जॉर्ज बर्नाड शॉने एकदा आपल्या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाची दोन तिकीटं चर्चीलला पाठवली. सोबत एक खवचट चिठी होती.

"तुला एखादा मित्रं असलाच तर त्याच्याबरोबर नाटकाला ये!"
"तुझ्या नाटकाचा दुसरा प्रयोग झालाच, तर नक्की येईन!" चर्चीलने त्याच कागदावर खाली लिहून पाठवलं!

चर्चील आणि नॅन्सी अ‍ॅस्टर (ब्रिटनच्या पहिल्या महिला खासदार) यांच्यातला किस्सा आहे.

चर्चिल हे खूप हजरजबाबी म्हणून प्रसिध्द होते. एकदा विरोधी पक्षाच्या सदस्या चिडून त्यांना म्हणाल्या," मी जर तुमची पत्नी असते तर तुमच्या चहात विष मिसळले असते." क्षणाचाही विलंब न लावता चर्चिल उत्तरले,"मी जर तुमचा नवरा असतो तर तो चहा आनंदाने प्यायलो असतो!"

 बांग्लादेशच्या युद्धात पाकिस्तान चा न भूतो न भविष्यती असा पराभव केल्यावर फील्डमार्शल सॅम माणेकशॉ लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले होते. पंतप्रधान म्हणून इंदिराजींनि खेळलेल्या राजकीय डावपेचांबद्दल त्यांनाही यथोचित श्रेय मिळतच होते.

पंतप्रधान व सैन्यप्रमुख म्हणून दोघांचेही संबंध सलोख्याचे होते. परंतु या दिग्विजयी कामगिरीनंतर इंदिराजींच्या भोवती असलेल्या काही विघ्नसंतोषी मंडळींनी इंदिराजींचे कान भरणे सुरू केले की माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर उठाव करणार आहे.

आपल्या देशाच्या सुदैवाने इंदिराजींनी कुठलेही अविचारी पाऊल न उचलता सरळ माणेकशॉ यांना पाचारण केले व स्पष्ट शब्दांत याबाबत विचारणा केली. सॅम यांनी अगदी सहजणे उत्तर दिले.

देवाने आपल्या दोघांनाही चांगले धारदार नाक दिले आहे जे आपण दोघेही एकमेकांच्या कामात कधी खुपसत नाही व यापुढेही खुपसणार नाही.

 इंग्लंडच्या उच्च संसदीय परंपरांचे उदाहरण म्हणून सांगितला जाणारा एक किस्सा...


एकदा इंग्लंडचे अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडण्यासाठी तेथील संसदेत पोचत होते. प्रवेशद्वारापाशीच एक विरोधी सदस्याला सिगारेट ओढताना पाहून ते कुत्सितपणे म्हणाले, 'महोदय, उद्यापासून ही चैन आपल्याला परवडणार नाही'.


अर्थसंकल्प मांडून झाल्या झाल्या तो विरोधी सदस्य उभा राहून म्हणाला की अर्थमंत्र्यांनी गोपनीयतेचा भंग केलेला आहे म्हणून मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो. संपूर्ण सभागृह अवाक होवून पाहत असताना त्या सदस्याने सकाळचा किस्सा समजावून सांगितला. अर्थसंकल्पात तंबाखुजन्य पदार्थांवरील कर वाढवल्यामुळे सकाळी बोललेले वाक्य म्हणजे अर्थमंत्र्यांनी गोपनीयतेचा शपथेचा भंग केलेला आहे.


अन आपल्याला आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे अर्थमंत्र्यांनी हा आरोप मान्य करून तडक राजीनामा दिला व तो लगेच मंजूरही करण्यात आला.

 महाराष्ट्र विधानसभेत एकदा सर्व सदस्यांच्या छापील माहितीच्या सूचीवरुन चर्चा झाली. या सूचीत अनवधानाने सर्व महिला सदस्यांच्या इंग्रजीतील नावामागे मिस लावले होते. याला विवाहित महिला सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यावर सभापती मधुकरराव चौधरी यांनी ती चूक दुरुस्त करण्याचा आदेश दिला आणि गंमतीने महिला सदस्यांकडे पाहून म्हणाले, ' मला खात्री आहे. सन्माननीय सदस्या आता 'मिसप्रिंट' वर आक्षेप घेणार नाहीत.

 खासदार पिलू मोदी हे मिश्किल गृहस्थ होते. लोकसभेत त्यांच्या विधानांनी खसखस पिकत असे. ते काही वेळा बिनधास्त बोलत असत. एकदा भाषणात टीका करताना ते म्हणाले, 'काही दुय्यम नेते आता स्वतःला सरकार समजू लागले आहेत. यांची पात्रता ती काय? हे नुसते आपल्या विद्यमान पंतप्रधानांचा पेटिकोट पकडून चालत चालत आलेत.' त्यावर सत्तारुढ सदस्यांनी 'पेटिकोट' शब्दाला आक्षेप घेतला आणि तो शब्द कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. अध्यक्षांनी त्यावर मोंदीकडे पाहिले. तर मोदी म्हणाले, 'महोदय, पण पेटिकोट काढून टाकला तर मग उरलं काय?' यावर तत्कालीन पंतप्रधानांनाही हसू आवरले नाही.

 दादाराजे खर्डेकर सातार्‍यात एक निवडणूक सभा घेत होते.

भाषण संपल्या नंतर लोकानी घोषणा दिल्या

शरद पवार झिंदाबाद.

त्यानंतर कोणीतरी जोरात ओरडले "दादा राजे......"

लोकाना जय म्हणावे /झिंदाबाद म्हणावे हे कळाले नाही एकदम शांतता पसरली.

कोणीतरी त्या घोषणेला उत्तर दिले ".खर्डेकर........"

सभेत एकदम हशा पिकला