चंदनाच्या संगें बोरीया बाभळी । हेकळी टाकळी चंदनची ॥१॥

संतांचिया संगें अभाविक जन । तयाच्या दर्शनें तेचि होती ॥२॥

चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा । नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा ॥३॥


 - संत चोखामेळा

डोळियाचा देखणा पाहतां दिठी । डोळाच निघाला देखण्या पोटीं ॥१॥

डोळ्याचा देखणा पाहिला डोळा । आपोआप तेथें झांकला डोळा ॥२॥

चोखा म्हणे नवलाव झाला । देखणा पाहतां डोळा विराला ॥३॥


  - संत चोखामेळा

मुळीचा सोवळा कोठे तो ओवळा । पाहता पाहणे डोळा जयापरी ।।
सोवळ्याचे पायी सोवळा आहे । वोवळ्याच्या ठायी वोवळा न राहे ।।
चोखा म्हणे  देव दोहीच्या वेगळा । तोचि म्या देखिला द्रुष्टीभरी ।।
षडरस पक्वान्ने विस्तारिले ताट । जेवू एकवट चोखा म्हणे ।।


  -  संत चोखामेळा
अवघी पंढरी भुवैकुंठ नगरी । नांदतसे हरी सर्वकाळ ॥१॥
चतुर्भुज मूर्ति शंख चक्र करीं । पीतांबरधारी श्यामवर्ण ॥२॥
श्रीमुख शोमर्ले किरीट कुंडलें । तेचि मिरवले चंद्र सूर्य ॥३॥
पीतांबर कासे सोनसळा विराजे । सर्वांगीं साजे चंदनउटी ॥४॥
मिरवले कर दोनी कटावरी । ध्यान तें त्रिपुरारि ध्यात असे ॥५॥
सनकादिक भक्त पुंडलिक मुनि । सुखसमाधानी सर्वकाळ ॥६॥
आनंदाचा कंद उभा विटेवरी । चोखा परोपरी नाचतसे ॥७॥


  -  संत चोखामेळा
भाविकांच्या लोभा होऊनी आर्तभूत । उभाचि तिष्‍ठत पंढरीये ॥१॥
काय करुं प्रेमा न कळे या देवा । गुंतोनियां भावा राहे सुखें ॥२॥
वर्ण अभिमान न धरीं कांहीं चाड । भक्ति सुख गोड तयालागीं ॥३॥
चोखा म्हणे ऐसी कनवाळु माउली । कृपेची साउली दीनां करी ॥४॥


  -  संत चोखामेळा
ज्या सुखा कारणें योगी शिणताती । परी नव्हे प्राप्ती तयांलागीं ॥१॥
तें प्रेमभावें पुंडलिका वोळलें । उघडेंचि आलें पढरीये ॥२॥
कर ठेवोनी कटीं उभा पाठीमार्गे । भक्तांचिया पांगे न बैसेचि ॥३॥
युगें अठ्‌ठावीस होऊनियां गेलें । नाहीं पालटलें अद्यापवरी ॥४॥
चोखा म्हणे ऐसा कृपाळु श्रीहरी । कीर्ति चराचरीं वानिताती ॥५॥


  -  संत चोखामेळा
वैकुंठ पंढरी भिंवरेचे तिरीं । प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथें ॥१॥
रुप हें सांवळें गोड तें गोजिरें । धणि न पुरे पाहतां जया ॥२॥
कांसे सोनसळा नेसला पिंवळा । वैजयंती माळा गळां शोभे ॥३॥
चोखा म्हणे ऐसें सगुण हें ध्यान । विटे समचरण ठेवियेले ॥४॥


  -  संत चोखामेळा