ज्या कारणें वेदश्रुति अनुवादती । तो हा रमापती पंढरीये ॥१॥
सुखाचें ठेवणें क्षीरसागर निवासी । तो हा पंढरीसी उभा विटे ॥२॥
भाविका कारणें उभवोनि हात । उदारपणें देत भुक्तिमुक्ती ॥३॥
न पाहे उंच नीच याती कुळ । स्‍त्री शूद्र चांडाळा सरते पायीं ॥४॥
चोखा म्हणे ऐसा भावाचा भुकेला । म्हणोनि स्थिरावला भीमातटीं ॥५॥


  -  संत चोखामेळा
अनाम जयासी तेंचि रुप आलें ।
उभें तें राहीलें विटेवरी ॥१॥

पुंडलिकाच्या प्रेमा युगें अठ्‌ठावीस ।
समचरणीं वास पंढरीये ॥२॥

चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कनवाळू ।
जाणें लळा पाळू भाविकांचा ॥३॥


  -  संत चोखामेळा
व्यापक व्यापला तिहीं त्रिभुवनीं । चारी वर्ण खाणी विठू माझा ॥१॥
शंख चक्र करीं वैजयंती माळा । नेसला पिवळा पितांबर ॥२॥
कटावरी जेणें कर हे ठेविले । ध्यान मिरविलें भीमातिरीं ॥३॥
चोखा म्हणे माझा आनंदाचा कंद । नाम हे गोविंद मिरविलें ॥४॥


  -  संत चोखामेळा
गोजिरें साजिरें श्रीमुख चांगलें ।
ध्यानीं मिरवलें योगीयांच्या ॥१॥

पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरीं ।
 वैकुंठाचा हरी उभा विटे ॥२॥

राई रखुमाई सत्यभामा नारी ।
 पुंडलिकें सहपरिवारीं आणियेला ॥३॥

वैजयंती माळ किरीटकुंडलें ।
प्रेमें आलिंगिलें चोखियानें ॥४॥


  -  संत चोखामेळा

विटाळ

काळाचा विटाळ जीवशिवा अंगीं । बांधलासे जगीं दृढ गांठीं ॥१॥
विटाळी विटाळ चवदाही भुवनीं । स्थावर जंगम व्यापुनी विटाळची ॥२॥
सुखासी विटाळ दु:खासी विटाळ । विटाळीं विटाळ वाढलासे ॥३॥
विटाळाचे अंगी विटाळाचे फळ । चोखा तो निर्मळ नाम गाय ॥४॥

कोण तो सोंवळा कोण तो वोंवळा । दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा ॥१॥
कोणासी विटाळ कशाचा जाहला। मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥
पांचाचा विटाळ येकचिये आंगा । सोंवळा तो जगामाजी कोण ॥३॥
चोखा म्हणे माझा विठ्ठल सोंवळा । अरूपें आगळा विटेवरी ॥४॥

उपजले विटळीं मेले ते विटाळीं । राहिले विटाळीं ते ही जाती ॥१॥
रडती पडती ते ही वेगें मरती । परि नाम न गाती भुली भ्रमें ॥२॥
कायरे हा देह सुखाचा तयासी । उघडाचि जासी अंतकाळी ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । अंती यम फांसा गळां पडे ॥४॥

नीचाचे संगती देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळोनि सोंवळा केला ॥१॥
मुळींच सोवळा कोठें तो वोंवळा । पाहतां पाहाणें डोळा जयापरी ॥२॥
सोवळ्यांचे ठाई सोंवळा आहे । वोंवळ्या ठाई वोंवळा कां न राहे ॥३॥
चोखा म्हणे देव दोहींच्या वेगळा । तोचि म्यां देखिला दृष्टीभरी ॥४॥

पंचही भूतांचा एकचि विटाळ । अवघाचि मेळ जगीं नांदे ॥१॥
तेथें तो सोंवळा वोंवळा तो कोण । विटाळाचें कारण देह मूळ ॥२॥
आदिअंती अवघा विटाळ संचला । सोंवळा तो झाला कोण न कळे ॥३॥
चोखा म्हणे मज नवल वाटतें । विटाळा परतें आहे कोण ॥४॥

वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ । पुराणें अमंगळ विटाळाचीं ॥१॥
जीवासी विटाळ शिवासी विटाळ । काया अमंगळ विटाळाची ॥२॥
ब्रम्हिया विटाळ विष्णूसी विटाळ । शंकरा विटाळ अमंगळ ॥३॥
जन्मतां विटाळ मरतां विटाळ । चोखा म्हणे विटाळ आदिअंती ॥४॥


  -  संत चोखामेळा
सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं । पुंडलीकापाठीं उभें ठाकें ॥१॥

साजिरें गोजिरें समचरणीं उभें । भक्‍ताचिया लोभें विटेवरी ॥२॥

कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले । शंख चक्र मिरवले गदापद्म ॥३॥

चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी । चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥


  -  संत चोखामेळा
धांव घाली विठू आता चालू नको मंद। बडवे मज मारिति ऐसा काही तरि अपराध ॥१॥

विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला। शिव्या देती म्हणती महारा देव बाटविला ॥२॥

अहोजी महाराज तुमचे द्वारींचा कुतरा। नकाजी मोकलू चक्रपाणि जिमेदारा ॥३॥

जोडुनिया कर चोखा विनवितो देवा। बोलिला उतरी परि राग नसावा ॥४॥


  -  संत चोखामेळा