कार्ट्या !

.... थांब !
अशानें थोडाच तूं ताळ्यावर येणार आहेस !
नुसत्या छडीनें नाहीं भागायचें - चांगला या चाबकानेंच तुला सडकला पाहिजे !
- चूप !
खबरदार ओरडशील तर !
आणलीस तापवलेली पळी ?
ठीक.
आण ती इकडे !
धर याला नीट, - अस्सा !
चांगला चरचरुन डाग बसला तोंडाला !
- रडूं दे, रडूं दे लागेल तितका !
काय ग, या त्रिंब्याला अक्कल तरी केव्हां येणार ?
आतां का हा लहान आहे ?
चांगला सहा वर्षाचा घोडा झाला आहे !
पण अजून कसें तें व्यवहारज्ञान नाहीं !
- नाहीं पण मी म्हणतों, कांहीं जरुर पडली होती मध्यें बोलण्याची याला ?
मी इकडे गणपतरावांना सांगतों आहे कीं, तुमची दहा रुपयांची नोट पडलेली इथें कांहीं कोणाला सांपडली नाहीं म्हणून !
पण इतक्यांत आमचे हे दिवटे चिरंजीव आले ना !
आल्याबरोबर यानें त्या गृहस्थाला सांगितलें कीं,
- तरी मी इकडे चांगला डोळ्यांनी दाबतों आहें !
- पण या गाढवाचें लक्ष असेल तर !
- म्हणे ' तुमच्या खिशांतून काल कागद पडला होता, तो किनई मी बाबांच्याजवळ नेऊन दिला '
- चूप बैस ! खोटें बोलतोस आणखी ?
असें नाहीं तूं त्यांना म्हणालास ?
- अग यानें सांगितल्याबरोबर, माझ्या जीवाची कोण इकडे त्रेधा !
मग कांहीं तरी आठवल्यासारखे केलें, मुद्दाम कागदपत्रांची दहापांच पुडकीं उलथी पालथी केलीं, अन् खिशांत असलेली नोट हळूच कशी तरी त्या गणपतरावांना काढून दिली !
- असा संताप आला होता त्या वेळेला या कार्ट्याचा !
- पण त्यांच्या देखत ' नेहमीं अशींच मला शहाणपणानें आठवण करीत जा बरें बाळ ! ' असें म्हणून ते जाईपर्यंत या त्रिंब्याची मला वरचेवर पाठ थोपटावी लागली !
कशी लक्ष्मी चांगली घरांत चालून आली होती !
- पण या कार्ट्यापायीं;
- अरे कार्ट्या !
अजून कसें तुला जगांतलें ज्ञान नाहीं !
- तें कांही नाहीं !
या पोरट्यांना उठतां बसतां नेहमीं सडकलेंच पाहिजे !
त्याशिवाय नाहीं यांना जगांतलें ज्ञान यायचें !
- स्वयंपाक झाला आहे म्हणतेस ?
चला तर घ्या आटपून. चंडिकेश्वराच्या देवळांत लवकर मला गेलेंच पाहिजे !
आजपासून तिथें प्रख्यात काशीकरशास्त्री श्रीमदभगवद्गीतेवर पुराण सांगायला सुरुवात करणार आहेत !
चला तर लवकर !
- ' त्रिंब्या, थांबलें कीं नाही तुझें अजून रडणें ?
का पाहिजे आहेत तडाखे आणखी ? '....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा