पत्रे लिहिली पण...?

तू आलीस बघावया सहज 'त्या' देवालयी 'गालिचे'
होतो चोरुनि अंग मीहि घुसलो त्या गोड गर्दीमधे!
तूझे दिव्य अहा, न म्यां निरखिले लावण्य जो गालिचे-
तो डोळ्यांपुढुनी पसार कधि तू झालीस विद्युल्लते?

तू गेलीस!! मनात अन् कसकसे वाटू मला लागले!
यावे अंगि भरून हीवच जसे पित्तप्रकोपामुळे!
माघारी फिरलो तसाच धरुनी मी गच्च डोके तदा,
(कोणी बांधिति काही तर्क!) पडता वाटेत मी चारदा!

तेव्हापासुनि मी तुझी करितसे टेहेळणी सारखी
बागा, पाणवठे फिरून दमलो-देवालये धुंडिली!
उद्देशून तुला कितीक रचिली काव्ये तशी मासिकी,
'व्यक्ति-स्तंभि' हि जाहिरात कितिदा पत्रांतुनि म्या दिली!

पत्रे आजवरी तुला खरडली त्यांची पहा बंडले-
येथे बांधुनि ठेविलीत! पण ती धाडू कुठे प्रेमले?


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कानगुजला

तो आला जवळी नि कानगुजला काहीतरी हासुनी,
            तो शेजारिल मांजरावर तिने भिर्कावली फुंकणी!
'जा हिंडा-सगळ्या सभा समजल्या ! आहे तुम्हाला मुभा!
            सांभाळीत घरात मात्र बसु का मी कारट्यांच्या सभा?'
तो आला जवळी नि कानगुजला काहीतरी हासुनी,
             तो पोळीवर ओतुनीच उठली रागामधे फोडणी!
'जा आणी दुसरी खुशाल नटवी कोणी! पहा नाटके!
            येऊ का तुमच्याबरोबर असे नेसून मी फाटके?'
तो आला जवळी नि कानगुजला काहीतरी हासुनी,
           पोतेरे दिधले तिने तडक तो भिंतीवरी फेकुनी!
'सारे कागद जा चुलीत खुपसा! दावू नका वाचुनी!
           आंघोळीपुरते निघेल तुमच्या पाणी तरी तापुनी!
तो आला जवळी नि कानगुजला देऊन काहीतरी,
            तो आलिंगुनि ती म्हणे, 'करविल्या केव्हा कुड्या या तरी!'


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

अरुण

अहा, सजवुनी लालतांबडा मुखडा हा कोण
डोकावुनि पाहतो नटासम पडद्याआडुन?

अरुण कशाचा! बालरवीचा हा पट्टेवाला
किनखापीचा चढवुनि येई लालभडक डगला?

टोपी घालुनि लाल पिसांची येत वासुदेव,
मुंडासे बांधून बसे का कुणी नवरदेव?

स्वर्गातिल मंडई उघडली किंवा इतुक्यात
तिथे कापल्या कलिंगडांची भरली ही पेठ?

लाल गाजरे मांडि कुणी का 'माळिण नव तरणी'
कुणी फोडिली विलायति वा वांग्यांची गोणी?

स्वर्गंगेच्या रक्तकण्हेरी आज बहरल्या का
फुलला किंवा दाहि दिशांतुनि झेंडूचा ताफा?

गगनीच्या आंब्यास लागला का पक्का पाड,
नंदनवनिंच्या निवडुंगाचे का विराट बोंड?

वखार किंवा कौलांची ही लाल मंगलोरी
पागोट्यांचे कुणी प्रदर्शन मांडित चंदेरी?

काव फासुनी दुकान सजवी काय मारवाडी
पोळ्याच्या की बैलांची कुणि मिरवणूक काढी?

कुणा कवीच्या लग्नाची ही आमंत्रणचिठ्ठी,
कँलेंडर का कुणी छापिले नववर्षासाठी?

रंगमहाली रंगसफेती इंद्राच्या चाले
स्वर्भूवर तांबडे तयांतिल ओघळ हे आले?

नील चांदवा जुन्यापुराण्या गगनाचा फाटे
आलवणाचे आस्तर आले बाहेरी वाटे?

थंडीची हुडहुडी न लागो उषासुंदरीला,
पूर्वेच्या शेगडीत म्हणुनी विस्तव पेटविला?

जाण्याच्या घाईत घसरुनी बालरवी पडला-
तोंडावरती, आणि घोळणा हा त्याचा फुटला?

टाकी रजनी जाता जाता आकाशी चूळ,
तिच्या मुखांतिल पडला खाली चर्वित तांबूल?

तोंड उघडुनी मुखमार्जन का करिती दाहि दिशा
जिभा तयांच्या लळलळती या मधुनी लाल अशा?

दिग्गज करिती उदयमंदिरी काय साठमारी,
रक्ताने माखली तयांच्या स्वर्भूमी सारी?

की रजनीशी दंगामस्ती करि अंशुमाली,
तिने तयाच्या संतापुन ही श्रीमुखात दिधली.'

धूम्रपान का कैलासावर श्रीशंकर करिता
चिलमीतुनि हा पडे निखारा खाली जळजळता?

धुंद जाहले पिउनि शांभवी किंवा दिक्पाल
निद्राकुल नयनांतिल त्यांच्या रंगच हा लाल?

फुंक मारुनी काढि मुखांतुनि जळता अंगार
नजरबंदिचा करी खेळ का कुणि जादूगार?

सूर्याला उगवत्या गिळाया की मारुतराय
कधीपासुनी जबडा वासुनि बसले हे काय

क्षयी शशीस्तव करावयाते किंवा गुलकंद
वैद्य अश्विनीकुमार जमविति हे गुलाबगेंद?

रडरडुनी चालवी बालरवि की धांगडधिंगा
शांत कराया त्यास देत कुणि रबरी लाल फुगा?

की स्वर्गीच्या रंगेलांचे उघडकिस बिंग?
येत काय हे फुटता काळे रजनीचे भिंग?

लाल सुरेची लाख बाटली सुरालयी फुटली
गतरात्री जी तिची काय ही अवशिष्टे पडली?

स्वर्गीच्या मजलसीत किंवा 'जास्त जरा झाली!'
चित्ररथाची म्हणुनी स्वारी लोळत ये खाली?

बेहेस्ती थाटात साजरा होते बकर-ईद
स्वर्धेनूच्या रक्ताचे हे पाट लालबुंद?

लाख तारका का सांथीने मेल्या एकसरी
सोयीसाठी कुणी भडाग्नी यांचा म्हणुनि करी?

खून रात्रिचा करुनि पळे हा बंगाली डाकू
रक्ताने आपाद नाहला का बच्चा साकू?

निषेधार्थ शारदाविलाच्या किंवा स्वर्देवी
बालरवीचे लग्न उषेशी पाळण्यात लावी?

पृथ्वीवरल्या नको कवीचे 'गायन' ऐकाया
म्हणुनि त्यास की पाठविती सुर हा शेंदुर प्याया?

क्षणोक्षणी स्वर्गात मारिती कवी फेरफटका
धोक्याचा टांगला तयास्तव द्वारी कंदिल का?

संन्याशांची वार्षिक परिषद किंवा ही भरली
दाटी झाली गगनी भगव्या छाट्यांची सगळी?

स्वर्गातिल मल्लांची चाले की जंगी कुस्ती
आखाड्यातिल लाल धूळ का उधळे ही वरती?

'सुरते'चा संग्राम चालला देवदानवांत
त्यात कुणावर कुणी 'पुणेरी' भिरकावुनि देत?

'लाल बावटा संघा'चे की जमले वेताळ
करिती भांडुनि परस्परांची वदने बंबाळ?

'आकाशाच्या बापा'ची की मुक्तिफौज सुटली
लालभडक झोकांत तयांची झगमगती डगली?

कुणी पुण्याच्या सभेत खाई मार 'देशभक्त'
पगडीची वावडी तयाच्या चढली गगनात?

कन्नडवादे बेळगावची उडे लाल माती
वातावरणी तशीच कोंदुनि अजुनि बसे का ती?

'कंपनीतला'मखमालीचा कुठल्याशा पडदा
इथे पसरुनी काय ठेविला लिलावास उघडा?

आजवरी नासती तांबडा रंग प्रेमवेडे
भांडवलावर त्या काढी कुणि दुकान 'घोरपडे'?

की रात्री उधळती रंग जे लक्ष्मीचे लाल
तेच विलसती नभी घेउनी मूर्त रूप लाल?

प्रेमावरचे लिखाण जमवुनि की विश्वामधले
कल्याणास्तव कुणी जगाच्या येथे पेटविले?

अरुण असे का जिवंत हा? की गतप्राण झाला
कुणा कवीने खून तयाचा निजकवने केला?

थकलो आता!! उत्प्रेक्षांची संपत ये कंथा
मान लचकली म्हणता म्हणता ही लांबट संथा!

काव्य मरू दे! शब्द झरू दे-अरुण तडफडू दे?
चहा चालला सकाळचा हा निवुनि पार इकडे!

अहा! माझिया कपात असता अरुणाची लाली
वाहु कशाची शब्दांची त्या अरुणा लाखोली?

नको भटकणे अरुणासाठी उगाच स्वर्गात
स्वर्ग भेटवी अरुणरसाचा या एकच घोट!

आणि शारदे, जरी आरुणी पेय न हे मिळते
तरी मंदिरी तुझ्या क्षणभरी कोण बरे फिरते?


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

चाफा

चाफा बोलेना । चाफा चालेना
चाफा खंत करी । कोणी त्यासी पुसेना!

गेला फुलांच्या ग वनी । सारा शिणगार लेवुनी,
बसला डोके उंचावुनी । कोणी त्यासी बघेना !

सुकुनी झाली चोळामोळा । फुले ती करी बाजुची गोळा,
चुकवुनी इतरांचा मग डोळा । डकवी आपुल्या पाना?

बोले, 'पुष्पांचा मी राजा । आला बहार मजसी ताजा!'
केला ऐसा गाजावाजा । परी कोणी बघेना!

म्हणे, 'मी वृक्ष थोर प्रेमळ । नम्रता रसाळ निर्मळ,'
बोलला वाडेकोडे बोल । खरे कुणा वाटेना !

भुंगे पळती आल्यापायी । पांखरे उडती घाई घाई,
केली खूप जरी चतुराई । कुणी तया भुलेना!

भवती गुलाब, बटमोगरा । सुगंधी किती फुलांच्या तर्‍हा
विचारी कोण तिथे धत्तुरा? । जरिही केला बहाणा !

फांशी अंगी चंदन-उटी । लावी हळदलेप लल्लाटी!
आणि कांति पीत गोमटी । परी कोणी फसेना !

चोळिले अत्तर अंगी जरी । प्राशिली दोन शेर कस्तुरी ।
गंध का जातिवंत ये तरी? । असे मुळामध्ये उणा !

लागे जरा उन्हाची झळ । झाला तोच नूर पातळ,
सरले सगळे उसने बळ । पडे खाली उताणा!!

खदखदा हसू लागली झाडे । फूलांची मिष्किल झाली तोंडे!
डोळे झाकुनि चाफा रडे । हाय-ते सांगू कुणा?

(चाल नाही तरी निदान सूर बदलून)

चाफा बोलेना । चाफा चालेना
चाफा खंत करी । कोणी त्यासी पुसेना!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

नवरसमंजरी - शृंगाररस

काव्याचे निज बाड घेउनि दर्‍याखोर्‍यातला शाहिर,
होता गाउनि दाखवीत कविता कोणा महाराणिला;
कंटाळा तिज ये परंतु कवि तो गुंडाळिना दप्तर,
रागावूनि म्हणून टाकि गजरा ती खालि वेणीतला !

होता बोलुनिचालूनीच कवि तो त्याला कळावे कसे?
प्रेमाची करण्यास चाकरि तया संधी बरी ही दिसे !
लज्जाकंपित हाति देइ गजरा, तो प्रेमवेडा तिला,
ती गाली हसली (किमर्थ नकळे!) शाहीर आनंदला !


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें








नवरसमंजरी - वीररस

होता तो मृगराज जोवरि वनी सिंहासनाधिष्टित,
कोल्हे तोवरि हे विळांत दडुनी होते भये कापत !
त्याचा देह विराट आज पडता निष्प्राण भूमीवरी,
आली धावत टोळधाड जिभल्या चाटीत ही त्यावरी !

तन्नेत्रा उघडूनि कोणी म्हणती, 'या गारगोट्या पहा ।'
दाढीचे उपटूनि केस वदती, 'संजाब खोटाच हा!'
बोटेही जबड्यांतुनी फिरविती निःशंक आता कुणी,
कोणी खेचुन शेपटी फरफरा नेई तया ओढुनी !

कोणी ठेवुनि पाय निर्भयपणे छातीवरी नाचती,
'आता सोडविण्यास कोण धजतो याला बघू!' बोलती;
जो तो सिंहच आपणा म्हणवुनी आता करी गर्जना,
मारि हात मिशांवरी फिरवुनी वीरश्रिच्या वल्गना!

दारोदार बघून वीर असले संतोष होतो जरी,
नाही भेकड मात्र कोणि उरला हे शल्य डांचे उरी !


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

नवरसमंजरी - करुणरस

कुठे लिहिल्या कविता न पाच-सात
एकदाच्या छापिल्या मासिकात;
तोच बोले, 'शाहीर जाहलो मी,
महाराष्ट्रा हलवीन रोमरोमी!'

पुढे सरली कंगाल काव्यकंथा,
येरु बोले, 'टीकाच लिहिन आता !
मस्त झाली आहेत बडी धेंडे !
एकएकांची फोडतोंच तोंडे !'

हाति बाळाच्या लागता कुर्‍हाड
जिते राहिल का एक तरी झाड?
तसे टीकेचे लागताच वेड,
मोठमोठ्यांचा काय पुढे पाड?

'अमुक लेखक करितोच उसनवारी,
तमुक लोळतस बिछान्यात भारी!
तमुक ओढतसे रोज विड्या फार,'
असे टीकेचे चालले प्रहार !

चारचौघांची परी करुनि चोरी,
येरु सजवी लेखनाची शिदोरी!
शिव्या द्यायाही शब्द न स्वतांचे
कसे वर्णू दारिद्र्य मी तयाचे?

असो; येरू जाहला सुप्रसिद्ध,
लेखनाची संपली त्यास हद्द !
म्हणे, 'आता होईन पत्रकार,
देशभक्तीच्या अखाड्यांत वीर !'

येरु घेई बगलेत जाड ग्रंथ,
आणि सुतक्यासम जाइ मार्गि संथ !
धुवट बगळ्यासम दिसे वरुनि शांत,
कोण जाणे परि अंदरकी बात?

मोठमोठ्यांच्या बसुनि कच्छपात,
बने मुत्सद्दी चार आठवड्यात !
लिहू लागे गंभीर, 'लेखमाला'!
'तीन खंडी' जाहला 'बोलबाला'!

'जाहिराती', 'संस्कार', वृत्त', 'पोंचा'-
हातखंडा लिहिण्यात होय त्याचा!
'स्फुटा' वरती जो टाकणार हात-
तोच मागुनि दुर्दैव हाणि लाथ!

'जहालांचा भुरकाच तिखट -जाळ'.
येरु बोले, 'मज नको कधी काळ!'
'मवाळांचा आळणी दूधभात,
बरा आता बैसेन ओरपीत!'

येरु संन्यासी होइ (करुनि क्षौर)
बांधि आश्रम रानात कुठे दूर !
भोवताली जमवुनी चार शिष्ट,
काळ घालवितो 'काव्यविनोदात.'

'मनी आले ते होइ सर्व पूर्ण!'
हेच येरूला एक समाधान.
शांत ही अजुनी न चित्त हाय!
परी धंदा उरला न! करू काय?

देवा, तो विश्वसंसार राहू द्या राहिला तरी,
परी कारुण्यमूर्तीला द्याच या मोक्ष लोकरी !


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें