येक दिवस सपनात मी
झालो गावचा सरपंच
झोपीतच माह्यी राज्या
छाती फुगली दोन इंच
ग्रामपंचायतच्या अंदर
सभा माह्यी थाटली
सरपंचाची सभा मले
इंद्रा सारखी वाटली
मी कपडे घालो भारी
रेमंड कंपनीचा कोट
मले सरपंच पाहुन
काई लोकाइचं दुखे पोट
माह्या बुढा म्हने मले
तु हिसोबात राय बाबु
कोनतीही असो योजना
सारा पैसा आपुनच दाबु
कागदावरचा कारभार
खराखुरा पाह्याचा
भाताच्या पयले बाबु
गुई नाही खायाचा
वरून रायजो चांगला
अंदरून करजो बिगाळ
ठेकेदारासंग लावजो
कमिशनचं जुगाळ
ठेकेदारासंग बाबु तु
पैशाचं बोल कडक
पयले करजो आपल्या
घरा पुढची सडक
पुढच्या पाच वर्षात
मुश्किल हाये येनं
म्हणुन म्हनतो बाबु
आपलं सरकं करून घेनं
मिटींगीत म्हन फक्त
पैसा विकासाले लावु
तुमच्या येटायातला रोड
दुसर्या टप्पयात पावु
कागद दाखोजो खरा
बाकी चालू दे खोटं
आपलं जुनं घर पाळुन
तथी मकान बांधु मोठं
ग्रामसेवकाच्या सल्ल्यानं
माह्यी बाजु झाली दमदार
मले घरी येवुन भेटत
खासदार अन् आमदार
झोपीतच राज्या म्या
बुलेट गाळी काळ्ळी
गाळीले किका मारू मारू
आंगावरची सातरी म्या
फाळ्ळी
सपनात मी वसनावलो
पावला आपल्याले देव
मुत्यासाठी झोपीतुन मले
येकदम आला चेव
झोपीतुन उठल्या बरोबर
बायको मले भेटली
खरंखुरं सांगा म्हने
सातरी कशी फाटली
सरपंचाच्या नांदात मले
सपन दिसलं भेसुर
झोपीत सातरी फाटली
त्यात माह्या काय कसुर
बायकोसंग बोलुन म्या
कसतरी निपटलं
बुढ्यानं माह्ये पाय धरून
खाली मले आपटलं
बुढा राज्या माह्या
लयच् होता तापड
कानाखाली देली माह्या
उलट्या हाताची झ्यापड
इनाकारन मले तु
दाखु नोको पावर
सरपंचाच्या नांदात लेका
इकुन बसला वावर
त्या दिवसा पासुन म्या
दोनी कान धरले हाती
चुकूनही सरपंचाच सपन
मले दिसु नोको राती
चुकुनही सरपंचाचं सपन
मले दिसु नोको राती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा