जळल्या साऱ्या आशा मनीच्या
पुसल्या उरल्या त्याही खुणा
जीव भरेना, हौस पुरेना
वाढतोच घरी काम दुणा
रामचंद्र मनमोहन, नेत्र भरुन पाहिन काय?
सतत रमवि जे मनास, ज्यात सकल सुखनिवास सुधाधवल विमल हास अनुभवास येईल काय?
आई अंबे वसुंधरे, क्षमा नाम धरिसी खरे मम मानस-राजहंस पुनरपि मज देशिल काय?
जाउ तरी कोणास शरण, करील कोण दुःख हरण मजवरि होऊन करुण प्रभुचं चरण दावील काय?
अशनि राम, पाणि राम, वदनि राम,
नयनी राम
ध्यानी-मनी एक राम, वृत्ती राम जाणिल काय?
कविते! करिन तुला मी ठार ।।ध्रु .||
पूर्व कवींनी तुज रस पाजुनि मस्त बनविलें फार
रस बिस आतां मम साम्राज्यी कांहिं न तुज मिळणार
अलंकार मद-मत्त जहालिस धुंदि उतरतों पार
मोडुनि तोडुनि फेकुनि त्यांना दृष्टि न दिसुं देणार
पदोपदीं अवसानीं तुझिया करुनी घातक वार
सुवृत्त अथवा सुपदा कशि तुं हेंचि आतां बघणार
पदलालित्यें जना भुलविलें केले नाना चार
भावाची बहु हाव तुला परि अभाव तुज करणार
नादांतचि रंगुनी गुंगविसि रसिका करिसी गार
नाद तुझा तो नष्ट कराया समर्थ मी साचार
समृद्ध अर्थें असा मिरविला आजवरी बडिवार
अर्थाचा परि लेश यापुढें तुजला नच मिळणार
कोशावरि तव भार सर्व परि लाविन त्यांचे दार
शब्दांच्याचि न कृतिच्या दैन्ये मळविन तव संसार
व्याकरणाच्या अंकी बसुनी शुद्ध म्हणविशी फार
ठार करुनि परी तया तुझ्यावर ओतिन अशुद्ध धार
अपशब्दांचा असा तुझ्यावर करितों बघ भडीमार
जरी न मेलिस तरि मेल्यापरि होशिल मग बेजार
देश धर्म वा वीर विभूती तुज न अतां दिसणार
आता वणवण घुबडासंगे करविन तव संचार
मजलागीं तूं कोण समजशी मी तों कवि कालदार
कालदारचि कां शाहीरांचा फर्स्टक्लास सरदार
पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी
बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही !
धोंड्यात जावो ही लढाई | आपल्या बाच्याने होणार नाही
समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके
काखे झोळी, हाती भोपळा | भीक मागूनि खाईन आपला
पण हा वाह्यातपणा कुठला | आपसात लट्ठालठ्ठी
या बेट्यांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग
लेकांनो! होऊनिया रोग | मराना का!
लढाई का असते सोपी? मारे चालते कापाकापी
कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.'
कृष्ण म्हणे 'रे अर्जुना! | हा कोठला बे! बायलेपणा?
पहिल्याने तर टणाटणा | उडत होतास लढाया
मारे रथावरी बैसला | शंखध्वनि काय केला!
मग आताच कोठे गेला | जोर तुझा मघाचा?
तू बेट्या! मूळचाच ढिला | पूर्वीपासून जाणतो तुला;
परि आता तुझ्या बापाला | सोड्णार नाही बच्चमजी!
अहाहारे! भागूबाई! | म्हणे मी लढणार नाही;
बांगड्या भरा की रडूबाई | आणि बसा दळत!
कशास जमविले आपुले बाप? नसता बिचा-यांसी दिला ताप;
घरी डाराडूर झोप | घेत पडले असते!
नव्हते पाहिले मैदान | तोंवरी उगाच करी टुणटुण;
म्हणे यँव करीन त्यँव करीन | आताच जिरली कशाने?
अरे तू क्षत्रिय की धेड? आहे की विकली कुळाची चाड?
लेका भीक मागावयाचे वेड | टाळक्यात शिरले कोठुनी?'
अर्जुन म्हणे 'गा हरी! आता कटकट पुरे करी;
दहादा सांगितले तरी | हेका का तुझा असला?
आपण काही लढत नाही | पाप कोण शिरी घेई!
ढिला म्हण की भागूबाई | दे नाव वाटेल ते.'
ऐसे बोलोनि अर्जुन | दूर फेकूनि धनुष्य-बाण,
खेटरावाणी तोंड करून | मटकन खाली बैसला |
इति श्री चालचलाऊ गीतायाम प्रथमोध्यायः
- जयकृष्ण केशव उपाध्ये