त्रिपुरी पौर्णिमा

ये आज त्रिपुरि पौर्णिमा । वदन चंद्रमा । पूर्ण फुलवोनी

करि विलास भुवनी शरदऋतूची राणी

किति धवल पडे चांदणे । गोड हासणे । जसे रमणीचे

जे रातराणिचे कुंज फुलवि हृदयीचे

ही विश्वाची प्रणयिनी । सिंधु-दर्पणी । बघे न्याहळुनी

ही रुपसुंदरी स्वताच जाई भुलुनी

मम हृदयसिंधु उचमळे । होउनी खळे । भाव-लहरींचे

उमलतात कवने जणू कळे कमळांचे

पौर्णिमा करा साजरी । हर्षनिर्भरी । तुम्ही भावंडे

चांदणे चकोरापरी लुटा आनंदे

मी रुग्ण इथे आश्रमी । होउनी श्रमी । तळमळे शयनी

मन माझे तुमच्याकडेच गेले उडुनी

मज दिसतो रांगोळिचा । रम्य गालिचा । रेखिला कुशले

ती भावमधुर पाहुनी कला मन भुलले

तुम्हि गगनदीप बनविला । उंच चढविला । विलसतो गगनी

राहील चिरंतन तेवत अंतःकरणी

त्या पणत्या तुम्हि लाविल्या । स्मृती आपुल्या । कधि न विझणार्‍या

या कळया जीवनातल्या सदा फुलणार्‍या !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा