हातात हात मिळवला, जरा विचार करुन नावही घेतले माझे,
जणू एखाद्या कादंबरीचे अंतरंग वरवर चाळूनच प्रथम पाहिले...
काही नाती पुस्तकात बंदिस्त असतानाच चांगली वाटतात!
या, सारेजण आरसेच वेढून घेऊ अंगभर
साऱ्यांना आपलाच चेहरा दिसत राहील त्यात
आणि साऱ्यांना सारेच सुंदर वाटतील इथे!
विचार भिरकावला मी बेफिकीरपणे अवकाशात
तो आता ईश्वरापाशी जाऊन पोहोचणार की त्याच्याही पार जाणार?
की पलीकडे जाऊनही पुन्हा माझ्यापाशीच येणार?
सारा दिवस बसलो होतो हातात भिकेचा कटोरा घेऊन
रात्र आली, चंद्राची कवडी आत टाकून निघून गेली
आणि आता हा कंजूस दिवस ही सुद्धा हिरावून घेईल!
आईचा आशीर्वाद : चंद्रासारखी देखणी वधू मिळेल!
आज संध्याकाळी ती ‘चंद्र’मुखी पाहिली फुटपाथवरुन
चंद्र भाकरीसारखा जळत राहिला रात्रभर!
आम्हाला गालिबने दिली होती दुवा
मागितले होते आमच्यासाठी हजार वर्षांचे आयुष्य
पण वर्षे तर दिवसातच संपून चालली आहेत!
केवळ हवाच भरलेली असावी या बॉम्बगोळ्यांमधून, बघा ना,
नुसती सुई टोचली तरी चुटकीसरसे जातील लोळागोळा होऊन!
मला वाटते, लोक पुरेशा त्वेषाने बॉम्ब बनतच नाहीत आजकाल!