थांब, ये नारु ! - अरे, आधीं नीट ऐकून घेतलेंस का काय काय आणायचें तें ? - हां बरोबर, पानाच्या तीन पट्टया आणि एक सिगारेटसची पेटी ! - पण ती कोणती ठाऊक आहे का ? - सीझर्स ! कैची छाप ! भलतीसलती उगीच आणूं नकोस ! - चल आटप, ठोक धूम लवकर ! सगळे आम्ही इथें वाट पहात आहोंत ! - छे बोवा ! काय तुम्ही मघांपासून उगीच पिरपिर लावली आहेत हो ? - तुम्हांलाच तेवढी घाई अन् आम्ही काय इथें राह्यला आलों आहोंत ? अनायासें सुट्टी मिळाली आहे, बसूं थोडा वेळ आणखी ! समजलें हो ! काम .... काम .... काय कामाचें सांगतां येवढें ? येऊन जाऊन स्नान करुन जेवायचें, अन् खुशाल आढ्याला पाय लावून ताणू न द्यायची, हेंच कीं नाहीं ? सत्तेची येवढी बायको असल्यावर मग हो कां इतकी घाई ? - असें ! हें नव्हतें मला ठाऊक ! तुमची आमची विशेष ओळखही नुकतीच झालेली ! त्यामुळें .... कधींची बरें गोष्ट हीं ? - म्हणजे जवळजवळ चार वर्षे झालीं म्हणानात ! - ब.... रं ! फिरुन कांही मग ? - ना .... हीं !! अरे, म्हणजे सांगतां आहां काय तुम्ही ! खरेंच का ? - मग मोठें विलक्षण आहे बोवा ! बायको जाऊन चार वर्षे झाली आणि अजून लग्न नाही म्हणतां ? - हेः स्टुपिड् ! - रागावूं नका तुम्ही ! पण खरें सांगायचें म्हणजे .... साफ इथें चुकतां आहां तुम्ही ! यावरुन होतें काय ठाऊक आहे का ? - अहो, बायकोवर तुमचें प्रेम नाहीं हें उघड उघड दिसतें ! - भलतेंच एखादें ! - असें आहें त्याचें.... इतकें कशाला प्रत्यक्ष माझेंच घ्या ना ! पहिली बायको माझी मेली, तेव्हां लगेच दुसरी केली ! म्हणजे झालें काय ? - पहिलीवर झालें माझें दुप्पट प्रेम ! पुढें दुसरी गेल्यावर तिसरी ! त्यामुळें .... लक्षांत आलें का काय झालें तें ? .... पहिलीवर माझें झालें तिप्पट, दुसरीवर दुप्पट अन् तिसरीवर एकपट, म्हणजे सर्वात कमी प्रेम तिच्यावर ! असें मोठें हें .... ' सायकॉलॉजिकली ' - म्हणजे मानसशास्त्रदृष्ट्या .... बरें का ? - मानसशास्त्रदृष्टया हें मोठें विचित्र त्रांगडें आहे ! - भले महाराज ! टॉलस्टॉय आणि टागोर वाचून हेंच का शेवटीं सार काढलेंत ? ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा