इंफाळ

"इंफाळ-जंगलातल्या चिमुकल्या फुला,

मोकळे करुनि सांगतो मनोगत तुला

एकलेपणा मज असह्य हा जाहला

तू विरंगुळा एकल्या जिवाला मला !

मी जखमी होउन खंदकात या पडे

मज टाकुनि गेले बांधव मम कुणिकडे ?

चहुबाजू धूसर दिसति नागटेकडया

उद्‌ध्वस्त त्यांमधे नागांच्या झोपडया

ओतितो आग तोफांचा भडिमार हा

की प्रलयंकर भूकंप होत हा महा !

सर गोळ्यांचे सोडिती यंत्रबंदुका

कित्येक चाटुनी जाती या खंदका

चढउतार भारी, किर्र रान भोवती

बेधडक त्यातुनी रणगाडे धावती

हे वनदेवीच्या मुला, नवल हे पण

या वणव्यातुन वाचलो कसे आपण ?

घरदार सोडुनी लष्करची चाकरी

का धरिली, ते तुज कसे सांगु मी तरी ?

मी कृष्णा-खोर्‍यातला मराठा गडी

या ब्रह्मी आघाडीत घेतली उडी

बोलोत शिपाई भाडोत्री मज कुणी

लढतोच तरी तळहाती शिर घेउनी

हा कुणी कुणास्तव जिंकायाचा लढा

मज याचा अजुनी झाला नच उलगडा !

इंफाळ दिशेचा सर्द वात वाहतो

कुजबुजुनी कानी काय मला सांगतो ?

रणघोष ’चलो दिल्ली’ चा हा ऐक रे !

’जयहिंद !’ हाक तव बंधूंची ऐक रे !

ते शत्रु नाहित---हिंदपुत्र फाकडे

ते सज्ज जाहले जाया दिल्लीकडे !

स्वातंत्र्यरवीला द्यायाला अर्ध्य हे

रक्ताला आहे बोलावित रक्त हे !

इंफाळ दिशेचा वारा हे हृद्गत--

सांगून म्हणे, ’ये, तुझे असो स्वागत !’

ही हाक कुणाची ? मातेची हाक ही !

ऐकून संचरे मनी चेतना नवी

घायाळ पाखरु तडफड तडफड करी

पण येत उडाया नाही त्या अंबरी !

असहाय तसा रे झालो मी सर्वथा

ही सांगु कुणा मी मनची माझ्या व्यथा !

सह्याद्री माझा माहित नाही तुला

नसशील ओळखत रानजाइच्या फुला

तुज पाहुनि होते त्यांची मधुर स्मृती

रे हास हास ! तव कौतुक करु मी किती !

जखमेतुनि गेले गळुनि रक्त घळघळा

रे थकलो मी, नच अधिक बोलवे मला

ती येइल गाडी ’अँम्ब्युलन्स’ अवचित !

मज घेउन जाइल, होइल ताटातुट !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा