कोण हो कोण ? - काय ! अवचितराव करकर्यांची सून ? आणि ती एकाएकी कशानें हो मेली ? - वाख्यानें का ? बरें झालें हो ! सुटली एकदांची आपल्या दुःखांतून ! बिचारीचा नवरा वारल्याला दोन वर्षे व्हायला आलीं असतील नाहीं ? - बाई ! बाई !! केवढा आकांत माजला होत्या त्या वेळेला या घरांत ! घरांतल्या बायकांच्या ओरडण्यानें सगळी आळी किं हो गर्जून गेली होती ! आणि आतां ? या सोळा - सतरा वर्षाच्या मुलीकरतां - आनंदीच नाहीं का हिचें नांव ? - बिचारीकरतां या घरांतलें एक चिटपांखरुं तरी आता ओरडत आहे का ? - बरोबरच आहे ! नवरा मेलेली पोर ! हिच्या मरणाबद्दल हो कोणाला वाईट वाटणार आहे ! उलट जें तें हेंच म्हणणार कीं, ' विधवा मेली ना ? बरें झालें चला ! सुटली एकदांची ! ' इतकेंच काय, पण कितीएक तर असेंसुद्धां म्हणायला कमी करीत नाहींत कीं, ' बरें झालें ! आमच्या घरांतला अपशकुन - बरेच दिवस खिळलेली अवदशा लवकरच नाहींशी झाली ' म्हणून ! नवरा मेलेल्या बायका गेल्या, तर त्यांच्याबद्दल हें अशा तर्हेचें दुःख जगाला होत असतें ! - सवाष्ण मेली तर ? अहो कशाचें आलें आहे ! तिची लहान मुलेंबाळें जी काय रडतील, गागतील तेवढींच ! बाकी जग तर हेंच म्हणतें, ' सवाष्ण मेली ? भाग्यवान् आहे ! बरोबर कायमचें - अखंड ! - सौभाग्य घेऊन स्वर्गाला गेली !! ' - हं: , पाहिलें तर तें ' अखंड सौभाग्य ! ' नदींत तिच्या प्रेताची पुरती राख विरघळेपर्यतसुद्धा टिकत नाहीं ! लागलीच दुसरी कोणी तरी पाठीमागून धांवत येऊन, झिंज्या धरुन, पाठींत लाथ मारुन, तें ' अखंड सौभाग्य ! ' बिचारीच्या हातांतून हिसकावून घेऊन, पुनः जगांत परत येतेही ! - खरेंच तर काय ! बायकाचें जगणे आणि मरणें, सारखेंच ! - जगल्यास जगा ! मेल्यास मरा ! अहो नाहीं तर, या आनंदीच्या नवर्यासाठी, तिच्या सासूसार्यांनी कसा पाण्यासारखा पैसा खर्च केला होता ना ? आणि आतां ? नाहीं, तुम्हींच समक्ष पाहिलें आहे म्हणून विचारतें ? अहो ! आनंदीचा नवरा जगावा म्हणून जशी यांनी खटपट केली, तशीच ही एकदांची मरावी म्हणून यंनी निष्काळजीपणाची खटपट केली असेल बरें ! - ती पहा ! ती पहा ! तिला बाहेर आणली आहे ! आई ! आई !! कशी कोंवळी पोर ! कायरे देवा हिला जगांत आणून हिची हौस पुरवलीस ? - तिला पाणी घेतलेली तिची प्रत्यक्ष आईच ना हो ती ? - जावयाकरितां कशी ऊर बडवून किं हो रडत होती ? आणी आतां ? - अहो हिच्या पोटचा गोळा ना तो ? - पण नाहीं, ही मेली म्हणून तिला - प्रत्यक्ष आईलासुद्धां - मनांतून बरें वाटत असेल ! ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा