शेवटले बाजीरावाचा पोवाडा

वडिलांचे हातचे चाकर । त्यांस न मिळे भाकर ।

अजागळ ते तूपसाखर । चारुनि व्यर्थ पोशिले ॥१॥

सत्पात्राचा त्रास मनीं । उपजे प्रभूचे मनांतूनि ।

ज्या पुरुषास न कोणी । अधीं त्याला भजावें ॥२॥

तट्टू ज्यास न मिळे कधीं । पालखी द्यावी तयास आधिं ।


मडकें टाकुनि भांडयांत रांधी । ताटवाटया भोजना ॥३॥

द्रव्य देऊन आणिक आणिक । नवे तितके केले धनिक ।

जुन्याची तिंबुनि कणीक । राज्य आपुलें हरविलें ॥४॥

जो पायलीची खाईल क्षिप्रा । पालखी द्यावी तया विप्रा ।

निरक्षर एकाद्या विप्रा । त्याला क्षिप्रा चारावी ॥५॥

एके दिवशीं व्हावी खुशाली । स्वारी पुढें शंभर मशाली ।

एके दिवशीं जैशी निशा आली । मशाल एकही नसावी ॥६॥

मेण्यांत बसावें जाउनि । कपाटें ध्यावीं लाउनि ।

स्वरुप कोणा न दावूनी । जागें किंवा निजले कळेना ॥७॥

हुताशनीच्या सुंदर गांठया । शेर शेर साकरेच्या पेटया ।

विंप्र कंठीं जैशा घंटया । उगाच कंठया घालाव्या ॥८॥

तशाच राख्या जबरदस्त । सांभाळितां जड होती हस्त ॥

दौलत लुटुनि केली फस्त । हस्त चहूंकडे फिरविला ॥९॥

तुरा शिरीं केवढा तरी । बहुताची मोठा चक्राकारी ॥

हार गजरे नखरेदारी । सोंगापरी दिसावें ॥१०॥

हात हात रेशमी धोतर जोडे । चालतां ओझें चहूंकडे

आंगवस्त्र दाहदां पडे । चरणीं खडे रुतताती ॥११॥

पोषाग दिधले बाजिरायें । मोच्यास पैकां कोठें आहे ? ॥

तैसेच अनवाणी चालताहे । शास्त्री अथवा अशास्त्री ॥१२॥

घढींत व्हावें क्रोधयुक्त । घडींत व्हावें आनंदभरित ॥

धडींत व्हावें कृपण बहुत । घडींत उदार कर्णापरी ॥१३॥

घडींत व्हावी सौम्य मुद्रा । घडींत यावा कोप रुद्रा ॥

घडींत घ्यावी क्षणैक निद्रा । स्वेच्छाचारी प्रभू हा ॥१४॥


कवी - अनंत फंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा