अनर्थ - अच्युत गोडबोले

1. शेतीचा पाया भक्कम झाल्यावर उद्योगधंद्यांत वाढ होणं आणि उद्योगधंद्यांचा पाया भक्कम झाल्यानंतर सेवाक्षेत्र वाढीला लागणं ही नैसर्गिकरीत्या सुदृढ आणि टिकाऊ प्रक्रिया असते.


2. शेतीतल्या 1% वाढीमुळे जे दारिद्र्यनिर्मूलन होतं, तेवढं दारिद्र्यनिर्मूलन व्हायला इतर क्षेत्रांमध्ये 2-3% वाढ व्हावी लागते.

3. जेव्हा जीडीपी ओळीनं 6 महिने कमी होतो, तेव्हा त्याला ‘मंदी’ असं म्हणतात.

4. अमेरिकेत बीफला खूप मागणी आहे. तिथे हॅम्बर्गर सर्वात प्रिय आहे. त्यासाठी लाखो जनावरांना कमीतकमी 18 महिने खाऊ-पिऊ घालावं लागतं. त्यांना चरण्यासाठी आणि त्यांच्या खाद्यपदार्थांसाठी जमीन मिळावी म्हणून अ‍ॅमेझोनमध्ये प्रचंड प्रमाणात जंगलतोड झाली; आणि त्याचा पर्यावरणावर खूपच वाईट परिणाम होतो. म्हणूनच अमेरिकेत बीफ तयार न करता ते ब्राझील आणि इतर देशांमधून आयात केलं जातं. पण या प्रकारामुळे अ‍ॅमेझोनमधली लाखो हेक्टर सदारहित जंगलं नष्ट झाली आहेत. म्हणूनच याला ‘हॅम्बर्गर इफेक्ट’ म्हणतात.

5. प्रत्येक गोष्ट देवाच्या कृपेनं होत नसून त्यासाठी वैज्ञानिक कारण असतं आणि आपण ते शोधून काढलं पाहिजे, ही संशोधक वृत्ती आणि आपलं कुतूहलच तरुणपणापासूनच मारलं जात असेल तर काय करणार?

6. आर्थिक सल्लागार अरविंद पानिग्रहिया यांनी लिहिलेल्या लेखाप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 16 कोटी रु. (22 लाख डॉलर्स) गुंतवले तर त्यामुळे फक्त 1 रोजगार निर्माण होतो. याउलट बंगलोरमधल्या श्लोक इंडस्ट्रीजमध्ये 16 कोटी रु. गुंतवले तर 266 लोकांना रोजगार मिळतो. म्हणजे चक्क 266 पट!! थोडक्यात आपण यांत्रिकीकरण किती वापरतो, त्यावर रोजगार कसा अवलंबून असतो याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे.

7. प्रत्यक्ष किंवा थेट (डायरेक्ट) करांचे दर वाढवणं, वेल्थ आणि वारसाहक्काची संपत्ती यावर कर लावणं, कॉर्पोरेटस्ना करमाफी/करसवलती न देणं, टॅक्स हेवन्सवर नियंत्रण ठेवणं आणि काळा पैसा बाहेर काढणं या पाचही गोष्टींचा विचार केला, तर सरकारला जीडीपीच्या साधारणपणे कमीतकमी 20% जास्तीचं उत्पन्न दरवर्षी मिळू शकेल. तसं झालं; तर पुढची अनेक वर्षं शिक्षण, आरोग्य, पेन्शन, स्वस्त घरं, रोजगार, सार्वजनिक वाहतूक, पाणी, वीज, टॉयलेटस् अशा अनेक कल्याणकारी गोष्टींवर डेफिसिट न वाढवता भरपूर खर्च करता येईल.

8. जीडीपीच्या मोजमापात कित्येक गोष्टी झाकल्या जातात. उदाहरणार्थ, समाजातली विषमता जीडीपीच्या आकड्यात दिसून येत नाही. प्रचंड विषमता असली, तरी गरीब आणि श्रीमंत या दोघांच्या उत्पन्नांची जीडीपीमध्ये बेरीज केलेली असल्यामुळे राष्ट्रातली बहुतांशी जनता गरीब असली, तरी राष्ट्राचा जीडीपी मोठा असू शकतो. तसंच जीडीपीवरून राष्ट्रातलं शिक्षण, आरोग्य आणि एकूणच लोकांसाठीच्या सोयी, सुविधा, त्यांचं संगोपन, त्यांचं समाधान आणि त्यांचा आनंद यांच्याविषयी काहीच कल्पना येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा