माझा घोडा

टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !

उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !

घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा !

सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !

- शांता शेळके

केळीचे सुकले बाग...

केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी

अशी कुठे लागली आग, जळति जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे

किती दूरचि लागे झळ, आंतल्या जीवा
गाभ्यातिल जीवनरस, सुकत ओलावा

किती जरी घातले पाणी, सावली केली
केळीचे सुकले प्राण, बघुनि भवताली

कवी    - अनिल
संगीत -    यशवंत देव
स्वर   -    उषा मंगेशकर

लावण्य

असे काहीतरी आगळे लावण्य केव्हा कधीकाळी दिसून जाते
वेगळ्या सौंदर्य-पर्युत्सुक जीवा जन्मांतरीचे सांगत नाते

नसते निव्वळ गात्रांची चारुता त्याहून अधिक असते काही
ठाव त्याचा कधी लागत नाही आणि आठवण बुजत नाही

रुप रेखेत बांधलेले तरी मोकळी खेळते त्यातून आभा
डोळ्याआडाच्या दीपज्योतीहून निराळी भासते प्रकाशप्रभा

आधीच पाहिले पाहिले वाटते पहिलेच होते दर्शन जरी
स्मरणाच्या सीमेपलिकडले कुठले मीलन जाणवते तरी

पुन्हा तहानेले होतात प्राण मन जिव्हाळा धाडून देते
जागच्या जागी राहून हृदय प्रीतीचा वर्षाव करून घेते !


कवी - अनिल [आ. रा. देशपांडे]

अजुनी रुसून आहे...

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ।

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे,
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरीला असा अबोला, की बोल बोलवेना ।

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे,
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना,
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ।

की गूढ काही डाव, वरचा न हा तरंग,
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ।


कवी     –    अनिल
संगीत  –    पं. कुमार गंधर्व
स्वर     –    पं. कुमार गंधर्व

आज अचानक गाठ पडे

भलत्या वेळी भलत्या मेळी
असता मन भलतीचकडे

नयन वळविता सहज कुठेतरि
एकाएकी तूच पुढे

नसता मनिमानसी अशी ही
अवचित दृष्टिस दृष्ट भिडे

दचकुनि जागत जीव नीजेतच
क्षणभर अंतरपट उघडे

गूढ खूण तव कळुन नाकळुन
भांबावुन मागे मुरडे

निसटुनि जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे


कवी     - अनिल
संगीत  - पं. कुमार गंधर्व
स्वर     - पं. कुमार गंधर्व
राग      - भीमपलास

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय 
 उभ्या पीकातलं ढोर 
 किती हाकला हाकला 
 फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट 
 त्याले ठायी ठायी वाटा 
 जशा वार्यानं चालल्या 
 पानावर्हल्यारे लाटा 

 मन लहरी लहरी 
 त्याले हाती धरे कोन? 
 उंडारलं उंडारलं 
 जसं वारा वाहादन 

 मन जह्यरी जह्यरी 
 याचं न्यारं रे तंतर 
 आरे, इचू, साप बरा 
 त्याले उतारे मंतर! 

 मन पाखरू पाखरू 
 त्याची काय सांगू मात? 
 आता व्हतं भुईवर 
 गेलं गेलं आभायात 

 मन चप्पय चप्पय 
त्याले नही जरा धीर 
तठे व्हयीसनी ईज 
 आलं आलं धर्तीवर 

 मन एवढं एवढं 
 जसा खाकसचा दाना 
 मन केवढं केवढं? 
आभायात बी मायेना देवा, 

कसं देलं मन आसं नही दुनियात! 
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत! 
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं 
 कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं!

देश विदेश

चंप्या : अबे झंप्या मला सांग या जगात किती देश आहेत..?

झंप्या : (क्षणाचाही विलंब न करता) अबे चंप्या या जगात एकच देश आहे आणि तो म्हणजे आपला "भारत"
बाकीचे तर विदेश आहेत.