मूळात यक्षरात्रि या नावाने ओळखला जाणारा हा सण काळाच्या प्रवाहात अनेक कथा उपकथांशी जोडला गेला आणि त्यातून हा सण साजरा करण्याची पद्धत बदलत गेली. सण साजरा करण्याच्या वेळोवेळी बदलणाऱ्या पध्दतीनुसार सुखरात्रि, सुखसुप्तिका, दीपप्रतिपदोत्सव, दिपालिका असे करीत करीत या सणाला दीपावली हे नाव प्राप्त झाले. सामान्य बोलीभाषेत या दीपावलीलाच दिवाळी असं म्हटलं जातं. दीपावलीशी जोडली गेलेली सर्व कथानके आणि उपकथानके व त्यातला इतिहास पाहिला असता दीपावली हा प्रकाशाचा सण आहे हे स्पष्ट होते. अज्ञान, असत्य आणि अन्यायावर मिळवलेला विजय हा सर्वार्थाने अंधारावर मिळवलेला विजय आहे. अंधारावर विजय मिळवून प्राप्त झालेले ज्ञान, सत्य आणि न्यायाचा प्रकाश सर्वदूर पसरावे यासाठीच आपण हा सण साजरा करतो.
सांप्रतकाळी दिवाळीचा सण साजरा करताना कुणाला या इतिहासाचे भान राहिलेले नसले तरी दिवाळीतले दिवे मात्र आपण अजुनही टिकवून ठेवले आहेत. हेही नसे थोडके असंच आपल्याला म्हणावं लागणार आहे. बदलत्या काळात दिवाळी हा एक व्यापारी स्वरूपाचा सण झाला आहे. दिवाळीशी सर्व प्रकारचा व्यापार जोडला गेला आहे. प्रत्येक दिवाळीच्या दिवसांत सर्व प्रकारचा व्यापार मोठ्या तेजीत असतो. म्हणुनच कदाचित व्यापाऱ्यांच्या तेजीला मोठा हातभार लावणारा हा दिवाळसण अनेकदा सामान्यांचं दिवाळं काढणारा ठरतो.
असं असलं तरी सलग पाच दिवस चालणारा एकमेव सण म्हणून दिवाळीच्या सणाचं विशेष महत्त्व आहे. अश्विन कृष्ण एकादशी अर्थात रमा एकादशीपासून हा सण सुरु होतो. दुसऱ्या दिवशी वसुबारस साजरी केली जाते. या दिवसाला गोवत्सद्वादशी असेही म्हणतात. भारतहा कृषिप्रधान देश असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी संध्याकाळी गाईची तिच्या वासरासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने अशी सवत्स धेनूची पूजा केली जाते. ज्यांच्या घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण स्त्रिया गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून पुरणपोळीचा नैवेद्य गाईला खाऊ घालतात.
त्यानंतरच्या दिवशी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या सणाशी काही कथानके जोडलेली आहेत. त्यापैकी एका कथानकानुसार हेमराजाचा पुत्र त्याच्याशी संबंधित कथित भविष्यवाणीप्रमाणे त्याच्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राला जीवनातली सर्व सुखे उपभोगता यावीत म्हणून राजा-राणी त्याचे लग्न लावतात. लग्नानंतरच्या चौथ्या दिवशी रात्री राजपुत्राचा मृत्यू होणार असल्याने त्या दिवशी रात्री त्या राजपुत्राच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून ठेवले जाते. संपूर्ण महालात मोठमोठे दिवे लावून लख्ख प्रकाश निर्माण केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून राजपुत्राची पत्नी त्याला जागे ठेवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा यम राजपुत्राच्या खोलीत सर्परूपाने प्रवेश करतो तेव्हा सोने-चांदी आणि दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने त्याचे डोळे दिपतात. अखेर यम आपल्या यमलोकात परत निघून जातो आणि राज पुगाचा प्राण वाचतो. याच आख्यायिकेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी घराबाहेर वातीचे टोक दक्षिण दिशेस असलेला दिवा लावून त्या दिव्यास मनोभावे नमस्कार करतात. यालाच यमदीपदान असे म्हणतात. असे दीपदान केल्याने अपमृत्यू टळतो अशी मान्यता आहे.
