गुलमोहर - व पु काळे

1. आपत्ती पण अशी यावी की, त्याचाही हेवा वाटावा इतरांना – आणि व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये – चांगलं दोनशे फुटांवरून पडावं. माणूस किती उंचीवर पोहचला होता ते तरी जगाला कळेल


2. प्रचंड आघातांनी माणूस तेवढा खचत नाही. कारण त्याच्या मनाची पूर्वतयारी झालेली असते. अनपेक्षित बारीकसारीक धक्क्यांनीच माणूस खचतो, कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो.

3. एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ एकदाच येते. तो क्षण निसटू द्यायचा नसतो.

4. पहिलं दु:ख येतं ते डोळ्यांवाटे. पहिला मोह नजरेचा. ही नजर एकदा बिघडली की माणूस बिघडला

5. बाह्य जगावर, सजावटीवर भुललेला माणूस स्वत:त डोकावून पाहूच शकत नाही. पापमार्गाकडे वेगाने नेते ती दृष्टी.

6. आपली सतत कीव केली जाते यासारखी दु:खदायक गोष्ट नाही.

7. पोट भरण्यासाठी जेव्हा पुण्य धावून येत नाही तेव्हा पापच करावं लागतं.

8. चोरांना, दरोडेखोरांना किंवा खुन्यांना, एवढं माहीत असतं की देव काही जगात येऊन कुणाला सांगत बसत नाही. तो काही बोलतच नाही. तेव्हा देवाची भीती काही नाही. जी काय भीती आहे ती माणसाची माणसाला. माणूसच माणसाला केव्हातरी पकडतो. माणसाला चुकवलं म्हणजे झालं.

9. अनोळखी माणसंच ओळखीची होतात आणि ओळख नसतानाच्या काळातले प्रश्न विचारून केव्हा केव्हा बेजार करतात.

10. देवाला दु:ख म्हणजे काय हे कळलं असतं तर त्यानं ते निर्माणच होऊ दिलं नसतं.

11. आपण वाहतो म्हणून ढग हालचाल करतात, समुद्रावर लाटा येतात, वणवा भडकतो, पाचोळा उडतो, त्याची जाणीव वाऱ्याला नसेल का? तो वाहतोच.

12. पळून जाणं एकदम सोपं. तेव्हा ते केव्हाही करता येतं. पळण्याची वाट केव्हाही हाताशी आहे हे गृहीत धर आणि परत आपल्या घरी जा. आधी जे अवघड आहे ते सोडवायचा प्रयत्न कर. कारण सोपी गोष्ट आपल्या मालकीची आहे

13. खरं प्रेम कमी पडतं; पण खोट्या प्रेमाला तूट पडायचं कारणच नव्हतं. अभिनयच करायचा हेच जिथं ठरवलेलं तेव्हा कमी पडायचं कारणच नव्हतं.

14. आजारी माणसाच्या बुद्धीवर ताबा असतो तो त्रासलेल्या शरीराचा. आजारपणातले माणसाचे निर्णय कधीच व्यवहार्य नसतात.

15. प्रवासाला निघालेल्या माणसाला आपण फक्त स्टेशनपर्यंतच पोचवतो. पुढचा प्रवास त्यालाच करावा लागतो.

16. स्वत:च्या रूपाचा अहंकार जळाला तेव्हा इतर सौंदर्य दिसायला लागलं.

17. माणसं कृती विसरतात, पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात.

18. जोडीदाराची निवड कानांनी करावी, डोळ्यांनी करू नये.

19. प्रेमाच्या राज्यात माणूस कधीच मोठा-वयस्कर होत नाही.

20. निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण जर स्वत:ला पाहू शकलो, तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यातच मिळतील.

21. अति ऊ-तिला खाज नाही आणि अति ऋण त्याला लाज नाही.

22. मासळी आणि पाहुणा कितीही चांगला असला तरी तीन दिवसांनंतर वास मारू लागतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा