येवो वसंतवारा

नवजीवन-प्रदाता। चैतन्य ओतणारा
सुकल्यास हासवीता। आला वसंतवारा

आला वसंतवारा। वनदैन्य हारणारा
सुटला सुगंध गोड। भरला दिगंत सारा

रानीवनी बहार। आला फुलांफळास
समृद्धि पाहुनीया। आनंद पाखरांस

वेली तरू रसाने। जातात भरभरोनी
डुलतात नाचतात। नवतेज संचरोनी

फुटतो मुक्या पिकाला। तो कंठ गोड गोड
सजते सुपल्लवांनी। ते शुष्क वृक्ष-खोड

सोत्कंठ गायनाने। पिक नादवीत रान
परिसून ते सहृदय। विसरून जाइ भान

सृष्टीत सर्व येतो। जणु जोम तो नवीन
जे जे वठून गेले। ते ते उठे नटून

सृष्टीत मोद नांदे। सृष्टीत हास्य नांदे
संगात गोड गोड। सृष्टीत सर्व कोंदे

सृष्टीत ये वसंता। परि मन्मनी शिशीर
मम जीवनी वसंत। येण्यास का उशीर

का अंतरी अजून। नैराश्य घोर आहे
का लोचनांमधून। ही अश्रुधार वाहे

अंधार अंतरंगी। भरला असो अलोट
काही सुचे रुचे ना। डोळ्यांत अश्रुलोट

उत्साह लेश नाही। उल्हास अल्प नाही
इवलीहि ना उमेद। झालो हताश पाही

सत्स्फूर्तिचा स्फुलिंग। ना एक जीवनात
मेल्यापरी पडे मी। रडतो सदा मनात

हतशुष्क जीवनाचा। निस्सार जीवनाचा
जरि वीट येइ तरिही। न सुटेच मोह त्याचा

ओसाड जीवनाची। भूमी सदा बघून
वणवेच पेटतात। मनि, जात मी जळून

ओसाड जीवनाचे। पाहून वाळवंट
करपून जीव जाई। येई भरुन कंठ

पाहून जीवनाचा। सारा उजाड भाग
मज येइ भडभडोनी। मज ये मदीय राम

कर्मे अनंत पडली। दिसतात लोचनांते
परि एकही कराया। राया! न शक्ति माते

संसार मायभूचा। सारा धुळीत आज
काही करावयाला। येई मला न काज

हृदयी मदीय भरते। देवा अपार लाज
काहीच हातुनिया। होई न मातृकाज

असुनी जिवंत मेला। जो कर्महीन दीन
मनबुद्धि देह त्याची। ती व्यर्थ, फक्त शीण

या मातृसेवनात। या मातृकामकाजी
वाटे मनातकाया। झिजुदे सदैव माझी

परि जोर ना जराही। संकल्पशक्ति नाही
मनिचे मनी तरंग। जाती जिरून पाही

मम जीवनात देवा। येवो वसंतवारा
गळू देत जीर्ण पर्णे। फुटु दे नवा धुमारा

शिरु देत मनात जोम। शिरु दे मतीत तेज
करण्यास मातृसेवा। उठु देच जेवि वीज

खेळो वसंतवात। मज्जीवनी अखंड
करुदेच मातृसेवा। अश्रांत ती उदंड

असु दे सदा मदीय। मुखपुष्प टवटवीत
असु दे सदा मदीय। हृत्कंज घवघवीत

तोंडावरील तेज। आता कधी न लोपो
आपत्ति आदळोत। अथवा कृतांत कोपो

दृष्टीमध्ये असू दे। नव दिव्य ब्रह्मतेज
वाणीतही वसू दे। माझ्या अमोघ आज

पायांमध्ये असू दे। बळ अद्रि वाकवाया
हातामध्ये असू दे। बळ वज्र ते धराया

हसु दे विशंक जीव। पाहून संकटांना
निश्चित जाउ दे रे। तुडवीत कंटकांना

निर्जीव मी मढे रे। पडलो असे हताश
चढु दे कळा मुखाला। करु दे कृती करांस

हातून अल्प तरि ती। सेवा शुभा घडू दे
न मढ्यापरी पडू दे। चंडोलसा उडू दे

चैतन्यसिंधू तू रे। दे दिव्य जीवनास
जरी मृत्यू तो समोर। विलसी मुखी सुहास्य

संजीवनांबुधी तू। संजीवनास देई
दे स्फूर्ति जळजळीत। नैराश्य दूर नेई

तू एक शक्ति माझी। तू एक तारणारा
जे दीन हीन त्यांची। तू हाक ऐकणारा

हतजीव-जीवनांच्या। रोपास कोण पाळी
तू एक वाढविवी। तूचि प्रबुद्ध माळी

हृदयी बसून माझ्या। फुलवी मदीय बाग
मातापिता सखा तू। गुरु तूच सानुराग

फुलतील वाळवंटे। हसतील शुष्क राने
नटतील भू उजाड। गातील पक्षि गाणे

जरि त्वत्कृपा-वसंत। येईल जीवनात
चंडोलसा उडेन। संस्फूर्त गात गात

त्वत्स्पर्श अमृताचा। मजला मृता मिळू दे
मम रोमरोमि रामा। चैतन्य संचारु दे

आता सदा दयेचा। सुटु दे वसंतवारा
फुलु देच जीवनाचा। जगदीश भाग सारा


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

माझे ध्येय

करीन सेवा तव मोलवान। असो अहंकार असा मला न
मदीय आहे बळ अल्प देवा। बळानुरूपा मम घेइ सेवा।।

कधी कुणाचे मजला पुसू दे। जलार्द्र डोळे मग तो हसू दे
अनाथदीनाजवळी वदेन। सुखामृताचे प्रभु शब्द दोन।।

कधी करावा पथ साफ छान। कधी हरावी मयल-मूत्र-घाण
बघून रागार्त करीन घाई। बनेन त्याची निरपेक्ष आई।।

जया न कोणी प्रभु मी तयाचा। तदर्थ हे हात तदर्थ वाचा
तदर्थ हे प्रेमळ नेत्रदीप। सदैव जागा मम तत्समीप।।

कधी कधी मंगल मी लिहीन। कथा नवी वा कविता नवीन
लिहीन मी नाटक वा निबंध। करीन भाषांतर वा सबंध।।

जगात जे जे सुविचारवारे। मदीय भाषेत भरोत सारे
असे सदा वाटतसे मनात। तदर्थ माझे शिणतील हात।।

करीन ज्या ज्या लघुशा कृतीस। तिच्यात ओतीन मदंतरास
समस्तकर्मी हृदयारविंद। फुलेल, पूजीन तये मुकुंद।।

असे प्रभूची कृतिरूप पूजा। असे सदा भाविल जीव माझा
मदंतरीची मिसळून भक्ती। मदीय कर्मी, मिळवीन मुक्ती।।

कुठेही सांदीत जरी पडेन। तिथे फुलाचेपरि मी हसेन
मला समाधान असो तयात। असो तुझे चिंतन ते मनात।।

असो तुझे नाम मदीय वक्त्री। असो तुझे रूप मदीय नेत्री
असो तुझे प्रेम मदन्तरात। भरून राही मम जीवनात।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, जानेवारी १९३३

तुझ्या हातातला

खरोखरी मी न असे कुणी रे। चराचराचा प्रभु तू धनी रे
हले तुझ्यावीण न एक पान। उठे तुझ्यावीण न एक तान।।

त्वदंगणांतील लतेवरील। लहान मी क्षुद्र दरिद्र फूल
तुझ्या कृपेने रस गंध दावो। तुझ्याच सेवेत सुकोन जावो।।

मदीय हा जीवनकुंभ देवा। तसे, उदारा! मधुरे भरावा
करून त्वत्कर्म रिता बनावा। तुझ्याच पायी फुटुनी पडावा।।

फुटे जरी नीट तुम्ही करावा। रिता तरी तो फिरुनी भरावा
रसा समर्पून पुन्हा फुटेल। फुटून आता चरणी पडेल।।

फुटे करा नीट रिता भरावा। असाच हा खेळ सुरू रहावा
तुझ्या न सेवेत कधी दमू दे। अनंत खेळांत सदा रमू दे।।

जणू तुझ्या मी मुरली मुखात। तुझेच गीत प्रकटो जगात
बनेन वेणू तव मी मुखीची। असे असोशी प्रभु एक हीची।।

तुझ्या करांतील बनून पावा। कृतार्थ हा जन्म मदीय व्हावा
करावया मूर्त शुभ स्वहेतू। करी मला साधन आपुले तू।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, जानेवारी १९३३

रडण्याचे ध्येय

केव्हा मी कृतिवीर होइन, न ते काहीच माते कळे
डोळ्यांतून मदीय नित्य विपुला ही अश्रुधारा गळे

स्वप्ने खेळवितो किती निजमन:सृष्टीत रात्रंदिन
ना येती परि मूर्तीमंत करण्या नाही मला तो गुण।।

या माझ्या हृदया बघा उघडुनी मी ध्येयवादी असे
ध्येयालाच अहर्निश स्मरतसे चित्ती दुजे ना वसे

ध्येये मात्र मदंतरी विलसती, ध्येयेच ती राहती
माझे लोचन अश्रुपूर्ण म्हणुनी खाली सदा पाहती।।

इच्छाशक्ति जया नसे प्रबळ ती जी पर्वता वाकवी
यच्चित्ता लघुही विरोध रडवी नैराश्य ज्या कापवी

त्याला ध्येय असून काय? रडतो निर्विण्ण रात्रंदिन
वाटे ध्येयविहीन कीट असणे, तेही बरे याहुन।।

ध्येये जी धरिली उरी न मम का ती? चित्त त्या का भुले?
देवा! ध्येय मदीय नित्य रडणे हे का असे निर्मिले?।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२७

द्विविध अनुभव

भरला हा अंधार। सारा भरला हा अंधार।।
क्रूर पशू हे हिंसक भेसुर
गदारोळ करितात भयंकर
थरथरते भीतिने मदंतर
निरखुनि हे कातार।। सारा....।।

वाघ गुरगुरे अंगावरती
भुजंग फूत्काराते करिती
विंचू करिती नांगी वरती
नाहि कुणी आधार।। सारा....।।

डोळे जैसे खदिरांगार
झिंज्या पसरुन भेसुर फार
धावुन येई हा अंगावर
पिशाच्चगण अनिवार।। सारा....।।

काटे रुतती टुपती दगड
भुजंग विंचू दिसती रगड
मरुन जाइन राहिन ना धड
डोळ्यां लागे धार।। सारा....।।

भयभीतीने मी गांगरत
शतदा मार्गी मी अडखळत
जखमा होती वाहे रक्त
केला हाहा:कार।। सारा....।।

पाहुनि दु:खाचा बाजार
माझे झाले मन बेजार
अंगी उरला अल्प न जोर
पडली गात्रे गार।। सारा....।।

तीक्ष्ण नखांनी फाडफाडुन
दातांनी चावुन कडकडुन
टाकतील मजला खाऊन
करितिल वाटे ठार।। सारा....।।

झंजावाते जैसे पान
कांपे, तेवी मी बलहीन
प्रभुजी, कोणा जाऊ शरण
वदवे ना मज फार।। सारा....।।

हे विश्वंभर करुणासागर
हे परमेश्वक परमोदार
शेधित आहे तुझेच दार
तार मला रे तार।। सारा....।।

सरला घन अंधार। आला प्रकाश अपरंपार।।
प्रभूची मुरली हळुच वाजली
क्षणात सारी सृष्टी बदलली
सुमने पायाखाली फुलली
हरला माझा भार।। आला....।।

गदारोळ तो सकळ निमाला
प्रकाश आला सत्पथ दिसला
करुणासागर तो गहिवरला
जाइन आता पार।। आला....।।

अभ्रे येती विलया जाती
फिरुन तारकातती चमकती
तैशी झाली मदंतरस्थिति
उदया ये सुविचार।। आला....।।

विवेकदंडा करी घेउन
वैराग्याची वहाण घालुन
धैर्ये पुढती पाऊल टाकिन
खाइन मी ना हार।। आला....।।

डसावया ना धजती सर्प
व्याघ्रवृकांचा हरला दर्प
भीति न उरली मजला अल्प
विलया जात विकार।। आला....।।

हलके झाले माझे हृदय
मोह पावले समूळ विलय
सदभावाचा झाला उदय
केला जयजयकार।। आला....।।

मदंतरंगी मंजुळवाणी
वाणी तुमची शुभ कल्याणी
प्रभु! येऊ दे ऐकू निशिदिनी
विनवित वारंवार।। आला....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

हे सुंदरा अनंता!

हे सुंदरा अनंता! लावण्यकेलि-सदना।
कधि भेटशील मजला। कंदर्पकोटी-वदना!

