कवितेचें प्रयोजन

” शान्तीचें घर सोडुनी प्रखर त्या हाटीं प्रयत्नाचिया,
प्रीतीचाहि निकुंज सोडुनि रणीं जीवित्व नांवाचिया,
सर्वांहीं सरमावणें झटुनियां हें प्राप्त झालें असे;
या वेळे न कळे कवे ? तुज सुचे गाणें अहा रे कसें !

” माता ही सुजला स्वभूमि सुफला, तीच्या परी लेंकरीं
खायाला पुरतें पहा नच मिळे कीं हाल आहे पुरा;
झांकायास तनूस वस्त्रहि न तें आतां पुरेसें मिळे;
या वेळेस कसें कवे ! तुज सुचे गाणें न मातें कळे !’

हें कोणी म्हणतां जवें कविमनीं खेदोर्मि हेलावल्या,
नेत्रांतून सवेंचि बाष्पसरिता वाहावया लागल्या;
त्याचा स्त्रैणपणा असा प्रकटला वाटेल कोणा, परी
धीरोदात्त असेचि तो श्रुत असे हें दूरही भूवरी !

सोन्याचे सरले अहा ! दिवस ते, आली निशा ही कशी !
सौख्याचा नद तो सुकून पडलों या दुःखपंकीं फशीं !
कालक्रीडीत हें बघूनि रडला, हें व्यस्त कांहीं नसे;
प्रौढत्वीं निज शैशवास जपणें बाणा कवींचा असे,

बाष्पान्तीं तरलस्वरें मग कवी निश्वासुनी बोलिला ---
जो पूर्वीं गुण पुण्यभूमिवरि या अत्यन्त वाखाणिला,
तें हें दिव्य कवित्य दुर्विधिवशें हीनत्व कीं पावलें,
त्याची बूज करावया न अगदीं कोणी कसें राहिलें !

” गाणें जें परिसावया कविपुढें राजेशही वांकले,
यन्नादेंच लहान थोर सगळें गुंगून वेडावले,
त्याला मान नसे, नसो पण, अतां त्याची अपेक्षा नसे ---
हें कोणी म्हणतां विषाद अहिसा मन्मानसाला डसे !

” आलेल्या दुरवस्थितींतुनि तुम्ही उत्तीर्ण व्हाया जरी,
जद्योगीं रत व्हावया धरितसां सौत्सुक्य चित्तीं तरी,
गाण्यानें कविच्या प्रभाव तुमचा वर्धिष्णुता घेइल,
स्फुर्तिचा तुमच्या पिढयांस पुढल्या साक्षी कवी होइल !

” हातीं घेउनियां निशाण कवि तो पाचारितो बान्धवां ---
‘ या हो या झगडावयास सरसे व्हा मेळवा वाहवा !’
प्रेतेंही उठवील जी निजरवें, ती तो तुतारी करी,
आतां नादवती, निरर्थ तर ती त्याची कशी चाकरी ?

” आशा, प्रेम तसेंच वीर्य कवनीं तो आपल्या गाइल;
गेलें वैभव गाउनि स्फुरण तो युष्मन्मना देइल,
द्या उत्तेजन हो कवीस, न करा गाणें तयाचें मुकें;
गाण्यानें श्रम वाटतात हलके, हेंही नसे थोडकें;

“ आतां जात असे दुरी शिथिलता अस्मत्समाजांतुनी,
याची खूणच गान जें निघतसें तें साच जाणा मनीं;
तारा ताणिलियावरी पिळुनियां खुंटयास वाद्याचिया,
त्याच्यांतून अहा ! ध्वनी उमटती जे गोड ऐकावया !”


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- १८९३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा