डोळ्यांना सांग तुझ्या, इतक्या लोकात 

मोठ्या आवाजात एवढ्या, बोलू नका ना माझ्याशी? 

लोकांना माझे नाव ओळखू यायचे कदाचित!

 काळ्यासावळ्या नदीतीरावर गुलमोहोराचे झाड 

जसा लैलेने भांगात भरलेला सिंदूर 

बघा ना! धर्मच बदलून गेला बिचारीचा

 सांजेला जळणारी मेणबत्ती बघत होती वाट 

अजून कसा कुणी पतंग आला नाही इथे? 

असेल कुणी सवत माझी जवळच कुठे जळत!

केसात पाण्याचा थेंब असा चमकत आहे 

जसा बंदीत पडलेला एक एकाकी काजवा! 

काय बिघडले छत जरा गळू लागले तर?

रात्रीच्या झाडावर कालच पाहिला होता त्याला

आकाशातून चंद्र पिकून गळायला आला होता 

सूर्य येऊन गेला ना? झडती घ्या बरे त्याची!

 दारुगोळा, स्फोट, भडका, बॉम्ब, घोषणा 

शहरात ठिकठिकाणी आगी पेटल्या आहेत 

तोडून टाका सारे निर्बन्ध – आज ‘बंद’ पुकारला आहे!

 चतुर्दशीच्या चंद्राला पुन्हा आग लागली आहे बघा 

आज खूप उशीरापर्यंत उजेड पडत राहील 

अमावास्या येईपर्यंत त्याची राख होऊन जाईल!