे आयुष्य का नाही साऱ्यांना नेमके लाभत?
काय ठाऊक कसा कुठून घाव घालील अचानक
मी तर या आयुष्यालाच घाबरतो फक्त!
मरणाचे काय? ते तर एकदाच मारून टाकते!
उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहिले
किती तरी वेळ फांदी हात हालवत होती
निरोप घेण्यासाठी? की पुन्हा बोलावण्यासाठी?