सकलांहि या जिवांच्या। प्रेमार्थ तू भुकेला
चित्ते हरावयाला। सचितोसि रंगलीला

संध्या समीप येता। भरिशी नभांत रंग
तव हृत्स्थ प्रेमसिंधु। त्याचेच ते तरंग

सांजावता नभात। उधळीत रंग येशी
रमवीशि या जिवांना। कर लेशही न घेशी

रमवावयास जीवा। सुखवावयास राया!
निज दिव्य चित्रशाळा। करिशी खुली बघाया

हसवावयास जीवा। शिकवावयास राया!
निज भव्य चित्रशाळा। करिशी खुली बघाया

पिवळे निळे गुलाबी। नारिंगी गौर लाल
संमिश्रणे सुरम्य। करितात जीव लोल

काळे कभिन्न मेघ। करितोस ते सुवर्ण
त्वत्स्पर्श दिव्य होता। राहील काय दैन्य

घालूनिया किरीट। कान्हाच का उभा तो
ऐसा कधी कधी तो। आभास गोड होतो

रक्तोत्पले सुरम्य। फुलली अनंत गंमती
ते हंस कांचनाचे। गमतात तेथ रमती

करिती प्रसन्न चित्त। करिती गंभीर धीर
चित्रे विचित्र बघुनी। हृदयात भावपूर

शोभा नभात भव्य। शोभा नभात नव्य
बघुनी अपार भरती। हृदयात भाव दिव्य

करितोस रंगबदल। राया क्षणाक्षणाला
इकडेहि रंग विविध। चढतात मन्मनाला

करितोस रंगफेर। देशी नवा मुलामा
तू दावतोस गोड। जादू मुलांस आम्हां

मोडूनिया क्षणात। रचिशी नवाकृतीस
बघुनी तुझी चलाखी। किती मोद मन्मतीस

गंभीर होइ चित्त। दुस-या क्षणीच हसते
हसले न जो पुरेसे। तिस-या क्षणीच रडते

येती मनी विचार। ते मृत्यु- जीवनाचे
जणु जीव त्या घडीला। दोल्यावरीच नाचे

होताच वासरान्त। होताच भास्करान्त
जणु पूर वैभवाला। चढतो वरी नभात

येता समीप अंत। जीवासही अनंत
ऐसे मिळेल भाग्य। करु मी किमर्थ खंत?

जणु मृत्यु रम्य दार। त्या जीवना अनंत
सौभाग्यहेतु अस्त। करु मी किमर्थ खंती?

श्रीमंत त्या प्रभूचा। मी पुत्र भाग्यवंत
होऊ सचिंत का मी। करु मी किमर्थ खंत?

ऐसा विचार माझ्या। हृदयात गोड येई
माझी महानिराशा। प्रभुजी पळून जाई

जे रंजले प्रपंची। जे गांजले जगात
रिझववयास त्यांना। नटतोसि तू नभात

दारिद्रय दु:ख दैन्य। निंदापमान सर्व
सायंनभा बघोनि। विसरून जाइ जीव

रंगच्छटा अनंत। आकार ते अनंत
करु वर्णना कसा मी। बसतो मुका निवांत

बघतो अनंत शोभा। हृदयी उचंबळोनी
मिटितो मधेच डोळे। येतात ते भरोनि

गालांवरून अश्रू। येतात घळघळोनी
सायंतनीन अर्घ्य। देतो तुला भरोनि

नटतोसि रंगरंगी। तू दिव्य- रूप- सिंधू
तू तात मात गुरु तू। प्रिय तू सखा सुबंधु

राहून गुप्त मार्गे। करितोसी जादुगारी
रचितोसि रंगसृष्टी। प्रभु तू महान चितारी

किती पाहु पाहु पाहु। तृप्ती न रे बघून
शतभावनांनि हृदय। येई उचंबळून

भवदीय दिव्य मूर्ति। केव्हा दिसेल नयनां
भिजवीन आसवांनी। केव्हा त्वदीय चरणां

हे सुंदरा अनंता। लावण्यकेलि-सदना
कधि भेटशील माते। कंदर्पकोटि-वदना।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, ऑगस्ट १९३२

रडायाचा लागलासे देवा एक छंद

अनंत दिधली ही वसुंधरा घर
विशाल अंबराचे वितान सुंदर

चंद्रसूर्य तारे दिले दिवारात्र दीप
वारा दिला प्राणसखा सदैव समीप

निर्झरांचे सागराचे दिलेस संगीत
कितितरी देवा तुझी अम्हांवर प्रीत

हिरव्या हिरव्या तृणाचे दिले गालिचे
सौंदर्याने भरलेले जणु मखमालीचे

हिरव्या गर्द तरुवेली यांची मंदिरे
दिली मनोहर ज्यांत कुणीही शिरे

पाण्याने भरलेले दिलेस सागर
सरित्सरोवर, वपी, झरे मनोहर

फुले, फुलपाखले दिली खेळायास
जिकडे तिकडे लाविलीस चित्रे बघायास

भव्य असे उभे केलेस डोंगर, पहाड
कितितरी पुरविशी बापा आमचे लाड

माता, पिता, बहिण, भाऊ, सखे यांचे प्रेम
दिलेस, देवा! चालविशी नित्य योगक्षेम

देह बुद्धि इंद्रिये हे हृदय देऊन
जगात खेळायाला दिलेस धाडून

आनंदाने ओतप्रोत भरुन दिलेस जग
परि माझ्या हृदयाची सदैव तगमग

तुझ्या सृष्टीमध्ये कोंदे आनंद
परि माझ्या अंतरंगी भरे शोकपूर

सृष्टीमध्ये तुझ्या देवा भरले रे संगीत
परि माझ्या अंतरंगी सदा शोकगीत

देवा! दिले खरे तू परि कर्महीन
मतिमंद भाग्यहीन तव दास दीन

देशी परि घेता यो ना करु काय सांग
शोकांबुधिमधि गेलो बुडुन रे अथांग

हसुन खेळुन जीवन न्यावे जगि या मुदे
कला मला साधेना ती, जीव हा स्फुंदे

घेता ये ना आनंदाचा आस्वाद मी मंद
रडायाचा लागलासे मला एक छंद।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१