धनत्रयोदशीबद्दल अजून एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता देवेंद्राने असूरांच्या सोबतीने समुद्रमंथन केले, त्यावेळी त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली.तसाच एक अमृतकुंभ घेऊन धन्वंतरीही प्रकट झाला. या धन्वंतरीची पूजा याच दिवशी केली जाते. धन्वंतरी हा एक वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे मानले जाते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरीजयंतीचा असल्याने वैद्यमंडळी या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.
या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानले जाते. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.
जैनधर्मीय लोक या दिवसाला 'धन्य तेरस' किंवा 'ध्यान तेरस' असे म्हणतात. भगवान महावीर या दिवशी ध्यानातून योगनिद्रेत गेले आणि तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर दिवाळीच्या दिवशी त्यांचे निर्वाण झाले. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला.
त्यानंतरचा दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. यासंबंधी नरकासुराच्या वधाची आख्यायिका प्रसिद्ध आहे. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेत त्याचा कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला होता. त्यानंतर त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्यांच्या राज्यांतील हजारो स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अशा एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून मणिपर्वतावर त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अशा लालसेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानव समाजाला अत्यंत तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्रागज्योतिषपूर या त्याच्या राजधानीवर श्रीकृष्णाने चाल केली. त्यानेने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करीत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला खूप आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील हजारो स्त्रियांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत हे जाणून कृष्णाने या १६,१०० स्त्रियांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करावे त्यामुळे आत्म्यावरील अहंकाराचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागचा संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाने मर्दन करून, सुवासिक उटणे लावून सूर्योदयापूर्वी केलेल्या या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. या दिवशी पहाटे आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या घरातल्या स्वच्छतागृहात यमासाठी दिवा लावण्याची प्रथा आहे.
आश्विन अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी चंचल असते असा समज असल्यामुळे ही लक्ष्मी आपल्या घरी स्थिर रहावी म्हणून हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन स्थिर लग्न मुहूर्तावर केले जाते. याप्रसंगी अनेक घरांत श्रीसूक्ताचे पठण केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष या लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्वजण अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाला बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिला लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून तिची पूजा करतात. या केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्रय दूर होते असे मानले जाते.
प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची पद्धत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. पुढे कुबेराच्या जागी गणपतीची प्रतिष्ठापना केली गेली. सांप्रतकाळी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपल्या आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती आणि अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता ही दोन महत्त्वाची मूल्ये मानवी मनात रुजावीत हा या पूजेचा खरा हेतू असावा असे म्हणता येईल.
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो.
या दिवशी बळी राजाची पूजा करुन 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हटले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू केल्या जातात. या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात.
या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते व पती आपल्या पत्नीला ओवाळणी देतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. त्यानिमित्त जावयास आहेर केला जातो.
कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमीच्या घरी जेवायला गेला होता अशी एक आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते. बंधु-भगिनींसाठी हा दिवस महत्त्वाचा असतो. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो.
अशा रितीने सलग सात दिवस चालणारा दिवाळीचा सण हा सर्व सणांचा राजा आहे असं मानून हा सण राजेशाही थाटातच साजरा केला जातो. दिवाळी म्हटलं की, आकाशकंदील, दिव्यांच्या माळा, तेला-तुपाचे दिवे, रंगीबेरंगी रांगोळ्या, फटाक्यांची आतषबाजी, नव्या कपड्यांची रेलचेल, गोडाधोडाचे फराळ, दिवाळी निमित्त एकमेकांना शुभेच्छा देणारी भेटकार्डे, मिठाईचे पुडे हे सगळं मोठ्या आनंदानं केलं जातं. दिवाळीच्या दिवसांत सुरु झालेले नात्यांमधले काही रुसवे-फुगवे दिवाळीतच निकाली निघतात. त्यातून नात्यांनाही उजाळा मिळतो.
लेखक
अनिल उदावंत